जेव्हा मानवाचा मेंदू फारसा प्रगत झाला नव्हता तेव्हा त्याला सूर्योदय, चंद्रोदय, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, इंद्रधनुष्य, भरतीओहोटी, विजांचा कडकडाट वगैरे चमत्कार वाटायचे आणि ईश्वरच या घटना घडवितो अशी त्याची ठाम समजूत होती. धर्मग्रंथातही हेच सांगितले आहे. भयानक पाऊस, नद्यांचे महापूर, वादळे, धरणीकंप, ज्वालामुखींचे उद्रेक, वणवे, मृत्यू वगैरे आपत्ती, ईश्वरी कोपामुळे होतात. देवाला प्रसन्न केले की या आपत्ती टळतात असेही धर्मग्रंथात लिहीले आहे.
आता विज्ञानाने या सर्व घटनामागील बराचसा कार्यकारणभाव शोधून काढला आहे. विश्वातील सर्व घटनांचा कार्यकारणभाव नेमका समजला आहे असेच नाही आणि विश्वात असलेल्या विज्ञानाच्या मानाने, मानवाला कळलेले विज्ञान नगण्य आहे याचीही जाणीव शास्त्रज्ञांना आहे.
पृथ्वीवरील सजीव आणि अध्यात्माची सुरुवात ::
साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीव निर्माण झाला असावा असे शास्त्रज्ञ सांगतात. सुरुवातीला हे जीव अगदी प्रथमावस्थेत, जीवाणू, बुरशी, आणि एकपेशीय प्राणी यांच्या स्वरुपात निर्माण झाले. पृथ्वीवर सजीव कसे निर्माण झालेत याबद्दलची माहिती अनेक पुस्तकांतून आणि माहिती जालावर मिळते.
प्रथम त्या आदिमानावांचा समूह जंगलात आणि गुहात रहात होता, कंदमुळे, फळे आणि शिकार केलेल्या प्राण्यांचे मांस खाऊन उपजीविका करू लागला. या काळात त्याचा मेंदू झपाट्याने उत्क्रांत होऊ लागला. पुढे जेंव्हा तो शेती करू लागला, पशुधन पाळू लागला, आपल्या कुटुंबासाठी निवार्याची सोय करू लागला तेव्हा त्याच्या जीवनाला स्थैर्य लाभले. अवतीभोवतीच्या निसर्गाचे निरीक्षण करायला वेळ मिळत गेला. तेव्हा कुठे त्याला विचार करण्याची क्षमता आली. समुहातील काही विचारवंतांनी आपल्या निरीक्षणांची आणि अनुभवांची, आपल्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि साठविलेल्या अनुभवातून सुचतील तशी स्पष्टीकरणे दिली.
सर्वात महत्वाचे निरीक्षण म्हणजे अवतीभोवतीच्या निसर्गात प्रचंड शक्ती असलेल्या घटना घडतात आणि त्यात कमालीची सुसूत्रता आहे. स्वाभाविकपणे पहिला विचार म्हणजे……. त्या सूत्रधाराची….. म्हणजे ईश्वराची संकल्पना निर्माण झाली. या घटना घडविणारा आणि त्यांचे नियंत्रण करणारा सर्व शक्तिमान, सर्वज्ञानी आणि सर्वकाळ अस्तित्वात असणारा असा जो कोणी आहे तो या सृष्टीचा कर्ताकरविता म्हणजे ईश्वर….पुढे सजीवांची चेतना म्हणजे आत्मा, आणि तो आत्मा निर्माण करणारा परमात्मा.
अशा अनेक अध्यात्मिक संकल्पना रूढ होत गेल्या. ….हीच अध्यात्माची सुरुवात म्हणावी लागेल.
मानवी मेंदूची अध्यात्मिक सुरुवात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी झाली. त्या काळापासून आजपर्यंत, मानवी शरीररचनेत आणि पृथ्वीच्या पर्यावरणात फारसा फरक पडला नाही. त्यामुळे त्या काळी विचारवंतांनी केलेली निरीक्षणे आणि घेतलेले अनुभव आपण आजही घेऊ शकतो. त्या काळी असलेली बुद्धिवान माणसे आजही जन्म पावू शकतात. त्याकाळी केलेल्या निरीक्षणांची आणि अनुभवांची स्पष्टीकरणे, त्यांच्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि त्या काळी उपलब्ध असलेल्या ज्ञानानुसार त्यांनी दिली. ती गेली हजारो वर्षे उपयोगी पडली, मार्गदर्शक ठरली. ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा वगैरे अध्यात्मिक संकल्पना केवळ मानवी मेंदूतच आहेत.
मानवाच्या अवतरणापूर्वीची, पृथ्वीवरील सृष्टी.
मानवाचे, या पृथ्वीवर अवतरण होण्यापूर्वी , या पृथ्वीवर, कोट्यवधी पृथ्वीवर्षांपासून, प्राणी, पक्षी, जलचर, किडेकीटक, जीवाणू, शेवाळं, एकपेशीय प्राणी, गवत, झुडपे, झाडे वगैरे अस्तित्वात होते. सृष्टीचे आणि त्या काळी अस्तित्वात असलेल्या सर्व प्राणीमात्रांचे सर्व शारीरिक व्यवहार सुरळीत चालले होते. त्या काळी या सजीवांनी आपापला आहार मिळविला, शरीराची वाढ केली आणि आपल्या प्रजातीतील सजीवांचे पुनरुत्पादनही केले. वनस्पती निर्माण झाल्या आणि त्याही वाढल्या. म्हणजे त्या काळीदेखील त्यांच्यात आनुवंशिक तत्व म्हणजे जेनेटिक मटेरीअल अस्तित्वात होते. त्यामुळेच त्यांचे सर्व शारीरिक व्यवहार सुरळीतपणे होऊ शकले आणि त्यांची प्रजा म्हणजे वंश वाढू शकला. वनस्पतींच्याही अनेक प्रजाती निर्माण झाल्या.
या नंतर कोट्यवधी पृथ्वीवर्षांचा काळ लोटला. आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होऊन प्राणी आणि वनस्पतींच्या लाखो प्रजाती निर्माण झाल्या. सरतेशेवटी सुमारे ७० लाख पृथ्वीवर्षांपूर्वी, कपिंच्या काही प्रजातीत उत्क्रांती होऊन मानव निर्माण झाला. त्यांच्या अस्तित्वात आणि पुनरुत्पादनात आजचे प्रगत विज्ञानच होते.
आज, नोबेल पारितोषिके मिळविणार्या शास्त्रज्ञांनी काय केले? कोट्यवधी वर्षांपूर्वी निसर्गाने पूर्णावस्थेत नेऊन ठेवलेले विज्ञानच शोधून काढले. हे शोध लावतांना कमालीची बुद्धिमत्ता वापरली आणि त्यास अथक प्रयत्नांची जोड दिली हे निर्विवाद.
आता विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. तरीपण ती निसर्गात असलेल्या विज्ञानाच्या तुलनेत नगण्य आहे याचेही भानशास्त्रज्ञांना आहे. पौराणिक काळात ऋषीमुनींनी आणि विचारवंतानी दिलेली कित्येक स्पष्टीकरणे आजही तंतोतंत लागू पडतात ही खरोखर आश्चर्याची बाब आहे.
अध्यात्माची गरज ::
पुरातन काळातील ऋषीमुनींची, धर्म संस्थापकांची आणि विचारवंतांची अशी कळकळीची इच्छा होती की सर्व प्रजा ज्ञानी, विद्वान, सुसंस्कृत, सुशील, नैतिक मूल्यांचे पालन करणारी, आरोग्यदायी वगैरे सदगुणांनी परिपूर्ण असावी. म्हणजे त्यांची संततीही तशीच गुणवान निपजावी. हे उद्दिष्ठ साधण्यासाठी त्यांनी सात्विक दिनचर्या सांगितली, धर्माचरणे सांगितली. धार्मिक ग्रंथ रचना केल्या, धर्म संस्थापिले, ईश्वर, आत्मा, जन्म मृत्यूचे फेरे, मोक्ष, पुनर्जन्म, बर्यावाईट कर्मांची गोडकडू फळे, मृत्युनंतर सुख किंवा शिक्षा वगैरे संकल्पना रूढ केल्या.
आता थोडा विचार करा. मला जर कोणाला माझे विचार पटवावयाचे असतील तर ते त्यांना समजेल अशा भाषेत सांगावे लागतील. माझ्या विचारानुसार त्यांनी आचरण करावे अशी इच्छा असेल तर त्यांना थोडी प्रलोभने दाखवावी लागतील थोडी भीती दाखवावी लागेल वगैरे वगैरे.
विचारवंतानी नेमके हेच केले. पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, या जन्मीच्या वाईट कर्मांची फळे पुढच्या जन्मी भोगावी लागतील, चांगली कर्मे केली तर देवाला तुम्ही आवडाल, वाईट कामे केली तर देव तुम्हाला शिक्षा करील, तुमच्या वाईट कर्माची फळे तुमच्या संततीला भोगावी लागतील वगैरे वगैरे. या सर्व अमूर्त संकल्पना होत्या असे मला वाटते. नंतरच्या शिष्यांनी, त्यांच्या फायद्यासाठी आणि स्वतःचे महत्व वाढविण्यासाठी या प्रलोभनात आणि भीतीच्या परिमाणात आणखी भर तर घातलीच, शिवाय जपजाप्य, नवससायास, उपासतापास, दानधर्म, कर्मकांडे वगैरेंची भरही घातली.
श्रध्दा आणि मानसिक समाधान ::
ऋषिमुनींनी सांगितलेल्या धर्माचरणांचे पालन केल्यामुळे आणि त्यावर भावनिक श्रध्दा ठेवल्यामुळे, स्वत:ला, कुटुंबियांना, समाजाला वगैरे मानसिक समाधान मिळते हे निर्विवाद. ऋषिमुनींचे आणि तत्वज्ञांचे हे फार मोठे यश समजले पाहिजे. पण पुढे हा उद्देश मागे पडला आणि अंधश्रध्दा बोकाळल्या. लालबागचा राजा, सिध्दीविनायक, तिरुपती बालाजी, शिर्डीचे साईबाबा यांना कोटीकोटी रुपयांचे दागिने, मुकुट, हिरेजडित सोनसाखळ्या, अंगठ्या आणि दानपेटीत लाखोरुपयांच्या देणग्या वगैरे हेच दर्शवितात की धार्मिक संकल्पनांचा अतिरेक होतो आहे.
विज्ञानाची सुरुवात ::
१४ व्या – १५ व्या शतकांपासून, युरोपात, विज्ञानाचा शास्त्रशुद्ध पाया रचण्याचे प्रयत्न सुरु झाले. अवतीभोवतीच्या निसर्गातील घटकांचे खरे अंतरंग समजून, मूर्त स्वरूपातील ज्ञानाचा अनुभव येऊ लागला. प्रयोगांना प्राधान्य दिले गेले. प्रयोगानी काढलेले निष्कर्ष, योग्य परिस्थिती जुळवून आणल्यास, कुणालाही, केव्हाही आणि कितीही वेळा पडताळून पाहता येऊ लागले.
सर्वात महत्वाचा आणि अध्यात्मिक ज्ञानाला जोरकस धक्का देणारा निष्कर्ष म्हणजे, पृथ्वीसकट सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात हा होता. पृथ्वी सपाट नसून ती चेंडूसारखी गोलाकार आहे, ती शेषनागाच्या डोक्यावर ठेवलेली नसून, गुरूत्वाकर्षण बलामुळे, अवकाशात अधांतरी राहून सूर्याभोवती फिरते आहे, सूर्यग्रहणे आणि चंद्रग्रहणे, राहूकेतू या काल्पनिक राक्षसाकडून, सूर्य किंवा चंद्र गिळण्यामुळे न होता, सूर्य-चंद्र-पृथ्वी एका सरळ रेषेत आल्यामुळे होतात, धरणीकंप, ज्वालामुखी, वडवानल वगैरे आपत्ती, पृथ्वीच्या पृष्ठकवचातील हालचालीमुळे होतात, जोराचा पाऊस, वादळे वगैरे पृथ्वीच्या पर्यावरणीय बदलांमुळे होतात….ईश्वरी कोपामुळे नव्हे…. हे सप्रयोग आणि सप्रमाण सिध्द केले. अशारीतीने अनेक अध्यात्मिक संकल्पनांना विज्ञानीय दृष्टीकोनातून स्पष्टीकरणे देता येणे शक्य झाले.
विज्ञान आणि अध्यात्म ::
मानवी मेंदूची अध्यात्मिक सुरुवात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी झाली. त्या काळापासून आजपर्यंत, मानवी शरीररचनेत आणि पृथ्वीच्या पर्यावरणात फारसा फरक पडला नाही. त्यामुळे त्या काळी विचारवंतांनी केलेली निरीक्षणे आणि घेतलेले अनुभव आपण आजही घेऊ शकतो. त्याकाळी असलेली बुद्धिवान माणसे आजही जन्म पावू शकतात. त्याकाळी केलेल्या निरीक्षणांची आणि अनुभवांची स्पष्टीकरणे, त्यांच्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि त्या काळी उपलब्ध असलेल्या ज्ञानानुसार त्यांनी दिली. ती गेली हजारो वर्षे उपयोगी पडली, मार्गदर्शक ठरली.
आता विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. तरीपण ती निसर्गात असलेल्या विज्ञानाच्या तुलनेत नगण्य आहे याचेही भानशास्त्रज्ञांना आहे. पौराणिक काळात ऋषीमुनींनी आणि विचारवंतानी दिलेली कित्येक स्पष्टीकरणे आजही तंतोतंत लागू पडतात ही खरोखर आश्चर्याची बाब आहे.
द्यायचीच झाली तर पुढील दोन उदाहरणे देता येतील…
१) असा अध्यात्मिक समज आहे की, ८४ लाख योनीतून आत्मा गेला की तो मानव शरीर धरण करतो. खरे म्हणजे, साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर, निर्माण झालेल्या सजीवांत जे आनुवंशिक तत्व होते, त्यात उत्क्रांती होऊन लाखो प्रजाती निर्माण झाल्या आणि शेवटी मानव उत्क्रांत झाला याची ऋषीमुनींना पूर्ण जाणीव होती.
२) दुसरे उदाहरण म्हणजे श्रीविष्णूचे दशावतार. पृथ्वीवरील सजीव प्रथम समुद्रात निर्माण झाले, नंतर उभयचर निर्माण झाले, नंतर केवळ जमिनीवर राहणारे प्राणी, नंतर माकडापासून मानव अशी उत्क्रांती झाली. त्याच क्रमाने श्रीविष्णूचे, मत्स्यावतार, कूर्मावतार, वराह अवतार, नरसिंह अवतार, शेवटी वामनावतार म्हणजे मानव. पुढील अवतार मानवाची प्रगती दर्शविणारे अवतार आहेत. या आणि अशा अनेक उदाहरणावरून असा निष्कर्ष काढता येतो की ऋषीमुनींना सजीवांच्या उत्क्रांतीची जाणीव होती.
ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा वगैरे अध्यात्मिक संकल्पना केवळ मानवी मेंदूतच आहेत.
— गजानन वामनाचार्य
Leave a Reply