सगळीकडे रिक्षा, टेम्पो, छोटा हत्ती, सुमो, मॅजिक, डीआय, इ. वाहने भराभर पळतांना आपण बघतो. सामान्यांची हीच वाहने असतात. आमच्या लहानपणी मात्र प्रवासासाठी बैलगाडीच होती. आज काही लोक कारने आलीशान प्रवास करतात, तसा आमचा बैलगाडीचा प्रवास ही आलीशान होता.
आदल्या दिवशी बेसरमीचे फोक आणणे, बेसरम म्हणजे नदीकाठी कितीही तोडली तरी उगवणारी झाडी म्हणूनच त्याला असे नाव पडले असावे. काही जण त्याला बाडर पण म्हणतात. तसे निरुपयोगी तरी ताटवे, झोपड्या वळई, यासाठी वापर व्हायचा. गरजवंताला बेशरम कामी यायचे बाकी त्याकडे ढुंकून सुध्दा कोणी पाहत नसे. अशा या बेसरमाच्या फोकाचा तट्टा केला जायचा. आहो, तट्टा म्हणजे गाडीचे टॉप त्यावर एक चवाळं झाकून सावली केली की कार मध्ये बसल्यासारखे वाटायचे. पाट्या रुतू नये म्हणून सतरंजीखाली बाटूक म्हणजे ज्वारीचा हिरवा चारा टाकून मऊ गादी व्हायची. साट्याला पाठीमागे तीन चार पेंड्या बांधायच्या म्हणजे बैलांची सोय अर्थात गाडीचे पेट्रोल समजा. मुंगा दोरीने बांधतांना मराठी चार अंकासारखी वर-खाली एक नक्षी तयार व्हायची. या विशिष्ट पध्दतीने दोरी बांधण्याला मुंगा बांधणे म्हणत. ही जशी बैलगाडीची डिकीच होती. आमच्या बैलगाडीचा लूक कारप्रमाणे मनमोहक होता. चाकांला वंगण म्हणजे सर्वीसिंगसाठी एनीटाईम नळा असायचा लाकडी बांबूचे पाईपसारखे असलेले व वंगण ठेवून काळे ढूस झालेले साधन ज्यात एका ताराला कपडा बांधून ड्राॅपर सारखा वापर केला जाई. गाडी जर कूई कुई करू लागली तर गाडीच्या ‘आकाला’, हा काही ‘क्या चाहिए बोल मेरे आका ?’ तसा आका नव्हे, आक म्हणजे सोप्या भाषेत एक्सल नावाचा गाडीचा एक पार्ट याला वंगण घालावे लागते. बैल जोडी चांगलीच की मग काय, रेस लागायची गाडी दामटायची. दामटायच्या पध्दती वेगळ्या चाबुक मारुन ही काॅमन पध्दत पण जर अधिक वेगाने दामटायची तर बैलाच्या शेपटी पिळायच्या, कधी तर तोंडात धरून शेपटीला चावायचे मग बैल उधळत रहायचे. सडकेवर आल्यावर लाल रंगाची बस दिसली की बैल बुजू लागले की कासरे ओढून ब्रेक लावला जाई. ब्रेक, क्लच, स्टेरींग सबकुछ कासराच. बैलाला साज घालायचा, मटाट्या, घुंगूरमाळा त्याचा गाडी पळतांना छुळूमSछुळूमS आवाज व्हायचा ही असायची स्मूथ फायरिंग आमच्या गाडीची.
उन्हाळ्यात गाडीची विशेष काळजी घ्यावी लागायची लांबचा प्रवास असेल गाडीच्या धावा गरम होऊन निखळून पडण्याची शक्यता. अशा वेळी काही अंतरावर गेलो की चाकावर पाणी टाकायचे त्यामुळे लाकडी चाकं पाण्यामुळे फुगायचे अन् धावपट्टी लोखंडी, ती थंड होऊन प्रसरण पावण्याचा धोका नसायचा. आम्ही समोरील सीटवर बसायचा हट्ट करत असत. पाय सोडून मस्तपैकी बसता येई. गाडीत अधिक पँसेजर झाले तर जिपच्या ड्रायव्हर प्रमाणे आमचा गडी धु-यावर बसे ॲक्सीडेन्टचे प्रमाण खूप कमी होते. प्रदूषण ही नसायचे प्रवासाला खूप मज्जा येई. त्या अलीशान प्रवासाची सर आता एसी कारने केलेल्या प्रवासाला कधीच येत नाही.
— संतोष सेलूकर , परभणी
मो. 7709515110
Leave a Reply