नमः शिवाभ्यां जटिलन्धराभ्यां
जरामृतिभ्यां च विवर्जिताभ्यां |
जनार्दनाब्जोद्भवपूजिताभ्यां
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां ‖ १०‖
भगवान शिवशंकर तथा देवी पार्वतीच्या दिव्य स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
नमः शिवाभ्यां – भगवान शंकर तथा देवी पार्वतीला वंदन असो.
जटिलन्धराभ्यां- हे दोघेही जटाधारी आहेत.
यात भगवान शंकरांचे स्वरूप तर सहज लक्षात येते. त्यांच्या मस्तकावर असणाऱ्या प्रचंड जटा प्रत्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांचे स्वरूप समजणे सोपे आहे.
आई जगदंबेला जे जटाधारी म्हटले ते तिच्या दिव्य केशकलापाचा विचार करून.
आई जगदंबेच्या विश्वविख्यात स्तोत्र असणाऱ्या ऐ गिरी नंदिनी ! या स्तोत्रात जे रम्य कपर्दिनी स्वरुपाचे वर्णन आहे, ते स्वरूप येथे अपेक्षित आहे.
तिच्या मस्तकावर असणाऱ्या त्या सुंदरतम केशसंभाराचे हे वर्णन आहे.
जरामृतिभ्यां च विवर्जिताभ्यां |
जरा म्हणजे म्हातारपण आणि मृती म्हणजे मृत्यू. या दोन्ही विकारांपासून हे दोघेही अलिप्त आहेत.
नित्यनूतन असणारे त्यांचे स्वरूप म्हातारपणाच्या स्पर्शाने कोमेजत नाही. किंवा मृत्यूच्या स्वरूपात गळून पडत नाही.
चिरंतन, शाश्वत असे ते तारुण्य अर्थात् आनंद, उत्साह यांचे प्रगटीकरण आहेत
जनार्दनाब्जोद्भवपूजिताभ्यां
जनार्दन म्हणजे भगवान विष्णू. अर्दन म्हणजे नष्ट करणारा. जनतेच्या पीडांना नष्ट करतात ते जनार्दन.
अब्जोद्भव म्हणजे भगवान ब्रह्मदेव. आप म्हणजे पाणी. त्यातून जन्माला येते ते अब्ज. अर्थात कमळ. त्या कमळातून जे जन्माला आले ते ब्रह्मदेव अब्जोद्भव.
हे दोघेही ज्यांची पूजा करतात, त्या
नमो नमः शङ्करपार्वतीभ्यां – भगवान शंकर आणि देवी पार्वतीला नमस्कार असो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply