सरस्वतीचं वाहन मोर. सरस्वतीच्या सानिध्यात असलेल्या मोराचं कोणतंही पिस पहा.. ती सर्व एकसारखीच छान दिसतात. त्यांच्यात हे चांगलं, ते बरं.. अशी तुलना करता येत नाही…
अगदी तसंच जगदीश खेबुडकर यांच्या प्रत्येक चित्रपट गीतांबद्दल आपण म्हणू शकतो. या अलौकिक सरस्वतीच्या पुजाऱ्यानं मराठी चित्रपटांसाठी जेवढी गीतं लिहिली, ती एकाहून एक सरस आहेत…
कोल्हापूरमधील एका खेडेगावात जगदीश खेबूडकरांचा जन्म झाला. त्यांनी शिक्षकांची नोकरी करुन आपली काव्यसाधना चालू ठेवली. त्यांना पहिली संधी मिळाली, तो चित्रपट होता ‘रंगल्या रात्री अशा”..नंतर पुढे ४६ वर्षे अखंडपणे ते चित्रपट गीतं लिहित राहिले.
मराठी साहित्यातील आदरणीय वाल्मिकी, गीतकार ग. दि. माडगूळकर यांच्यानंतर सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला कवी म्हणून जगदीश खेबुडकर यांचेच नाव घेतले जाते. एकूण गीतलेखन कारकिर्दीत ३५० चित्रपटांसाठी २७५० हून अधिक गीतं त्यांनी लिहिली. त्यांचाच एक धावता आढावा…
‘ऐरणीच्या देवा तुला..’ हे ‘साधी माणसं’ मधील गाणं ‘पारू’च्या भावविश्वात घेऊन जातं. भालजी पेंढारकरांच्या अनेक चित्रपटांची गीतं खेबुडकरांनी लिहिली आहेत.
‘सतीचं वाण’ चित्रपटातील गोकुळ अष्टमीचं ‘किती सांगू मी सांगू कुणाला..’ हे गाणं अप्रतिम आहे. यातीलच वसंत शिंदे व लीला गांधी यांच्यावर चित्रीत झालेलं ‘अहो कारभारी..’ हे विनोदी गाणं फार लोकप्रिय आहे.
“आम्ही जातो अमुच्या गावा’ चित्रपटातील ‘देहाची तिजोरी…’ हे गाणं अजरामर झालं. “स्वप्नात रंगले मी..’ हे उमा व श्रीकांत मोघे यांचे युगुल गीत अप्रतिम आहे. या चित्रपटाच्या रौप्यमहोत्सवात त्यातील गीतांचाही सहभाग मोलाचा आहे.
‘माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी..’ या ‘सोंगाड्या’ चित्रपटातील गीताने दादा कोंडके यांची ओळख रसिकांना झाली. दादांच्या अनेक चित्रपटांची गीतं खेबुडकरांनी लिहिली आहेत.
‘दाम करी काम’ चित्रपटातील ‘वासुदेवाची ऐका वाणी..’ या गीतातून संपूर्ण चित्रपटाचे सार व पैशाचं महत्त्व कथन केलंय.
‘पिंजरा’ चित्रपटासाठी मिळालेल्या संधीचं खेबुडकरांनी सोनं केलं. शेकडो गीतं लिहिल्यानंतर त्यातील अकरा गीतांनी इतिहास घडविला. हा त्यांच्या जीवनातील ‘माईलस्टोन’ चित्रपट ठरला.
‘सामना’ चित्रपटातील ‘सख्या रे घायाळ मी हरिणी..’ हे गीत चित्रपटाचा केंद्रबिंदू आहे.
‘कुण्या गावाचं आलं पाखरू..,’ हे ‘सुशीला’ मधील गीत चित्रपटाला एका उंचीवर नेऊन ठेवतं.
‘अष्टविनायक’ चित्रपटातील ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा..’ या गीतात त्यांनी लोकसंगीताचे सर्व प्रकार समाविष्ट केलेले आहेत. दरवर्षी गणपतीच्या दिवसांत हे गीत चौकाचौकात ऐकायला मिळते.
“अरे संसार संसार’ मधील ‘राजा ललकारी दे..’ हे गीत शेतकऱ्याचं भावविश्व उलगडून दाखवतं.
‘हा सागरी किनारा..’ हे ‘मुंबईचा फौजदार’ चित्रपटातील गीत अप्रतिम आहे.
‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा..’ व ‘या रावजी, बसा भावजी..’ अशा बैठकीच्या लावण्या लिहिताना खेबुडकरांच्या लेखणीने कमाल केली आहे.
खेबुडकरांच्या गीतांविषयी खूप लिहिता येईल. थोडक्यात एवढंच सांगता येईल की, झाले बहु, होतील बहु मात्र या सम हाच!!
जगदीश खेबुडकरांना गीत सुचलं की, ते काळ्या स्केच पेनने एफोर साईजच्या कागदावर भराभरा लिहून काढायचे व कुठे, किती तारखेला व शेवटी किती वाजता लिहिलं ती वेळ टाकायचे.
‘सवाल माझ्या प्रेमाचा’ या अरविंद सामंत यांच्या चित्रपटाच्या प्रिमियरला जगदीश खेबुडकर आले होते. रात्री प्रेसपार्टी होती, त्यावेळी त्यांच्यासमवेत फोटो काढण्याची संधी मिळाली. ती एक अविस्मरणीय आठवण ठरली.
अकरा वर्षांपूर्वी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवास गृहात जगदीश खेबूडकरांना भेटलो होतो. ती शेवटचीच भेट ठरली…
पुण्यातील ‘संस्कृती’ प्रकाशनने जगदीश खेबुडकरांच्या पंधरा पुस्तकांचा संच प्रकाशित केला आहे. त्या सर्व पुस्तकांची मुखपृष्ठं करण्याची सुवर्णसंधी प्रकाशिका सुनीताराजे पवार यांनी दिली…
आज जगदीश खेबुडकरांना जाऊन दहा वर्षे झाली आहेत. आज त्यांचा स्मृतिदिन… या अलौकिक सरस्वतीपुत्रास विनम्र अभिवादन!!
© – सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
३-५-२१
Leave a Reply