नवीन लेखन...

तीन चिंतन कथा !

।। एक ।।

आजोबांना तो सगळा खजिना एकदा पहायचा होता .
काल रात्रीपासून त्यांनी आजीजवळ हट्टच धरला होता .
” या नव्या घरात माझी सगळी पुस्तकं कुठे ठेवली आहेत , तेवढं सांगा , मरण्यापूर्वी एकदा डोळे भरून पाहायचा आहे खजिना .”
आजीच्या डोळ्यात पाणी आलं .
नव्या घरात राहायला आल्यावर दोन वर्षात पुस्तकं कुठे , कशी ठेवली आहेत हे पहायला वेळच मिळाला नव्हता .
पण ती एका स्वतंत्र खोलीत एका मोठ्या कपाटात ठेवली होती , हे तिला माहीत होतं .
आजोबांनी विकत घेतलेली , असंख्य विषयावरची , दुर्मिळ पुस्तकं हा दोघांचा अभिमानाचा , नेहमीच्या चर्चेचा विषय होता . नेहमीचे व्यापताप पार पडल्यावर रोज थोडं तरी वाचन हा दोघांचाही विरंगुळा , बौद्धिक व्यायाम आणि सर्व प्रकारच्या रोगावरच औषध होतं जणू .
पण गेल्या काही दिवसात मुलं , नातवंडं , पतवंडं , पै पाहुणा यात पुस्तकांकडे दुर्लक्ष झालं होतं .
पण काल रात्री मात्र नव्वदीला आलेल्या आजोबांना पुस्तकांची ओढ गप्प बसू देत नव्हती .
शेवटी ऐंशी पार केलेल्या आजीनं सांगितलं .
” उद्या सकाळी उठल्यावर आपण दोघंही पुस्तकं बघू , आत्ता झोपा तुम्ही .”

आणि सकाळी उठल्यावर आजी आजोबांना हाक मारू लागली , तेव्हा ते गादीवर नव्हते .
आजोबांना शोधत आजी दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पुस्तकांच्या खोलीत आली .
समोरचं दृश्य बघून एकदम ओरडली .
आणि धाडकन खाली पडली .

– आजोबांचा निश्चेष्ट देह खाली पडला होता .
आणि समोरच्या उघड्या मोठ्या कपाटातून झुरळं , वाळवी बाहेर पडत होती .
वाळवी लागल्यानं पुस्तकांनी प्राण केव्हाच सोडले होते आणि आता वाऱ्याबरोबर कागदाचा चुरा इतस्ततः उडत होता .
अनाथ झालेली , निराधार झालेली अक्षरं सैरभैर होऊन मूकपणे रडत होती…


।। दोन ।।

– पुस्तकांनी आत्महत्या केल्याची बातमी तशी नवीनच होती .
पण मीडियाला हवीतशी ब्रेकिंग न्यूज मिळाली होती .
सगळा मीडिया त्या मोठ्या शहरातील सर्वात मोठ्या आणि सर्वात जुन्या वाचनालयाकडे धावत होता .
कारण तिथेच तर पुस्तकांनी गळफास लावून आत्महत्या केली होती .

दृश्य विदारक होतं .
एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात पुस्तकं आत्महत्या कशी करू शकतात ? त्याला कारण काय असावं ? पुस्तकांनी सुसाईड नोट लिहिली आहे का ? त्यात कुणाचा उल्लेख आहे ? हे राजकारण आहे की यात कुठल्या परकीय शक्तीचा हस्तक्षेप आहे ? अनुदान मिळालं होतं , की ते न मिळाल्यानं पुस्तकांनी वाचनालयाला वाचवण्यासाठी जीव दिला ?
असे असंख्य प्रश्न मीडिया विचारू लागला होता .
अशिक्षित सुशिक्षित , लहानथोर , स्त्रीपुरुष अशा अनेकांचे बाईट्स घेतले जाऊ लागले होते .
तेवढ्यात कुणाच्या तरी डोक्यात आलं , सीसीटीव्ही चं फुटेज बघायला हवं .
कुणीतरी फुटेज बघायला धावला .
आणि अचानक एक पुस्तक गळफास लावून घेण्याआधी एक कागद फडकवताना त्या फुटेज मध्ये दिसलं .
पोलिसांनी तो कागद शोधला .
आणि त्यावरचा मजकूर वाचून सगळे गारठले .
त्यात लिहिलं होतं.
” आम्ही सगळी पुस्तकं ठरवून आत्महत्या करीत आहोत . कारण सोशल मिडियामुळं आमचा वाचकवर्ग दुरावला आहे . नवीन वाचक आमच्याकडे ढुंकून बघत नाहीत . फार थोडे वाचक आम्हाला वाचतात . लेखकवर्ग नामशेष होत चालला आहे . मुद्रक , प्रकाशक , विक्रेते सगळे संपत चालले आहेत , त्यामुळे आम्ही जागून काय करायचे , म्हणून आम्ही आत्महत्या करीत आहोत . यासाठी कुणाला जबाबदार धरू नये .”

सगळे सुन्न झाले होते .
आणि तथाकथित चमकू लोक बाईट्स देण्यासाठी कॅमेऱ्यांपुढे नाचू लागले होते …


।। तीन ।।

वाढदिवस असूनही चिन्नू अस्वस्थ होती .
हॉल सजवला होता .
तिच्या आवडीची डिश खास आजीनं बनवली होती .
तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणी आल्या होत्या .
तिच्या आवडीचं संगीत , तिच्या आवडीचा ड्रेस … सगळं सगळं तिला हवं तसं .
पण ती नाराज . अस्वस्थ . डोळे तर भरून आलेले .
दादा अजून आला नव्हता .
दर वाढदिवसाला तो मुद्दाम येतो .
काल रात्री त्याचा फोन आला होता .
येतो म्हणाला होता .

पण सकाळी बाबा आईला सांगताना तिनं ऐकलं होतं .
“आज दादा येईल असं वाटत नाही .संपूर्ण लॉकडाऊन आहे . ”
तेव्हापासून ती अस्वस्थ झाली .
दर अर्ध्या तासानं दाराकडे जाऊन येऊ लागली . खिडकीतून , गॅलरीतून वाकून बघत राहिली .
संध्याकाळ झाली तरी दादा आला नाही .
सगळे जमा झाले , सजावट झाली , सगळ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या , गिफ्ट्स दिली .
पण ती सगळ्यात असून नसल्यासारखी बसून होती .
सर्वांनी समजूत काढूनही उपयोग होत नव्हता .
– आणि कुठल्यातरी क्षणी बेल वाजली .
ती वाऱ्याच्या वेगाने दाराकडे धावली .
दार उघडलं .
आणि बघत राहिली .
समोर तिचा दादा उभा होता आणि त्याच्या हातात भरपूर पुस्तकं होती .
ती आनंदानं निथळली .
” चिन्नू , तुला म्हटलं होतं ना मी येणार म्हणून . बघ आलोय . हां आता थोडा उशीर झाला , पण तू सांगितलेली सगळीच्या सगळी पुस्तकं आणून द्यायची होती , म्हणून उशीर झाला , आता राग गेला ना ?”

सगळे हसू लागले .

वाढदिवस , गिफ्ट्स, खाऊ, मित्रमैत्रिणी , डिश याकडे चिन्नूचं लक्षच नव्हतं .
हे सगळं केव्हा एकदा संपतंय आणि दादानं आणलेल्या पुस्तकांच्या जगात केव्हा एकदा शिरतोय असं तिला होऊन गेलं होतं .

— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
——-
चिंतनकथा सर्वत्र पाठवायला हरकत नाही , अर्थात नावासह !

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 118 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..