सर्वज्ञो यो यश्च हि सर्वः सकलो यो
यश्चानन्दोऽनन्तगुणो यो गुणधामा।
यश्चाव्यक्तो व्यस्तसमस्तः सदसद्य
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।३।।
भगवान श्रीवैकुंठनाथांच्या अपार गुण वैभवाचे वर्णन करताना आचार्य श्री शब्दरचना साकार करतात,
सर्वज्ञो – भगवान सर्वज्ञ आहेत. अर्थात या जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ते जाणतात. यावेळी खरेतर त्यांच्या इच्छेनेच या सर्व गोष्टी घडत असतात.
कोणतीही गोष्ट त्यांच्यापासून अज्ञात नसते.
यो यश्च हि सर्वः – जे जे काही अस्तित्वात आहे असे वाटते ते सर्व अंतिमतः भगवत् तत्वच आहे.
याचा अर्थ आपल्याला पंचज्ञानेंद्रिय यांच्या माध्यमातून ज्या आकार इत्यादींचा अनुभव येतो त्या प्रत्येक गोष्टीचे मूळ स्वरूप त्या त्या गोष्टीचे अणू हेच असते. त्या सर्व अणूंच्या आत मध्ये चैतन्य आहे. ते चैतन्य हे भगवंताचे स्वरूप असल्याने शेवटी सर्व गोष्टींच्या मुळाशी भगवानच आहे.
सकलो यो – भगवान विविध कलांनी युक्त आहेत. येथे कला हा शब्द अवस्था या अर्थाने वापरला आहे. जशा चंद्राच्या कला. या सर्व अवस्थांमध्ये, अर्थात सगुण साकार स्वरूपात दृष्य असणाऱ्या गोष्टींमध्ये भगवानच नटलेला आहे.
यश्चानन्दो – आनंद हे भगवंताचे स्वरूप आहे.
अनन्तगुणो – भगवंताच्या गुणांना अंतपार नाही.
यो गुणधामा- जो सर्व गुणांचे अधिष्ठान आहे. घर अर्थात निवासस्थान आहे.
यश्चाव्यक्तो – भगवान श्रीहरी स्वतः अव्यक्त आहेत.
व्यस्तसमस्तः सदसद्य – मात्र तरीही लीला म्हणून या सर्व भासमान तथा वास्तव विश्वात व्यापलेले आहेत.
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – संसाररुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या त्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply