नवीन लेखन...

शिक्षक दिन

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥

गुरूंची विविध रुपं असतात. अध्यात्मिक गुरू वेगळा , शैक्षणिक गुरू वेगळा , आयुष्यात पहिल्यांदाच जो आपल्याला बोलायला , चालायला शिकवतो तो गुरू वेगळा , संस्कार देणारा गुरू वेगळा , मार्गदर्शन करणारा गुरू वेगळा. या सगळ्या गुरूंचा महिमा वर्णावा तेवढा थोडाच आहे.

मी लहान असताना आमच्या शाळेत शिक्षक दिन खूप मजेत साजरा केला जायचा. वरच्या इयत्तेतील मुलं खालच्या इयत्तेतल्या मुलांना शिकवायला यायचे. त्यादिवशी शाळेचा गणवेश न घालता आपल्याला जो आवडेल पण संस्कारही मोडले जाणार नाहीत अशा स्वरूपाचे कपडे घालून शाळेत जाण्याची मुभा असायची. अख्खा दिवस शाळा नसून शाळेच्या तासापेक्षा , हे तास कमी वेळासाठी घेतले जात असे. बघा बोलता – बोलता सगळा भूतकाळ डोळ्यासमोरून पटकन सरकला.

पूर्वीचे शिक्षक आणि आताचे शिक्षक यांच्यात खूप तफावत दिसून येते. अहो म्हणजे पूर्वीचे शिक्षक मजा घेत शिकवत. आताच्या शिक्षकांना प्रचंड तणावाखाली वावरायला लागतं. त्यामागची कारणंही तशीच आहेत म्हणा. पूर्वी पालकच शिक्षकांना पूर्ण मुभा देत असत की , तुम्हाला वाटेल ते करा ठोका , मारा पण आमच्या मडक्याला घडवा , पण आता जरा जरी शिक्षक ओरडले तरी किंवा फटकावलं तर लगेच पालक असे व्यक्त होतात की जणूकाही शिक्षकांनी जीव घ्यायचाच बाकी ठेवला आहे. त्यांची विचारसरणी जरी योग्य असली तरी ह्यात त्यांच्या पाल्याचे नुकसान आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. मला अशांचं फार आश्चर्य वाटतं कारण, यांच्याकडे कुठला दृष्टिकोन आहे तेच कळत नाही. हेच दगडी मूर्तींसमोर हात जोडतात , त्यांना पाया पडतात , त्याच्यासमोर नाक घासतात तेव्हा यांच्या मनात हा विचार येत नाही की , अरे ! ह्या मूर्तीला तर मूर्तिकाराने टाकी आणि घणाच्या सहाय्याने ठोकलं आहे , कोरलं आहे मग आपण या अशा मूर्तीला का नमस्कार करायचा , का नाक घासायचं , का त्याच्यासमोर कान पकडायचे? त्या मूर्तीकाराला पण आपण विरोध केला पाहिजे. नाही ना ! असं जर केलं तर इतक्या सुंदर मुर्त्या कशा घडतील? त्यांच्यात तो सात्विक भाव जर दिसला नाही तर आपण तिकडे पाया पडायला जाऊ का? आपल्यात भक्ती निर्माण होईल का? मग इथे ही तोच नियम लागू होतो. शिक्षकांना जर मुभा मिळाली तर ते नक्कीच अशा अनेक सुंदर मुर्त्या घडवतील की ज्या मुर्त्यांसमोर समस्त जग नतमस्तक होईल , त्यांची ख्याती दूरवर पसरेल आणि ह्याच मुर्त्या आपल्या देशाचं नाव उज्वल करतील यात शंका नाही. म्हणून सांगतो की , ते जे गाणं आहे ‘ छडी लागे छम छम , विद्या येई घम घम ’ ते अगदी योग्य आहे.

अखेरीस अशा शिक्षकांना विनंती की जे खरोखरच अमानुषपणे विद्यार्थ्यांना मारहाण करतात , त्यांनी जर आपलं वर्तन योग्य ठेवलं तर इतर जे सद्गुणी शिक्षक आहेत त्यांचं नाव खराब होणार नाही. लक्षात घ्या की मुर्तीकार जरी टाकी आणि घणाच्या मदतीने सुंदर मूर्ती घडवत असेल तरी तो त्या मुर्तीवर कलारूपी प्रेमाचा वर्षाव करत असतो आणि म्हणूनच त्या मुर्त्या सुंदर आणि वंदनीय बनतात. तुम्ही ज्या मुर्त्यांना घडवत असता त्यांनाही प्रेम मिळालं आणि योग्य त्या वेळी शिक्षा मिळाली तर त्या ही जगात वंदनीयच असतील. बाकी ज्यांनी आम्हाला शिकवलं , त्यांना आम्ही काय शिकवणार?

सगळ्या गुरूंना साष्टांग नमस्कार आणि शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

– आदित्य दि. संभूस.

#Teachers Day #5th September

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

1 Comment on शिक्षक दिन

  1. अतिशय हृदयस्पर्शी मोजक्या शब्दांत व्यक्त झाला आहात इतक्या नाजूक विषयावर त्याबद्दल आपले कौतुक आणि राहता राहिला प्रश्न या विषयाचा तर म्हटलेच आहे”परिवर्तन संसार का नियम है”काळ बदलला , शैक्षणिक धोरणे शिक्षण पद्धती बदलल्या तर बिचाऱ्या शिक्षक या निष्पाप प्राण्याने काय करावे

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..