सुप्रसिद्ध नाटककार , कलाकार बाळ कोल्हटकर यांचा आज जन्मदिवस..२५ सप्टेंबर
महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट बाळकृष्ण हरी कोल्हटकर म्हणजे बाळ कोल्हटकर हे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू होते. बाळ कोल्हटकर यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२६ रोजी रोजी सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले. लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड . तसेच लेखनाचीही आवड त्यांना होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी ” जोहार ” हे आपले पहिले नाटक लिहिले.
१९४७ पर्यंत त्यांनी रेल्वे खात्यात नोकरी केली. त्यानंतर लेखनासाठी आणि रंगभूमीसाठी त्यांनी आपले पुढील आयुष्य वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली नाटकं ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत. ज्यांना पुर्वी लोक हसायचे आणि टिंगल करायचे अर्थात आजही करतात परंतु बाळ कोल्हटकर यांनी प्रेक्षकांची नेमकी नस ओळखली होती. अर्थात त्यांनी त्याच्या नाटकात अनेक वेगळे प्रयोगही केले होते. देव दीनाघरी धावला या नाटकात कुमार गंधर्व यांच्याकडून एक अजरामर गाणे गाऊन घेतले किंवा सीमेवरून परत जा किंवा ही तर संन्याशाची मुले या नाटकात वेगळेच कथानक लोकांसमोर ठेवले.
त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. बर्याच नाटकांचे हजाराच्या वर प्रयोग झाले. व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्ये जपली होती. ” दुरितांचे तिमिर जावो ” या नाटकांचे पंधराशे प्रयोग, ‘ वाहतो ही दुर्वाची जुडी ‘ या नाटकाचे चौदाशे प्रयोग, ‘ मुंबईची माणसे ‘ याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर ‘ एखाद्यांचे नशीब ‘ या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. यावरुन नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते. त्याच्या नाटकांमधील कविता हे एक वेगळेच आकर्षण होते , ते ज्या पद्धतीने कविता म्हणत त्या अत्यंत आकर्षक आणि जलद गतीने म्हणत त्यामुळे त्या आणखी आकर्षक वाटत.
बाळ कोल्हटकर हे अंबरनाथच्या खेर विभागात १९५९ ते १९७२ या काळात वास्तव्यास होते. त्यांनी ‘ वाहतो ही दुर्वांची जुडी ‘, ‘ वेगळं व्हायचे मला , सीमेवरुन परत जा , लहानपणा देगा देवा , देव दीनाघरी घावला , एखादी तरी स्मित रेषा , देणार्याचे हात हजार , उघडलं स्वर्गाचे दार , इत्यादी त्यांची गाजलेली नाटके. लिहिली. उघडलं स्वर्गाचे दार किंवा ही तर संन्याशाची मुले ही नाटके अत्यंत वेगळ्या ढंगाची , प्रयोगशील होती. दुरितांचे तिमीर जावो या नाटकामामधील भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेली गाणी आजही स्मरणात आहेत. त्यांनी एकंदर ३० हून अधिक नाटके लिहिली. त्याच्या बहुतेक नाटकाच्या नावात नऊ अक्षरे असत.
सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटूंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली. प्रेक्षकांना जे हवे, जे आवडते ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सुसूत्रतेनी बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषितवजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करुन नाटकं यशस्वी केली. ठाण्यात असलेल्या मो. ह . विद्यालयात म्हणजे आमच्या शाळेच्या रंगमंचावर खूप नाटके होत असत त्यावेळी बाळ कोळतकर यांची नाटके अनेकवेळा बघीतली, त्यांच्या कवितांचे आणि बोलण्याचे आम्हा मुलांमध्ये कुतूहल असे. मध्यंतर झाला की आम्ही मेकअप रुम मध्ये जाऊन भेटत असू , त्यांची स्वाक्षरी घेत असू.
नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. हेच एका नाटककाराचे आणि नटाचे मोठेपण आहे. अशा या ज्येष्ठ नाटककाराचे , कलाकाराचे ३० जून १९९४ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply