“ज्ञानपीठ ” मिळाल्यावर त्यांना अभिनंदनपर पत्र पाठविले होते इस्लामपूरहून १९८७ साली. अकस्मात त्यांचे आभारपत्र आले आणि जणू मलाच पुरस्कार प्राप्तीचा आनंद झाला.
१९९६ साली माझ्या पत्नीचा दुसरा काव्यसंग्रह ” वाटेवरच्या कविता ” प्रकाशित करण्याचा विचार पुण्यातील नीहारा प्रकाशनाच्या सौ. स्नेहसुधा कुळकर्णी यांनी बोलून दाखविला. मुखपृष्ठाची संकल्पना आमच्या गणपतीपुळे ट्रीपच्या बागेतील एका छायाचित्रावरून सुचली. प्रस्तावनेसाठी सुधीर मोघेंशी संपर्क साधला आणि काहीशा झटापटीनंतर ती मिळाली. (वो कहानी फिर कभी !) प्रश्न उरला – आशीर्वादाचा! यासाठी साहित्य सृष्टीतील आजोबा ” कुसुमाग्रज ” यांच्यापेक्षा अधिक समर्थ व्यक्ती कोण असू शकेल?
माझ्या पत्नीचा आतेभाऊ सुरेंद्र देशपांडे- जन्मजात नाशिककर ! त्याला फोनलो. त्याचे वडील तात्यासाहेबांचे जिवलग. दस्तुरखुद्द तात्यासाहेबांचे सुरेंद्रशी घरगुती जवळीकेचे संबंध. सारं त्याने जुळवून आणल्यावर आम्ही सहकुटुंब नाशकात सुरेंद्रच्या घरी डेरेदाखल. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ नंतर तात्यासाहेबांकडे जाण्याचे ठरले.
त्यांच्या घरी नेहेमीची मैफिल जमली होती. काही मित्र,स्नेही, परिचित हॉलमध्ये बसले होते. तात्यासाहेबांनी आम्हाला आतल्या खोलीत बसण्यास सांगितले. काहीवेळाने ते आत आले. सुरेंद्रने परिचय करून दिला. भेटीची प्रस्तावना आधीच केली होती.
मी काही फोटो काढण्याची परवानगी मागितली. त्यांनी होकार भरला. मी आवर्जून बरोबर नेलेले त्यांचे पत्र त्यांना दाखविले.
थोडावेळ गप्पा झाल्या, माझ्या पत्नीच्या काही कविता त्यांनी वाचल्या. काही तिने ऐकवल्या.त्यांना आवडल्या. म्हणाले – ” कविता ठेऊन जा. मी अभिप्राय लिहून पाठवीन.”
मला सतावणारा प्रश्न विचारण्याची परवानगी मी मागितली. ते सौम्यपणे होकारून हसले.
” काही बोलायचे आहे, पण बोलणार नाही
देवळाच्या दारामध्ये भक्ती तोलणार नाही ”
या आपल्या कवितेला काही अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे कां ? ”
हे विचारताना माझ्या मनात प्रामुख्याने दुसऱ्या ओळीचा संदर्भ होता.
ते म्हणाले- ” ही एक साधी प्रेमकविता आहे. बस्स ! ”
मी ओंफस्स !
आम्ही पुण्याला परतलो. काही दिवसांनी त्यांचे पोस्टकार्ड आशिर्वादासह आले. यथाकाल पुस्तक प्रकाशित झाले.
मार्च १९९९ मध्ये त्यांचे निधन झाले त्यावेळी मी नेमका नाशिकमध्ये होतो.
यावेळी संध्याकाळी त्यांच्या त्याच घरी गेलो, निवलेल्या चैतन्याला नमस्कार केला आणि परतलो.
आजही जेव्हा जेव्हा नाशिकला जाणे होते, तेव्हा त्यांच्या दारावरून एक चक्कर मारतोच.
मातीचे गायन आकाशातल्या श्रुतींपर्यंत नक्कीच पोहोचत असेल.
डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply