जरी सरिताओघ समस्त।
परिपूर्ण होऊनि मिळत।
तरी अधिक नोहे ईषत।
मर्यादा संडी।।
(ज्ञानेश्वरी, अ.२. ओवी ५८)
संयम व मर्यादा या मोठ्या गोष्टी आहेत. तुमच्या हातात सर्व प्रकारची साधनसामग्री असते, तेव्हा त्या साधनसामग्रीच्या आधारे नवी साधनसामग्री तुमच्या हाती येऊन मिळते, पण तिचा उपयोग व्यक्तिगत व सामुदायिक विकासासाठी करणे महत्वाचे. एक गोष्ट आपल्या नेहमी लक्ष्यात येते ती म्हणजे बर्याचदा सत्तेकडे सत्ता जाते व संपत्तीकडे संपत्ती; पण सत्तेमुळे
उर्मट होऊ नये व संपत्तीमुळे माजू नये. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण म्हणत असत- “राजकारण करायचे ते सत्ता मिळवण्यासाठी, पण मिळालेल्या सत्तेचा मोक्ष असतो ती सत्ता गोरगरिबांसाठी राबवण्यामध्ये! ही राजकारणाची मर्यादा!”
मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स किंवा इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर अफाट संपत्ती मिळवली. पण नंतर ते त्या संपत्तीचे-सत्तेचे विश्वस्त बनले. त्यांनी विविध ट्रस्टच्या माध्यमातून करोडो लोकांना, विविध देशांना मदत केली. याचे कारण, त्यांनी मिळवलेल्या सत्तेचा, पैशाचा माज केला नाही. त्यांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या नाहीत.
ज्ञानदेव हेच सांगतात, “सागरामध्ये जरी सर्व नद्या येऊन विलीन होतात, तरी त्यामुळे तो जरूरीपेक्षा जास्त फुगत नाही वा स्वत:ची मर्यादाही ओलांडत नाही.”
आपल्या तरुण मनांमध्ये गगनाला गवसणी घालण्याची इच्छा असते. पण गगन कवेत आल्यावर त्या गगनावर अधिराज्य गाजविण्यापेक्षा आपण त्या गगनाचे विश्वस्त आहोत ही भावना बाळगणे महत्वाचे आहे. हीच मर्यादा. ह्या मर्यादेचे अत्यंत संयमाने पालन केले ते छत्रपती शिवरायांनी. त्यांनी अपरिमित यश मिळवले, पण अंतिमत: “हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे,” ही त्यांची भावना कायम ठरली. हीच मर्यादा हाच संयम!!
— नितीन आरेकर
Leave a Reply