पौरोहित्यं रजनीचरितं ग्रामणीत्वं नियोगो
माठापत्यं ह्यनृतवचनं साक्षिवाद: परान्नम् !
ब्रह्मद्वेष: खलजनरती प्राणिनां निर्दयत्वं
मा भूदेवं मम पशुपते जन्मजन्मांतरेषु !!१४!!
जगणे आणि जिवंत असणे या दोन मध्ये फरक आहे. केवळ श्वास घेणे म्हणजे जगणे नव्हे. उदरभरण तर पशु पक्षांचे देखील चालतेच. मात्र त्यासाठी खालील गोष्टी करण्याची माझ्यावर वेळ येऊ नये. ही आचार्यश्रींची मागणी अनेक अर्थाने चिंतनीय आहे.
पौरोहित्यं – पोट भरण्याचा पुरता धर्माचा उपयोग, त्यात समोरच्या यजमानाला बरे वाटेल म्हणून अशास्त्रीय गोष्टी अनेकदा केल्या जातात त्याचा संदर्भ आहे.
रजनीचरितं- रात्री केली जाणारी गोष्ट. म्हणजे चोरी. कोणत्याही प्रकारचे पाप.
ग्रामणीत्वं – गावचे प्रधानत्व. कारण त्यात दोन्हीकडून त्याच्यावरच दबाव असतो. इतरांच्या समस्यांनी आपली शांती नष्ट होते.
नियोगो – कोणाच्या हाताखाली नोकरी करणे. त्यात परावलंबित्वाचे दुःख आहे.
माठापत्यं – मठाचा लौकिक कारभार सांभाळण्याची वेळ. वेगळ्या मार्गाने पुन्हा व्यावहारिक गोष्टीच येतात.
ह्यनृतवचनं – खोटे बोलण्याची लाजिरवाणी अडचण.
साक्षिवाद:- इतरांच्या भांडणांमध्ये साक्ष देण्याची वेळ.
परान्नम् – दुसऱ्याच्या अन्नावर जगण्याची नामुष्की.
ब्रह्मद्वेष: – ब्राह्मणांचा अर्थात पंडित, विद्वानांचा, सज्जनांचा द्वेष.
खलजनरती – खल अर्थात विकृत मानसिकतेच्या लोकांवरील प्रेम.
प्राणिनां निर्दयत्वं – जीवमात्रांच्या प्रती निर्दयता.
मा भूदेवं मम पशुपते जन्मजन्मांतरेषु – हे भगवान महादेव पशुपती शंकरा ! या दुर्दैवी गोष्टी करण्याची वेळ माझ्यावर जन्मजन्मांतरीही कधी येऊ नये.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply