कैलासशैलविनिवास वृषाकपे हे
मृत्युंजय त्रिनयन त्रिजगन्निवास ।
नारायणप्रिय मदापह शक्तिनाथ
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ॥ ७ ॥
आपले रक्षण करण्याची प्रार्थना करताना भगवान आदि शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात,
कैलासशैलविनिवास – हिमालयातील कैलास पर्वतावर शैल म्हणजे शिखरावर विशेषत्वाने निवास करणारे. विशेषत्वाने म्हणण्याचे कारण तसे तर शिवतत्त्व संपूर्ण चराचर व्याप्त आहे. परंतु कैलासावर ते विशेषत्वाने निवास करीत असते त्यामुळे त्यांना आचार्यश्री कैलासशैलविनिवास अशा विशेष संबोधनाने आळवतात.
वृषाकपे – वृषा म्हणजे जीव. तर कपी शब्दाचा एक अर्थ आहे सूर्य. सर्व जीवांना सूर्याप्रमाणे ज्ञान, प्रकाश, ऊर्जा देतात ते वृषाकपी.
हे मृत्युंजय – मृत्यूवर विजय मिळवणारे, यांच्या कृपेने साधक मृत्यूवर विजय मिळवतात असे.
त्रिनयन – अंतर्ज्ञान प्रगट करणाऱ्या तिसऱ्या डोळ्याने युक्त.
त्रिजगन्निवास – स्वर्ग, मृत्यु ,पाताळ या तिन्ही लोकात निवास करणारे. तेथे निवास करणाऱ्या सर्व जीवांच्या अंतर्यामी असणारे चैतन्य.
नारायणप्रिय- भगवान श्रीविष्णूंना अत्यंत प्रिय असणारे असा एक अर्थ ,तर दुसरीकडे भगवान विष्णू ज्यांना अत्यंत प्रिय आहेत असे , अशा दोन्ही अर्थाने हा शब्द लागू पडतो.
मदापह – सकल दैत्य किंवा दुष्टांचा मद अर्थात शक्तीचा गर्व नष्ट करणारे, सर्वाधिक शक्ती संपन्न.
शक्तिनाथ – भगवती आदिशक्तीचे स्वामी.
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष – हे जगदीश्वरा ! या गहन संसार दुःखातून माझे रक्षण करा.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply