या जगी कलियुगी संसारात
जगणे झाले केवळ व्यवहारी
जाणिवा , भावनांच्या शुष्क
ऋणानुबंधी नातीही व्यवहारी..।।१
आस्था , जिव्हाळा हरविला
जो , तो स्वस्वार्थातची रमला
मायबाप ,बंधुभगिनी , सोयरे
प्रीतभावबंध केवळ व्यवहारी..।।२
मने गोठलेली , रक्तही गोठलेले
सत्य ! धनदौलत ,भौतिकसुख
क्षणिक सुखाचे सारे हे सोहळे
जगणे जाहले सारेच व्यवहारी..।।३
केवळ पैसाच , मूल्य जीवनाचे
विवेकी , सद्गुणी , सात्विकता
संस्कार निष्फळ , या कलियुगी
जगणे स्वार्थी , जाहले व्यवहारी..।।४
निस्वार्थी प्रेमास्था कुठे शोधावी
शब्द ,स्पर्श, हास्य सारेच बेगडी
शाश्वत मैत्रभावही आज दुर्मिळ
मुसमुसती अंतरी , स्पंदने बावरी..।।५
©️वि.ग.सातपुते.(भावकवी)
? ( 9766544908 )
*रचना क्र. ७५ / ११ – ६ – २०२१*