सृष्ट्वा सर्वं स्वात्मतयैवेत्थमतर्क्यं
व्याप्याथान्तः कृत्स्नमिदं सृष्टमशेषम्।
सञ्च त्यञ्चाभूत्परमात्मा स य एक
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे।।२२।।
भगवान या विश्वाची निर्मिती करतात असे आपण म्हणतो त्यावेळी अविद्ये मुळे भासणाऱ्या या संसाराच्या प्रातिभासिक स्वरूपाला निरूपणापुरते मान्य केलेले असते.
आत्मज्ञानी सिद्धाच्या दृष्टीने जगाची उत्पत्तीच घडलेली नसते. मात्र सर्वसामान्य जीवांच्या दृष्टीने अनुभवाचा विषय असणाऱ्या या जगाला सर्वस्वी नाकारणे संभव नाही. अशावेळी त्याच्या भासमान स्वरूपाला मान्य करीत त्याचा कर्ता रूपात भगवंताचे वर्णन केले जाते.
अशा स्वरूपातील या जगताची निर्मिती भगवान कसे करतात? याचे विश्लेषण आचार्य श्री प्रस्तुत श्लोकात करीत आहेत.
ते म्हणतात,
सृष्ट्वा सर्वं स्वात्मतयैवेत्थमतर्क्यं – हे सर्व अतर्क्य विश्व भगवान आपल्याच शक्तीने निर्माण करतात.
यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली म्हणजे या जगाची अतर्क्य अवस्था. हे जग नेमके कसे आहे ते सांगता येत नाही. याची रचना स्वप्नाप्रमाणे आहे. स्वप्नात असणाऱ्या माणसाला जोपर्यंत तो स्वप्नात असतो तोपर्यंत ते स्वप्न सत्यच वाटत असते. मात्र उठल्याबरोबर त्याचे असत्यत्व सहज जाणवते.
त्यामुळे स्वप्न सत्य की असत्य हे जसे एका शब्दात सांगता येत नाही, तशीच या जगाची रचना आहे.
दुसरी गोष्ट हे जग भगवान आपल्या शक्तीने निर्माण करतो. अर्थात भगवंताला अन्य कशावरही अवलंबून राहावे लागत नाही.
व्याप्याथान्तः कृत्स्नमिदं सृष्टमशेषम् – या निर्माण केलेल्या जगामध्ये भगवान स्वतः आज सर्वत्र व्यापलेला आहे. या जगाची राहाटी चालायची असेल तर त्यासाठी चैतन्य हवे. चैतन्य हा भगवंताचा स्थायीभाव आहे. जगात सर्वत्र दिसणारी गती त्याचं चैतन्याचा आविष्कार असल्याने सर्वत्र परमात्मा भरला आहे अशी भूमिका मांडली आहे.
सञ्चत्यञ्चाभूत्परमात्मा स य एक – अशा स्वरूपात तो एकच परमात्मा सत्य आणि असत्य स्वरूप होऊन, म्हणजे स्वतःला सत्य स्वरूप असून जगाच्या रूपात असत्य स्वरूपदेखील भासमान होऊन, एकटाच कार्य करतो,
स्तं संसारध्वान्तविनाशं हरिमीडे – क्या संसार रुपी अंधकाराचा विनाश करणाऱ्या श्रीहरीचे मी स्तवन करतो.
प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply