नवीन लेखन...

दौलतजादा (रहस्यकथा)

प्रवीण देसाई. इंपोर्ट – एक्सपोर्ट व्यापारी. नुसताच व्यापारी नव्हे तर त्या व्यवसायातला बादशहा. आता बादशहा म्हटला म्हणजे धनदौलत मजबूतच असणार हो. तसा पैसा बक्कळ होता. अगदी ऐषआरामात लोळतच होता तो!

तर अशी दौलतजादा झाली म्हणजे काही लोकांना ती सत्कार्याला लावावी, गोरगरिबांना दानधर्म करावा, शैक्षणिक संस्थांना मदत करावी, विधायक कामाला लावावी असे वाटते. पण असं वाटणारे फार थोडे असतात. बहुतेक वेळा लक्ष्मी आली की सद् विचार आणि सरस्वती पळ काढतात. सरस्वती आणि लक्ष्मीचे पटत नाही म्हणतात. फार पुण्याई लागते तेव्हाच त्यांचे पटते. अन्यथा जादा दौलत असली म्हणजे अशा लक्ष्मीपुत्रांना दौलतजादा करायची खुमखुमी येते. पैशांचा खणखणाट आणि पुंगरांचा झनझनाट साथ साथ पावलं टाकू लागतात. पाय घसरतो, पाऊल वाकडे पडते, तसे पडायला थोडेसेही निमित्त पुरते.

प्रवीणला तसे निमित्त मिळाले. जोगेश्वरीच्या लव्हबर्डस् डान्सबारमध्ये त्याला हेलन भेटली. भेटली म्हणजे त्याने तिला पाहिली आणि तो पागलच झाला. तिच्या झिरझिरीत वस्त्रांतून दिसणारे तिचे आरस्पानी सौंदर्य त्याला वेडावून गेले. तिच्या सहवासाची त्याला आस लागली. तो मुक्तहस्ताने तिच्यावर दौलतजादा करू लागला. पण हेलनने असे खूप ढग पाहिले होते. पाऊस पाडून रिते होणारे. तिला एका ढगाचे काय कौतुक? तिच्या दृष्टीने असे उल्लू गि-हाईक म्हणजे पर्वणीच. त्याला चार हात लांब ठेवून कळ लावायची, पाणी थेंब थेंब आणि मग धो धो गाळून त्याला रिकामा करायचा या कलेवर तर तिचा व्यवसाय चालू होता. प्रवीण मात्र तिच्यासाठी वेडापिसा झाला होता. त्याला आता नुसती कळच काय कळांवर कळा यायला लागल्या. तिच्या विना त्याची अगदी अवकळा व्हायला लागली. त्याने आपल्या पैशांचा भव्य पिसारा फुलवला आणि या चंट लांडोरीला वश करायचा अगदी चंगच बांधला. लवकरच तिच्या लक्षात आलं की आसामी बडी आहे. आता आपली घडी जमवायला काही हरकत नाही.

एकदा प्रवीणबरोबर ती खंडाळ्याला गेली. तिथे फरियाझ या पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रवीणने त्याचा नेहमीचा लक्झरी सूट घेतला. दोन तीन दिवस मनसोक्त सहवासात घालवले. प्रवीणचे वैभव पाहून ती थक्क झाली. डान्सबारची रोजची मगजमारी आणि घाम फुटेस्तर अंग घुसळायचे आणि कंबर लचकेस्तोवर नाचायचं, त्यापेक्षा प्रवीणचा प्रस्ताव तिने मान्य करण्याचे ठरवले.

काय होता त्याचा प्रस्ताव? तिने फक्त प्रवीणशी दोस्ती ठेवावी. त्याच्यासाठीच नाचावे. तो म्हणेल तेव्हा त्याची करमणूक करावी. त्या बदल्यात तो तिला एक मस्त फ्लॅट घेऊन देईल. महिन्याला तीस हजार रुपये आणि तिच्या लहान मुलाला महिना वीस हजार रुपये देईल. तिचा मुलगा तिच्या आईवडिलांकडे परळला होता. तिकडे तो पैसे पाठवील. थोडक्यात त्याने तिला ठेवल्याचा तो प्रस्ताव होता. हेलनचे तर नशीबच खुलले. पण तिने तसे दाखवले मात्र नाही. प्रवीण अगदी मागेच लागला तेव्हा खूप आढेवेढे घेऊन अगदी नाईलाजच होतोय असे दाखवून आपला वेढा तिने चांगला पक्का केला आणि मगच त्याचा प्रस्ताव स्वीकारला. वेढा गच्च आवळला.

घाटकोपरला त्याने तिच्यासाठी एक छान फ्लॅट घेऊन दिला. तिच्या मुलाची सोय लावली आणि त्याने मनाला येईल तसा तिचा उपभोग घ्यायला सुरुवात केली. त्याचे लग्न झाले होते. दोन मुलेही होती पण घरी न सांगता त्याचे हे प्रकरण गुपचूप चालू होते. धंद्याच्या निमित्ताने त्याला बाहेरगावी, परदेशी जावे लागत होते. त्या बहाण्याखाली तो हेलनकडे जात असे. हेलनचा जास्तीत जास्त सहवास घ्यायची एकही संधी तो सोडत नसे. अगदी पागलचं झाला.

त्याचे हे प्रकरण अगदी छान चालू होते. एकदा प्रवीणची परदेशवारी फारच लांबली. फार म्हणजे अगदी महिनाभर. हेलन घरी बसून कंटाळली. डान्सबारच्या वातावरणाला चटावलेली ती फुलपाखरी मनोवृत्तीची बाई. तिला एकाच फुलावर बसायला कसे आवडणार? त्यातूनही ते फूल महिनाभर उमलणार नाही म्हटल्यावर तिची कळी कोमेजली. तसा प्रवीण तिला रोज फोन करीत होता. पण फोनवर बोलणे आणि प्रत्यक्ष सहवास यात जमीन अस्मानाचा फरक होता. तो फरक कमी करायचा तर तिला किंवा प्रवीणला अस्मानातूनच यावे-जावे लागले असते. पण हेलन भेटल्यापासून प्रवीणला जरी अस्मान ठेंगणे झाल्यासारखे वाटत होते तरी अमेरिकेहून रोज विमानाने यायचे म्हटले तरी त्याच्यासारख्या जादादौलतवाल्यालाही हे अस्मान फारच मोठे होते.

हेलनच्या मादक सहवासाच्या आठवणी काढीत बोट चोळत बसण्याखेरीज त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. इकडे हेलनची परिस्थिती पाण्यातून बाहेर काढलेल्या मासोळीसारखी झाली होती. पुरुष सहवासाला चटावलेली मदनिका ती, दोनचार रात्रीतच तिने घराला कुलूप ठोकले, आपला जुलुमाचा दादला सोडला आणि डान्सबारचा रस्ता पकडला. प्रवीणला याचा पत्ताच तिने लागू दिला नाही. हा परिपाठ तिने प्रवीण आल्यावरही मोठ्या खुबीने चालू ठेवला. प्रवीणची येण्याची वेळ आणि दिवस तिला माहीत होते. तेवढे ती चलाखीने मॅनेज करीत होती. डान्सबारमधली कमाई ही तिची वरची कमाई झाली. दुहेरी फायदा. ती निष्णात नाचणारी होतीच, आता तिने दोन डगरीवर पाय ठेवून नाचण्यात प्रावीण्य संपादन केले. प्रवीण परीक्षाच पास केली म्हणाना! तिच्या अपरोक्ष प्रवीण आला तर तो तिला मोबाईलवर संपर्क करी. कधी शॉपिंगला गेले, पिक्चरला गेले, घरी एकटीला कंटाळा येतो अशा सबबी सांगून ती वेळ मारून नेई. घरी आल्यावर प्रवीणच्या रागावर आणि प्रेमज्वरावर कोणती मात्रा द्यायची हे तिला ठाऊक होते. अशा पागल रुग्णांना बऱ्या करणाऱ्या जडीबुट्यांचा तिच्याकडे तोटा नव्हताच. दिवस मजेत चालले होते. आणि अशातच एके दिवशी त्याचा मित्र राजेश आला.

“हाय प्रवीण, अरे यार अलीकडे असतोस कुठे? डान्सबारमध्ये पण दिसत नाहीस?’ राजेश पूर्वी प्रवीणबरोबरच लव्हबर्डस्मध्ये जात होता. पण त्याच डान्सबारमधले एक पाखरू प्रवीणने गटवले आहे हे त्याला माहीत नव्हते.

“अरे यार या धंद्यात जाम गुंतलोय आजकाल.’ राजेशने बराच आग्रह केला पण प्रवीणने त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. थोडेफार बोलून काम फार आहे असे दाखवून त्याला कटवले. पण जाता जाता राजेश म्हणाला, “प्रवीण यार लव्हबर्डस्मधले एक पाखरू मध्यंतरी गायब झाले होते आता परत आले आहे. तू ओळखतोस ते?”

“असं? काय नाव त्याचे?”

“हेलन!”

नाव ऐकताच प्रवीण चपापला. आपण हेलनला गटवले आहे हे राजेशला माहीत नाही याची प्रवीणला माहिती होती. त्याने दिलेल्या माहितीने तो चांगलाच हादरला. आपण आश्रय दिलेली बाई पुन्हा तिचा पूर्वीचा उद्योग करू लागली, तेही आपल्याला पत्ता लागू न देता हे समजताच आतल्या आत संतापाने तो पेटून उठला. पण राजेशला तशी काही कल्पना न देता तो गेल्यावर त्याने हेलनला आज रात्री या विश्वसघाताचा जाब विचारायचे ठरवले. नंतर थोड्या विचारांती त्याने हेलनला खंड्याळाला घेऊन जायचे आणि तिकडेच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा असे ठरवले.

हेलनला तिच्या दुटप्पी वागण्याचा काहीही संशय येणार नाही अशा बेताने दोनचार दिवसांनी तो तिला घेऊन खंडाळ्याला आपल्या नेहमीच्या हॉटेल फरियाझच्या लक्झरी सूटमध्ये घेऊन गेला. तिथे पोहोचेपर्यंत त्याने तिच्याशी प्रेमाचे नाटक केले. हेलननेही नाटकात आपल्या परीने रंग भरला. कलाकुसर केली. काही कसूर केली नाही.

सूटवर पोहोचताच तिने प्रवीणला जवळ ओढले आणि त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव सुरु केला. पण प्रवीणचा थंड प्रतिसाद पाहून ती म्हणाली,

“डार्लिंग काय झाले?”

“हेलन, तू माझा विश्वासघात का केलास?” प्रवीणने आपला घुस्सा मोकळा केला.

“विश्वासघात? म्हणजे?’ तो प्रश्न ऐकून प्रवीणचा घुस्सा, जो आतापर्यंत त्याने काबूत ठेवला होता त्याचे आगीतच रुपांतर झाले. तो ओरडला,

“यू रास्कल! बीच!”

“ए मिस्टर! ओरडू नकोस! काय झालंय तुला?” हेलनने त्याच्या वरची पट्टी लावली.

“पुन्हा थोबाड वर करून विचारतेस? रांडे, तुला घर दिले, पैसा दिला. सगळी सुखं देतोय, तुझ्या मुलाला राजासारखा ठेवलाय तरी तू पुन्हा त्या डान्सबारमध्ये शेण खायला जातेस? मलाही न सांगता? यू स्काउंड्रेल?’ प्रवीणने पुढची पट्टी लावली. पण हेलन काय त्याला दाद थोडीच देतेय? तिने त्याच्याही वरच्या पट्टीतला सूर लावून व्हॉल्यूम वाढवला.

‘कीप क्वायट्! तू काय मला तुझी लग्नाची बायको समजतोस काय? करतोस माझ्याशी लग्न? देतोस का तुझ्या बायकोला डायव्होर्स? हे पाहा मिस्टर प्रवीण मी अधूनमधून डान्सबारमध्ये गेले तर काय बिघडले? तू म्हणतोस तेव्हा मी येतेच ना? मग झाले तर! पुन्हा माझ्यावर ओरडलास तर बघ. काय समजतोस काय तू स्वत:ला? मी रांड काय? आणि तू कोण रे? कुत्रा आहेस कुत्रा! दिसली कुत्री की लागला हुंगायला. अरे असे छप्पन्न कुत्रे लागतील माझ्या मागे!”

आपल्याला या छिनाल बाईने कुत्रा म्हणावे याचा प्रवीणला संताप आला. ती कुत्री होती तरी तो काही साधा कुत्रा नव्हता. खानदानी होता. दौलतवाला होता. हायब्रीड होता. त्याला हा अपमान कसा सहन व्हावा? पण त्याने शेण खाल्ले होते. आता शेणातले किडे तोंडात जाणारच! त्याची बुद्ध भ्रष्ट झाली. तो पिसाळलाच. संतापाने त्याने हेलनवर झेप घेतली आणि दोन्ही हातांनी तिचा गळा दाबला. गच्च दाबला! दाबूनच धरला! अगदी तिची धडपड शांत होईपर्यंत! “कुत्रा म्हणते साली! कुत्रा!!’ हेलनने दोनचार आचके दिले आणि ती थंड पडली. त्या थंडपणाने प्रवीणचा भडकलेला क्रोधाग्नी वितळू लागला. नुसता वितळला नाही तर अंगातून घामाच्या धाराच वाहू लागल्या. आता त्याला परिस्थितीची जाणीव झाली. या वेसवेच्या नादी लागून आपण हे काय करून बसलो या जाणिवेने त्याच्या अंगाचा रागाने झालेला तिळपापड आता रोस्ट होऊ लागला. वास्तवाच्या जाळावर भाजून तो खरपूस होता होता आता जळायला लागला. भाजलेला खरपूस पापड जेवणानंतर खायची त्याला सवय होती. पण हा पापड सगळ्या जेवणाची बरबादी करणारा होता. तेवढ्यात फोनची रिंग वाजली, तसा तो दचकला.

“हॅलो? कोण?” त्याने घाबरतच विचारले.

“मी मॅनेजर बोलतोय साहेब. काय तब्येत ठीक नाही का आपली?”

“छे, छे. ठीक आहे की!” मॅनेजरचाच फोन आहे हे पाहून त्याला थोडा धीर आला. मॅनेजर म्हणाला,

“सर डिनर वर आणू, का आपण डायनिंग हॉलमध्ये येणार ते विचारायला फोन केला. आपल्याला डिस्टर्ब केल्याबद्दल माफी मागतो साहेब.”

“ठीक आहे. मी सांगतो थोड्या वेळाने.” असे म्हणून त्याने फोन ठेवला. आता या डेड बॉडीचे काय करावे? तिच्यावर दौलतजादा करणे शक्य नव्हते. जादा दौलत वापरून तिची विल्हेवाट तर लावता येईल? हा विचार त्याला पटला. हे त्याचे नेहमीचे हॉटेल होते. मॅनेजर ओळखीचा होता. पैशाचा लालची होता. शिवाय डेड बॉडी, पंचनामा, पेपरमध्ये बातमी वगैरे प्रकार हॉटेलला परवडण्यासारखे नव्हते. त्याने फोन उचलला.

“हॅलो? मॅनेजर?”

“यस सर! डीनर पाठवायची का?”

“नाही. एवढ्यात नको. तुम्हीच या जरा वर.”

“यस सर! आलोच!” मॅनेजर लगेचच आला. तो येताच प्रवीणने त्याला बसा म्हटले. सूटला दोन खोल्या होत्या. आत बेडरूम आणि बाहेर प्रशस्त हॉल. समोर टेरेस गार्डन. प्रवीण हॉलमध्ये बसला होता. मॅनेजर आता शेटचे काय काम आहे याचा विचार करत होता.

“हे पहा मॅनेजर, माझं एक जोखमीचं काम आहे. या कामाची वाच्यता कुठेही झाली नाही पाहिजे. हे काम केले तर मी तुम्हाला खूप खूश करीन. काम करणार का?” मॅनेजरच्या तोंडाला लाळ सुटली. प्रवीणशेट खूश करणार याचा ‘अर्थ’ त्याला चांगलाच कळत होता. पण त्या खुशीचे कारण समजले तर त्या खुशीवर किती ‘वजन’ ठेवायचे ते ठरवता येईल या विचाराने तो म्हणाला,

‘सर, आपण काम काय सांगा. मी ते करीन. अगदी तुमच्या मनासारखं. आणि खूश करायचं म्हणाल तर सर आपण आमचे व्ही.आय.पी. आहात. आपली खुशी सांभाळणं हे तर आमचं कामच आहे सर.” खुशीवर ‘वजन’ वाढविण्यासाठी त्यानं साखरपेरणी केली.

“मला वाटलंच की तुम्ही नक्की माझं काम कराल. ऐका तर मग. आत बेडरूममध्ये बाईसाहेब हार्टफेलने मरून पडल्यात. डॉक्टरला बोलावायचं, मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं. मग ती पोलीस चौकशी, पोस्टमार्टेम, विनाकारण वेळ जाणार. तशी ती माझी लग्नाची बायको नाही हे तुम्हालाही ठाऊक आहे. तर या सगळ्या भानगडीत हॉटेलचे नावही येणारच. तुम्हालाही ते सोयीचे नाही, नाही का?”

“होय साहेब. तशी प्रसिद्धी आम्हाला परवडणार नाही. पण मग आता आपण काय करायचे ठरवले आहे? आपण त्यांना गुपचुप गाडीत टाकून नेणार का? मी त्यांना आपल्या गाडीत ठेवण्याची व्यवस्था करतो. त्या बेशुद्ध आहेत, शेट त्यांना ताबडतोब घेऊन गेले असे मी सांगेन. ते मला जमेल सर.

“छे, छे! ती बॉडी घेऊन जाऊन मी काय करु?’

“त्या बॉडीचा झटपट निकाल लावण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे!”

“काय? निकाल लावायचा?” मॅनेजरने आ वासला. आपल्या बक्षिसीसाठी ‘वजन’ ठेवायला त्याने साखरपेरणी केली पण हे एवढे मोठे ‘वजन’ आपल्याला पेलावे लागेल असे त्यांच्या स्वप्नातही आले नव्हते.

“छे, छे! साहेब अहो या अशा लफड्यात मला कशाला गुंतवता? नाही साहेब, हे मला जमेल असे वाटत नाही. माफ करा साहेब. मी बॉडी आपल्या गाडीत ठेवण्याची व्यवस्था बिनबोभाट करीन, तेही आपण आमचे व्ही.आय.पी. म्हणून. बाकी आपण पाहून घ्या साहेब!”

‘अहो, मी काय तुम्हाला नाही सांगत त्या बॉडीचा निकाल लावायला! तुम्ही फक्त एक विश्वासू, हुषार टॅक्सीवाला मला आणून द्या. बाकी सगळं मी करेन. तुम्ही त्याला काही सांगू नका. मी बोलतो त्याच्याशी! हे बोलताना प्रवीणने सहजच काढतोय असे दाखवून आपल्या ब्रीफकेसमधून एक नोटांचे बंडल बाहेर काढून बाजूला ठेवले. मॅनेजरचे लक्ष तिकडे गेलेच. सौदा करायला काय हरकत आहे? आपल्याला काय एक टॅक्सी आणून द्यायची. बाकी सगळं शेट पाहून घेतीलच. सध्या तरी त्यांच्या बाजूला ठेवलेली नोटांची ‘गड्डी’ पाहायला काय हरकत आहे? सत्नाम सिंगची गड्डी म्हणजे टॅक्सी आणून द्यावी आणि ही गड्डी’ खिशात घालावी, हॉटेलची पण सुटका करावी आणि ही घटका टाळावी असा सूज्ञ विचार त्याने केला, मॅनेजरच तो!

“सर, एवढंच काम असेल तर मी करीन. केव्हा हवी टॅक्सी?” दौलत कामी आली हे प्रवीणने ओळखले.

“जरा उशिरा, रात्री ११/१२ वाजल्यानंतर आण. आणि हे घ्या ठेवा तुमच्याकडे.” असे म्हणून त्याने ती नोटांची गड्डी मॅनेजरच्या हवाली केली. त्याने ती चटकन खिशात सारली. चड्डीचा खिसा फुगला.

“हे पहा मॅनेजर, हा अॅडव्हान्स होता. टॅक्सी आल्यावर, बॉडी टॅक्सीमध्ये टाकल्यावर पुढचा हप्ता देईन.” प्रवीणशेटचे वाक्य पुरे होते ना होते तोच मॅनेजरने त्याला सलाम ठोकला आणि सत्नामची गड्डी शोधण्यासाठी आपली चड्डी सावरत धूम ठोकली. बरोबर साडेअकरा वाजता सत्नामची गड्डी हॉटेलसमोर हजर झाली. त्याला घेऊन मॅनेजर प्रवीणकडे आला. सत्नामला प्रवीण समोर हजर करून म्हणाला,

“सर, हा सतनाम सिंग. या हॉटेलचा नेहमीचा टॅक्सीवाला. भरोसेमंद. आपण याला आपले काम बिनधास्तपणे सोपवा. मी येतो.” मॅनेजर गेला.

“सत्नामसिंग, काम जोखमीचे आहे. कोणाला कळता कामा नये. तुला अॅडव्हान्स दहा हजार देईन. काम झाल्यावर तेवढेच देईन. शिवाय दर महिन्याला पाच हजार रुपये तुला पगारासारखे देईन तेही पुढची पाच वर्षे. काय आहे कबूल? तरच काम सांगतो.

“जी साब. मंजूर है। काम सांगा.

“हे बघ आत बाईसाहेब हार्टफेल होऊन पडल्या आहेत. त्यांची बॉडी लांब नेऊन टाकायची. कुठे ते मी तुला सांगेन. हे काम झाल्यावर मला मुंबईला भेटायचे, उरलेले पैसे घेऊन जायचे, महिना पगार तू सांगशील त्या पत्त्यावर तुला घरपोच मिळेल, पुन्हा माझ्याकडे यायचे नाही.”

एवढ्या पैशात एकच काय दहा बॉड्या फेकून द्यायची त्याची तयारी होती. तो आनंदाने तयार झाला.

“हा साब. आपण फिकीर करू नका. कुठे टाकायची ते सांगा आणि आराम करा. पुढचे मी पाहून

“तुला नाशिकचा रस्ता ठाऊक आहे?”

“हां साब.”

“ठीक, नाशिकच्या घाटात राजमाची पॉइंटवरून बॉडी खाली दूर दरीत फेकून द्यायची. आता लगेच निघायचे.” प्रवीणने त्याच्या हातात पैसे ठेवले.

सत्नाम सिंगने काम चोख केले. मॅनेजरचे तोंड पैशाच्या बुचाने बंद झाले. सत्नामचेही झाले. आता राहिले हेलनचे आईवडील. मुलाला मिळणारे पैसे बंद झाले तर ते बोंबाबोंब करतील. त्याचा बंदोबस्त करायला हवा लवकरच. तूर्तास महिन्याला त्यांना पैसे पाठवू, मग पुढे बघू. थोडा विचार करायला वेळ पाहिजे.

मुंबईला गेल्या गेल्या प्रवीणने परळला जाऊन हेलनच्या आईवडिलांची भेट घेतली. हेलन कधीच घरी येत नव्हती. आईवडिलांनीही तिचा संबंध सोडला होता. नातवाचे मात्र त्यांना कौतुक होते. आपली मुलगी करते तो धंदा त्यांना पसंत नव्हता. परंतु नातवासाठी मिळणारा पैसा त्यांना जरूरीचा होता. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. प्रवीणने हेलनची चौकशी केली पण ती घरी येत नाही हे कळल्यावर प्रवीणला बरे वाटले. याने हेलनच्या आई-वडिलांना पंचवीस हजार रूपये दिले. हेलन त्यालाही गेले दोन महिने भेटली नाही असे सांगितले. एवढेच नाही तर त्याने स्वतः भायखळा पोलीस स्टेशनवर जाऊन हेलन बेपत्ता झाल्याची तक्रार केली. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तो हेलनच्या आई-वडिलांना अधून मधून भेट्न चौकशी करायचा. त्यांना काही आर्थिक मदतही करायचा. मुलाचे लाडकोड करायचा.

हेलनच्या बेपत्ता होण्याची कोणालाच फिकीर नव्हती. प्रवीणला बारमध्ये जाऊन बाटल्यांची बुचे उडवण्याची सवय होती पण आता त्याने हेलनची कुठूनही आणि कुणीही चौकशी करू नये अशा प्रकारे संभाव्य भोके बुच मारून बंद करून टाकली. प्रकरण मिटले होते. हेलनची बॉडी खोल दरीत कोण शोधायला जाणार? गुन्हा खंडाळ्याला. बॉडी नाशिकच्या घाटात आणि मिसिंग केसचा तगादा लावणारे कोणीच नाही. हळूहळू केस फाईल झाली. अशी दोन वर्षे गेली. प्रवीणचा धंदा जोरात चालू होता. दिवसेंदिवस दौलत वाढतच चालली होती. पुन्हा दौलतजादा सुरु करावा असे त्याला वाटू लागले. हेलन फॉर्म्युला यशस्वी झाला असे त्याला

वाटू लागले. तसा तो यशस्वी झालाच होता. पण गुन्हेगार गुन्हा करतो तेव्हा काहीतरी कच्चा दुवा सोडतोच. तसा त्यानेही एक सोडला होता. सत्नाम सिंग, गड्डीवाला! सत्नामसिंगचा टॅक्सीचा धंदा आता जोरात चालू झाला होता. प्रवीणकडून मिळालेल्या पैशाने त्याने स्वत:ची टॅक्सी घेतली होती. शिवाय महिन्याचे महिन्याला त्याला खुराकही मिळत होता. फुकटचा पैसा आला म्हणजे त्याला पाय फुटतोच. सत्नाम खाण्यापिण्याचा शौकीन होता. दोस्त मंडळींसोबत धाब्यावर जाऊन तंदुरी चिकन आणि उंची दारू ढोसायला त्याला आवडायचे. पण अधूनमधून त्याला घडलेल्या गुन्ह्याची टोचणीही लागायची. तो खूप दिवस गप्प बसला पण त्याच्या पोटात ती टोचणी खदखदत होती. एक दिवस मात्र मित्राबरोबर धाब्यावर अचानक बाहेर पडली. तो त्याच्या मित्राबरोबर बसला होता आणि दोनचार पेग रिचवल्यावर मित्र म्हणाला,

“यार, सत्नाम, आजकल तेरा धंदा बडा अच्छा चल रहा है। साले हम भी टॅक्सीही चलाते है, लेकिन तुम्हारे जैसे कमाई नहीं मिलती। क्या राज है यार तेरे धंदेका? कुछ हमें भी तो बताओ।”

“नहीं यार, वैसा कुछ भी नहीं। अब मेरी खुद की टॅक्सी है इसलिये थोडा अच्छा चल रहा है।’

“खुदकी टॅक्सी? क्या लॉटरी लगी क्या यार?”

“हां वैसाही समझो।”

“सत्नाम यार हमसे क्यूं छुपाते हो? साले हमारे साथ पीता है, खाता है और फिर हमे बताता नही, यार ये दोस्तीमें ठीक नहीं। हमें भी कुछ बताओ ना यार।

“वैसा कुछ नहीं यार । लेकिन मैं बता नहीं सकता। मैंने किसीको जुबान दी है वो मैं नहीं खोल सकता।”

‘अरे छोड यार ये जुबान बिबान की बाते। और फिर दोस्तके साथ ये बाते अच्छी नहीं लगती। चल बता दे।” त्याने खूप आग्रह केला तसं सत्नामने मनातील खदखदत असलेली गुप्त गोष्ट उघड केली. आता दोन वर्षानंतर, तेही या आडमार्गाच्या धाब्यावर कोण कशाला येतोय ऐकायला? पण नियती पण कधी कधी कशी असते पाहा. त्याच वेळी शेजारच्याच टेबलावर मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक श्री.रवींद्रनाथ आंग्रे यांचा एक मित्र बसला होता. त्याचे कान या सरदारजीच्या बोलण्याकडे लागले होते. कारण काही नाही. आपली ऑर्डर यायची तो वाट पहात होता. पण पुढचे बोलणे ऐकून तो हैराण झाला.

सत्नाम म्हणाला,

“यार बता, ये कहानी लगभग दोन बरस पुरानी है। बंबई में प्रवीण बोट करके बहोत बडा मालदार बेपारी है। उसने उसकी एक छैल छबेली को ठिकाने लगाया था। और उसकी बॉडीको मैंने ठिकाने लगाने के लिये उसकी मदत की थी। इत बात के लिये उसने मुझो ढेर सारे पैसे दिये। मगर ये बात किसीको नहीं बतानेकी। ये साले सेठिया लोक अपनेको महिनेभरकी कमाई होती है उससे भी जादा एक दिनमें उडाते है।” आणखी दारूच्या तारेत तो बोच काही बोलला, आंग्रे साहेबांच्या मित्राने त्याला नीट पाहून ठेवले, त्याच्या टॅक्सीचा नंबर नोट केला आणि ही ‘गरमागरम प्लेट’ त्यांना ‘सई’ केली,

आंग्रे साहेबांना ही विलक्षण ‘डिश’ फारच पसंत पडली. या रेसिपीच्या ‘शेफ’ चा पत्ता त्यांनी तातडीने शोधून काढला, या शेफला सरकारी पाहुणा बनवून जेलमधल्या मुदपाकखान्यात त्याची नेमणूक करण्याची त्यांनी तयारी केली, या शेफचे क्वालिफिकेशन जबरदस्त होते. त्यांनी त्वरित प्रवीण शेटचे घर गाठले, त्यांना पाहून प्रवीणशेटला वाटले कोणीतरी धंद्यासंबंधी बोलायला आले आहेत, कारण आंग्रेसाहेब सिव्हिल ड्रेसमध्ये होते. त्यांनी आल्या आल्या प्रवीणला आपले ओळखपत्र दाखवले. पण ते दोन वर्षापूर्वीच्या घटनेसंबंधी चौकशीला आले असावेत असे काही त्याला वाटले नाही. तो त्यांच्याशी अघळपघळ गप्पा मारायला लागला. बोलता बोलता आंग्रेसाहेबांनी अगदी सहजच विचारावे तसे विचारले,

“प्रवीणशेट आपण हेलनला ओळखत असाल?”

“हेलन? कोण हेलन?”

“नाही आठवत? आपण घाटकोपरला तिला एक फ्लॅटही घेऊन दिला होता असं ऐकतो.”

“काय बोलता साहेब? कोण हेलन? आणि ही फ्लॅटची काय भानगड? मला तो काय समजत नाय.”

“नीट आठवा शेट, ती जोगेश्वरीच्या डान्सबारमधली डान्सगली”

“छे, छे! साहेब, काय बोलताय? आपण कशाला असले धंदे करू? काय साहेब काय थट्टा करते काय?”

“छे, छे! शेट अहो तुमची चेष्टा? मला काय वेड लागलंय का काय? तुमच्यासारखी बडी माणसं कशाला असले फालतू उद्योग करतील? शिवाय तुम्ही तर तुमच्या व्यवसायातले बादशहा. अशा छप्पन्न हेलन तुम्ही म्हणाल तर तुमच्या मागे येतील. मी, आमच्या लोकांना तरी चांगलं सांगत होतो, बाबांनो प्रवीणशेटबद्दल असा विचार करू नका. ते भले गृहस्थ आहेत.”

“हां साहेब, आता कसं बोललात? एकदम चोक्कस. साहेब काय चाय पानी घेणार का?”

“हां घेऊ ना. पण बाहेर माझ्या बरोबर दोन पाहुणे पण आलेत. त्यांना बोलावले तर चालेल ना?”

“हां हां. अरे चालेल म्हणजे काय साहेब? चालणारच. पण साहेब आपण पुन्हा या. पण कोणी पाहुणे नको. आपला काही गैरसमज झाला असेल तर आम्ही तो दूर करू साहेब.” असे म्हणून त्याने आंग्रे साहेबांकडे एक ‘अर्थ’पूर्ण दृष्टिक्षेप टाकला. त्यातला ‘अर्थ’ आंग्रेसाहेबांनी जाणला. प्रवीणने नोकराला हाक मारली आणि बाहेर वेटिंगमध्ये बसलेल्या पाहुण्यांना आत पाठव म्हणून सांगितले. पाहुणे आत आले मात्र प्रवीणचा चेहरा भुते पाहिल्यासारखा पांढरा फट्टक पडला. एक पाहुणा होता मॅनेजर आणि दुसरा सत्नाम सिंग! जिवंत भुते!

‘काय प्रवीणशेट, यांना तरी ओळखता ना?”

प्रवीणची तर बोबडीच वळली. आपला गुन्हा कबूल करण्यावाचून त्याला गत्यंतरच नव्हते. पैसा वापरून त्याने जामीन मिळवला. पण त्याच्या विरूद्ध आंग्रेसाहेबांनी एवढा भक्कम परिस्थितीजन्य पुरावा जमवला आहे की जेलमधील शेफची त्याची जागा जवळ जवळ पक्कीच आहे. आता बघायचे न्याय काय होतो. ‘शेफ’ चे अपॉइंटमेंट लेटर मिळते का त्याच्या ‘वर’ चे प्रमोशन मिळते ते!

– विनायक अत्रे 

(ही कथा `दक्षता’ च्या २००५ च्या दिवाळी अंकात प्रथम प्रकाशित झाली.)

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..