– काहीतरी हरवलं होतं.
काय आणि कधी ते मात्र लक्षात येत नव्हतं .
पहाटेपासून विधिवत पंचामृती पूजा चालली होती .
मांगलिक स्नानानंतर भाळावर चंदनलेपाची विशिष्ट मुद्रा आरेखित झाली होती.
वस्त्रप्रावरणांनी देहाला आलंकृत करणं सुरु होतं.
तुळशीचे प्रचंड हार गळ्यात घातल्यानंतर गुरुजींनी प्रथेनुसार दर्पण समोर धरला .
आणि विठुराया पाहात राहिला .
आपलाच चेहरा त्याला परका वाटू लागला .
ज्या मुखमंडळाची शोभा भक्तांना अवर्णनीय वाटायची , ज्या मुखदर्शनानं अनंत जन्माचं सुकृत फळाला आल्याचं सुख मिळायचं, ज्या प्रसन्नवदनाच्या दर्शनाची ओढ, भवसागर तरून जाण्यासाठी पंढरीच्या वारीला निमित्तमात्र व्हायची…
ते मुखकमल ,विठुरायानं दर्पणात पाहिलं आणि त्याच्या अंतर्यामी वेदनेचा महासागर उसळला .
आजूबाजूला महाआरतीचा , त्याच्या नामाचा , टाळघोषाचा, मृदंगाचा कल्लोळ , आसमंत भेदून जात होता .
पण निळासावळा सुकुमार पंढरीराया अस्वस्थ होऊन एकटेपणा सोसत होता .
कारण दर्पणात जे दिसलं , त्यामुळं परब्रह्माला अनंत यातनांची जाणीव झाली .
योगियांचा योगी असणाऱ्या विठ्ठलाची ‘ दृष्टी ‘ हरवली होती .
– केव्हा…
– कुठे…
– कधी …
– काहीच जाणवलं नव्हतं .
तो पाहत होता .
दर्शन घेणाऱ्यांच्या रांगा अव्याहत सुरु होत्या .
विठुराया दूरदूर पर्यंत पाहत होता .
हरवलेली ‘दृष्टी ‘ दिसत नव्हती .
कुणाच्याही काहीही लक्षात येत नव्हतं .
सर्व सोपस्कार , कार्यक्रम सुरु होते .
अंतर्यामी दुःखी असलेला राजसराया , शोध घेत होता .
– आणि त्याला अचानक काहीतरी जाणवलं .
नंतर दिसलं .
समोरून एक लहानगं बालक आपल्या बाळमुठी घट्ट आवळून , धावत त्याच्याकडे येत होतं.
बालक जवळ आलं आणि स्वतःच्या कटीवर हात ठेवून , डोळे मोठ्ठे करून एकदा बाप्पाकडे पाहिलं .
आणि गालाला गोड खळी पाडणारं स्मितहास्य करीत , दोन्ही हात फैलावून त्यानं बाळमुठी उघडल्या .
विठुराया बघत राहिला .
त्या मुठीत होती निरागसता .
त्या मुठीत होतं सुखाचं ,कैवल्याचं चांदणं .
पंढरीरायाला त्याची हरवलेली ‘ दृष्टी ‘ सापडली होती .
गेली अनेक वर्षे ,स्वतःला भक्त म्हणवणाऱ्यांच्या अशक्यप्राय मागण्यांमुळे ती हरवली होती .
कृत्रिम संवेदनशीलतेनं ती झाकोळली होती .
दांडगाईमुळं आणि अव्यवस्थेमुळं दर्शन न मिळाल्यानं , परत जाणाऱ्या खऱ्या भक्तांच्या , वारकऱ्यांच्या निराश , हताश मनात ती लपली होती .
प्रसिद्धीचं अवडंबर माजवणाऱ्या आणि सगळ्या प्रकारच्या कलांचा बाजार करणाऱ्यांच्या धनलोभात दृष्टी घुसमटली होती .
– आणि आता ती परत मिळाली होती . त्या बालकामुळे !!
विठुराया , विटेेवरून खाली उतरला . त्यानं त्या बालकाला उचलून घेतलं आणि भक्तांच्या महासागरातून तो सुसाट धावू लागला , एकांतवासाच्या शोधात …
— भक्तांचा महासागर सर्वच गोष्टीपासून अनभिज्ञ होता .
पाषाणाच्या मूर्तीत देवत्व शोधत होता , पाषाणासमोर साकडं घालत होता .
— आणि विठुरायाचं देवत्व, बाळमुठीत असलेल्या दिठी त सामावलं होतं…
— डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
Leave a Reply