नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांचा परिसर कसमादे पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करुन शेती उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयोग देवळा येथील पेशाने शिक्षक असलेल्या संजय देवरे या शेतकऱ्याने केला आहे. हळदीचे पीक घेऊन त्याचे जास्त उत्पादन काढण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी करुन दाखविला आहे.
कसमादे पट्टा हा तसा नेहमीच अवर्षण प्रवण राहिला आहे. पाण्याच्या दुर्भिक्षामुळे शेतकरी बांधवांना शेती करताना तारेवरची कसरत करावी लागते. परंतु पर्जन्यमान अल्प प्रमाणात असले तरीही या पट्ट्यातील शेतकरी आपल्या मेहनतीच्या जोरावर गहू, कांदा, मका या पिकांबरोबरच डाळिंबाचे उत्पादन घेतात.
शेतकऱ्यांसाठी विविध नवनवीन शेती तंत्रज्ञान विकसित होत आहेत. या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी आता शेतकरी देखील पुढे येत आहेत. आज शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी करून आपल्या जीवनात उत्कर्ष साधत आहेत. देवळा येथील संजय देवरे यांनी शेतीत नवीन प्रयोग करावयाच्या ध्यासाने दोन वर्षांपासून हळद पिकाची लागवड करुन नाशिक जिल्ह्यात पहिला प्रयोग यशस्वी करुन दाखविला आहे. हे करताना त्यांनी अत्यल्प पाऊस, मजुरांची कमतरता, खते व बियाण्याच्या वाढलेल्या किमती, विहिरींनी गाठलेला तळ या सर्वांवर मात करीत, आधुनिक शेतीचा ध्यास घेत पारंपरिक शेतीला फाटा दिला आहे.
दोन वर्षापूर्वी देवरे यांनी सांगली येथून दोन क्विंटल शेला जातीचे हळद बियाणे आणून फक्त दहा आर शेज जमिनीत लागवड केली. दहा आर क्षेत्रात त्यांनी पंधरा क्विंटल हळदीचे उत्पादन घेतले. त्यांनी या वर्षी स्वत: बियाणे तयार करुन दीड एकर क्षेत्रात हळद पिकाची लागवड केली. साधारणत: दोन ते तीन फूट वाढणाऱ्या हळदीच्या रोपट्याने देवरे यांच्या शेतात पाच फूट उंची गाठली आहे. त्यांना या वर्षी एकरी दहा टन उत्पन्न मिळेल अशी खात्री आहे. मागील वर्षी हळद पावडर तयार करुन विकल्याने त्यांना २५० रुपये किलो इतका भाव मिळाला आहे.
हळद लागवडीसाठी देवरे यांनी शेतात मशागत करुन कोंबडी खत, शेणखत, निंबोडी पॅड एकत्र करुन टाकली. पाच फूट सरी, ठिबक सिंचन सुविधा करुन हळद लागवड केली. तसेच १८:४६ सुपर फॉस्फेट व फोरेस्ट एकत्र करुन सरीवर टाकले. लागवडीनंतर दीड महिन्याने १९:१९:१९ एकरी तीस किलो, तीन महिन्यानंतर ०.५२.३४ एकरी पंचवीस किलो व पाच महिन्यानंतर १२:६१ एकरी पंचवीस किलो टाकले. तसेच डीप मधून सहा महिन्यात एका वेळेस अमोनियम सल्फेट दिले. हळद पिकावर शक्यतो कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्च येतो व मजूरही कमी लागतात.
देवरे यांनी हळदीचे पीक घेताना केलेल्या प्रयत्नांची ही माहिती अन्य शेतकऱ्यांनाही उपयुक्त ठरावी अशीच आहे. नवीन प्रयोग करण्याची उर्मी व जिद्द असल्यास यश नक्कीच मिळते, असा विश्वास या निमित्ताने देवरे यांनी व्यक्त केला आहे.
— मराठीसृष्टी
Leave a Reply