यदा पश्यतां मामसौ वेत्ति नास्मान्
अयं श्वास एवेति वाचो भवेयुः |
तदा भूतिभूषं भुजंगावनद्धं
पुरारे भवंतं स्फुटं भावयेयम् ‖ २४ ‖
अंतिम तारक असणाऱ्या भगवान शंकरांच्या त्याच स्वरूपाला वेगवेगळ्या अंगाने आळवतांना आणि आपल्यासमोर स्पष्ट करतांना आचार्यश्रींनी माणसाच्या अंतिम समयीच्या अवस्थेचे विविध पैलू आधारभूत मानले आहेत.
आचार्यश्री म्हणतात,
यदा पश्यतां माम्- ज्यावेळी मला पाहणारे, अर्थात त्या अंतिम समयी माझे जे नातेवाईक माझ्या आजूबाजूला जमलेले असतील, माझ्या कडे पहात असतील,
असौ वेत्ति नास्मान्- हा आपल्याला ओळखत नाही.
अयं श्वास एवम्- बस हाच शेवटचा श्वास,
इति वाचो भवेयुः – असे बोलत असतील.
अर्थात एखाद्या मरणासन्न व्यक्तीच्या अंतिम समयी जेव्हा त्याचे नातेवाईक त्याच्या जवळ उभे राहतात त्या वेळी तो त्यांच्यापैकी कोणालाही ओळखत नाही.ही जवळपास अंतिम अवस्था असते. यावेळी बाकीचे लोक फक्त त्याचे श्वास मोजत असतात. शेवटचे काही श्वास राहिले असे म्हणत असतात.
तदा – त्यावेळी
भूतिभूषं – भूती म्हणजे विभूती अर्थात भस्माने विभूषित असणारे,
भुजंगावनद्धं- सर्प वेष्टित अशी
पुरारे – हे त्रिपुरासुराच्या विनाशका !
भवंतं – आपले
स्फुटं – स्फुट या शब्दाचे संस्कृत भाषेत मुक्त, व्यापक, स्वच्छ, अस्तित्व, क्षमतायुक्त असे वेगवेगळे अर्थ आहेत. तसेच दृश्य, संवेद्य असाही अर्थ आहे. लक्षार्थाने स्फुट म्हणजे मूर्ती.
आपले सगुण-साकार स्वरूप. स्फुट चे वर दिलेले सर्व अर्थ भगवंताच्या मूर्तीला, सगुणरूपाला लागू पडतात.
भावयेयम् – मी त्या मूर्तीचे ध्यान करो.
घरदार, नातेवाईक इतकेच काय तर श्वास देखील मागे पडून मला आपल्या चरणी स्थान मिळावे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply