अधिकाचे फळ अधिकच लाभते
अशा कथा ऐकते
तीसतीन ह्या वर्ष दिनाला
अभिनंदन करते ।
पोटी न आलीस
तुझ्या आईने भरली माझी ओटी
देवाजीने तुला नर्मिले
केवळ
आमच्यासाठी ।
घरात आलीस घरची झालीस
दूधात साखर पडली
दुध कोठले साखर कुठली
अवघी गोडी उरली ।
किती करिशी तू आमची सेवा
होऊ कशी उतराई
ह्या वास्तूतील वस्तू वस्तू
तुझे गोडवे गाई ।
गृहलक्ष्मी तू स्थान तुझे ग
घरच्या देव्हार्यात
दुर्गा होऊन झुंजून
करसी संकटावरी मात ।
जगावेगळे असे कसे हे
सासूसुनेचे नाते
दृष्ट लागो तुझ्यावरोनी
शब्दफुले उतरते ।
— सौ. सुधा मोकाशी
Leave a Reply