समुद्रकिनारा ! प्रत्येकाला वेगवेगळ्या कारणांनी आवडणारा निसर्ग. हो निसर्गच. विविधांगाने नटलेला निसर्ग. कधी सौम्य तर कधी रौद्र. अगदी माणसासारखाच किंबहुना त्यापेक्षा अधिक शक्तीशाली. हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या मूडप्रमाणे भासतो. कोणी दुःखी असेल तर तो त्याला दुःखी भासतो, त्याचवेळी जर कोणी आनंद साजरा करायला आला असेल तर तो त्यांना आनंदी भासतो. बरेचदा लोक शांतता , एकांत मिळावा म्हणून त्याच्याजवळ येतात. एकंदरीत ज्याला तो जसा हवा असतो , तसाच तो सगळ्यांना भेटत असतो.
असं म्हणतात की माणसाने निसर्गाकडून गोष्टी शिकल्या पाहिजेत. आता समुद्राचंच उदाहरण घ्या ना , तो कधीही निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादांचं उल्लंघन करत नाही आणि जर का त्याने मर्यादा ओलांडल्या तर काय होतं ह्याचं त्सुनामीपेक्षा दुसरं कुठलंच मोठं उदाहरण नाही. जर माणसांनी मर्यादा पाळल्या तर आयुष्यात कितीतरी संकटांना तो टाळू शकतो. समुद्राकडे विशालता असूनही तो विनम्र असतो , तसाच जर माणूस श्रीमंत असूनही विनम्र राहिला तर?समुद्रातील क्षमाशीलता माणसांनी घेतली तर कितीतरी नाती तुटता – तुटता पुन्हा जोडली जातील. समुद्र जसा कुठलीच घाण आपल्या पोटात ठेवत नाही तसं जर माणसाने केलं तर? माणसाने पण वाईट विचार काढून बाहेर फेकले तर? मग शंका , राग , द्वेष, मोह यांचा लवलेशही उरणार नाही. समुद्राच्या लाटा कशा सगळ्या वाईट गोष्टी समुद्रात राहून देेेत नाहीत त्याप्रमाणे माणसानेही जर आपल्या मनात सकारात्मक लाटा उमटवून नकारात्मक गोष्टींना बाहेर फेकलं , तर त्याच्या आयुष्यात कुठलीच गोष्ट नकारात्मक घडणार नाही. ज्याप्रमाणे समुद्राला ओहोटी व भरती असते त्याचप्रमाणे जर माणसाने नात्यांमध्ये कुठल्या गोष्टीला ओहोटी लागली पाहिजे याचा जर विचार केला तर नक्कीच त्याच्या आयुष्यात सुखांची भरती येईल. समुद्र जसा सगळ्या गोष्टी माहित असूनही त्या आपल्याच पोटात ठेवून शांत राहतो त्याचप्रमाणे मनुष्यानेही आपली आणि इतरांची गुपितं ठाऊक असूनही शांत रहायला शिकले पाहिजे.
आज दिनांक ३० ऑगस्ट आहे. आज जगभरात राष्ट्रीय समुद्रकिनारा दिवस साजरा केला जातो , म्हणून आज हा वैचारिक लेख लिहिण्याचा सगळा घाट. चला आजच्या दिवसाला जरा वेगळ्या पद्धतीने साजरा करूयात. समुद्र आणि त्याचा किनारा दोन्हीही साफ , स्वच्छ ठेवुयात आणि सोबत समुद्राचे आणखीन कुठले गुण आहेत ते अभ्यासून आपल्याला ते कसे लागू करता येतील ते बघू. सगळ्यांना राष्ट्रीय समुद्रकिनारा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
— आदित्य दि. संभूस
#NationalBeachDay #30August
National Beach Day
Leave a Reply