नवीन लेखन...

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग २६)

जीवनात येणाऱ्या अगदी प्रत्येक व्यक्तीच्या सहवासातून आपण काहीतरी शिकत असतो. व्यक्ती तितुक्या प्रकृती असे सर्वश्रुत आहे. मी जरी लेखांकाच्या हेडिंग मध्ये सात्यिकांचा सहवास एक संस्कार असे जरी म्हटले असले तरी त्याचा तसा शब्दशः अर्थ घेवू नये. कारण जीवनात अनेक मार्गदर्शक व्यक्ती भेटतात आणि तेच आपले जीवन घडवितात. तेच आपले गुरु असतात. प्रथमत: जन्मदातेच आपले गुरु असतात हेच सत्य!

माझ्या अगदी बालपणापासूनच माझ्या घरातील, परिसरातील वातावरण माझ्यावर संस्कार करून गेले हे मी सांगीतले आहे.

बालपणी संत गाडगे महाराज, जंगमस्वामी, बाबा महाराज सातारकर, बीडकर, पटवर्धन बुवा (वाई), ओतुरकर, कोपरकर, हरिभाऊ कराडकर, शाहिर अमरशेख, शाहिर साबळे, अशा कीर्तन, प्रवचन आणि कलापथकातून समाजप्रबोधन करणाऱ्या व्यक्तींना आम्हा मित्रांना पहाण्याचा त्यांना ऐकण्याचा आनंद मिळाला हे फार महत्वाचे आहे. सहवास, श्रवण, वाचन, पाठांतर, चिंतन, मनन, या सर्वाचाच खुप छान संस्कार आमच्या पिढीवरच झाला हे खरे.

शिशु, शैशव, तारुण्य, गृहस्थ, आणि आजचे वयानुरूप आलेले अनुभवी ज्येष्ठत्व गतस्मृतीत जेव्हा रमते. तेव्हा मन अशा प्रकारच्या आठवणी लिहिण्यास प्रवृत्त होते. असेच काहीसे घडले त्यातूनच हे लिखाण झाले.

जीवनाचे रूप हे असीम, अपरिमित, अमर्याद, लोभस अनाकलनीय आहे. या जीवन सरोवराची उंची, याची खोली, याची रुंदी ही तितकीच अमर्यादित आहे. स्वानुभवाने याचे मूल्यमापन करता येते. जन्म आणी मृत्यु या अनिश्चित प्रवासात तुम्ही शाश्वत किती आणी कसे जगलात याचे मोजमाप दंड ठरविणे, म्हणजे तुमचे विवेकी निःस्पृह आणी हितकारी असे स्वकर्तृत्व असते. जे पेरलेत तेच उगवते हा सृष्टिचाच नियम आहे. सारी सृष्टिच एक निसर्ग गुरु आहे. क्षणाक्षणाला ती शिकवित असते. पंचभूते त्याची साक्ष आहे.

जीवनाची सांगता ही सात्विक मनःशांती आहे असे मला वाटते.आणि ती आपल्याच संस्कारित अशा सत्कर्मावरच, संचितावरच निर्भर असते असे माझे मत. आणि हे सारे विवेकी संस्कार हे आपल्या जीवनात लाभलेल्या मैत्रसख्य अशा मार्गदर्शक आणि सावरणाऱ्या निर्मोही सहवासातूनच होत असतात. हेच सुंदर सत्य! आणि असा सर्वांगसुन्दर सहवास लाभणे म्हणजे पूर्वसंचित असते.

मी ही लेखमाला तशी केवळ स्वान्तसुखाय म्हणूनच लिहिली. अनेकांनी वाचली देखील. अनेकांनी मुक्त प्रतिक्रिया दिल्या! वाचणाऱ्या व्यक्तीमध्ये मला बालपणापासुन ओळखणारे असे माझे अनेक आदर्श, मित्र, मार्गदर्शक आहेतच. पण या माझ्या लेखमालिकेतील गुरुवर्य कै.द.वी. केसकर सर यांची आठवण वाचल्यावर मला श्रीवर्धनहून आवर्जून फोन करणारे फेसबुक मित्र असलेले मा. सुनील शरद चिटणीस आणि त्यांनी माझा परिचय करुन दिलेले ज्येष्ठवृंद प्राचार्य सूर्यकांत द.वैद्य (हडपसर पुणे) या ज्येष्ठवृंद साहित्यिकांची ओळख झाली. दोघांचेही माझे फोन झाले.

विशेष म्हणजे मा. प्राचार्य सु. द. वैद्य सर हे माझेच गुरुवर्य कै. प्राचार्य बलवंत देशमुख सर. प्राचार्य द.ता. भोसले सर, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. न. म. जोशी तसेच कै. डॉ. आनंद यादव या सर्वांचेच समकालीन असे मित्र आहेत. अशा ज्येष्ठ व्यक्तिचा परिचय होणे म्हणजेच या माझ्या लेखमालिकेची सुंदर पावतीच आहे! हा माझा आनंद!

माझे बालमित्र समीक्षक श्रीकांत दिवशिकर तसेच प्राचार्य बी.जी. आफळे सर, ख्यातनाम सीए. विजय माईणकर सर व अशा अन्य अनेक मित्रांनी ही लेखमाला सुरु ठेवा असे सांगीतले आहे!

प्राचार्य सु. द. वैद्य सरांचा हा आताचा अनपेक्षीत परिचय मा. सुनील चिटणीस (श्रीवर्धन)यांच्या मार्फत होणे. सहवास लाभणे म्हणजे हाही एक दैवयोग म्हणावा.

महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या नियोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमामुळे खूप छान सुपरिचित, दिग्गज साहित्यिकांचा माझा खूप जवळचा परिचय झाला. या सर्वाना व्याख्यानमालेचे निमंत्रण देताना सर्वश्री डॉ. सदानंद मोरे यांच्या घरी गेलो असता तिथे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचीही भेट झाली. मनसोक्त गप्पा झाल्या, विशेष म्हणजे माझ्या संतचित्राबद्दल चर्चा झाली. त्याबरोबरच पुणे विद्यापीठाचे बहि:शाल शिक्षण मंडळाचे डॉ.तेज निवळीकर सर यांचा माझा पूर्व परिचय असल्यामुळे त्यांचेही आमच्या संस्थेमध्ये संत गाडगेबाबा या विषयावर अगदी श्रवणीय व्याख्यान झाले होते. मी स्वतः पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल चा व्याख्याता असल्यामुळे मा. डॉक्टर तेज निवळीकरांच्यामुळे माझा व अनेक व्याख्यात्यांचा परिचय झाला. अनेक ठिकाणी माझी व्याख्यानेही झाली. एक लक्षात राहिलेली गोष्ट म्हणजे डॉ. निवळीकरांना मी माझी काही स्वलिखित पुस्तके भेट दिली होती. त्यांनी ती त्वरित वाचली देखील होती त्या पुस्तकाबद्दल एका व्याख्यानात माझ्या कथासंग्रहातील विठ्ठलाचा साक्षात्कार या कथेचा आवर्जून उल्लेख केला होता. त्यातून डॉ. तेज निवळीकरांची त्वरित दाद देण्याची प्रवृत्ती ही निश्चितच एक उत्तम संस्कार करून गेली. आपण वाचलेल्या दुसऱ्याच्या लेखनाचे कौतुक करणे यातून मनाचा मोठेपणा दिसून येतो.

अशा व्यक्ती कायमच्या आठवणीत राहिल्या हे मात्र खरे.!!

(आता गुरुवर्य कै. दभी.कुलकर्णी यांच्या वरील लेख पुढील २७ व्या भागात.)

© वि.ग सातपुते

9766544908

दिनांक:-९ – १२ – २०१८.

Avatar
About विलास सातपुते 459 Articles
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..