सुमित्रा भावे गेल्या, किशोर नांदलस्कर. अशी चित्रपट क्षेत्रातील एकेक जण ‘एक्झिट’ घेऊ लागल्यावर, काळजात धस्स होऊ लागलं.
किशोर एक चांगला विनोदी कलाकार होता. सुयोग, मुंबई निर्मित ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकाचे डिझाईनसाठी फोटो काढण्यासाठी मी मुंबईला शिवाजी नाट्य मंदिरात गेलो होतो. निर्माते सुधीर भट यांच्या उपस्थितीत मी राजा गोसावींसह सर्व कलाकारांचे फोटो काढले. त्यावेळी पहिल्यांदा किशोर नांदलस्कर यांना पाहिलं होतं. मी पुण्यास परतलो. डिझाईन झाली. प्रेससाठी फोटोंच्या प्रिंट्स काढून सुधीर भटांना पाठवल्या.
‘विच्छा माझी पुरी करा’ या मुंबई मधील नाटकात किशोरची भूमिका लक्षवेधी ठरली होती.
काही वर्षांनंतर प्रशांत दामलेचं ‘पाहुणा’ नाटक रंगमंचावर आलं. त्यामध्ये किशोर नांदलस्कर व उषा नाडकर्णीही काम करीत होत्या. त्या नाटकाचे बालगंधर्व रंगमंदिरात फोटो काढून मी डिझाईन केली होती. त्या कामाच्या निमित्ताने मी ते नाटक बरेच वेळा पाहिलं. किशोरची विनोदी भूमिका प्रेक्षकांचे हशें घेऊन जायची. तेव्हापासून किशोर मला नावाने ओळखू लागले.
माझे मित्र, चित्रपट दिग्दर्शक सुरेश पाटोळे यांच्या ‘धरणीआईची माया’ चित्रपटात किशोर यांनी काम केले होते. सुयोग निर्मित अनेक नाटकांतून किशोरची भूमिका असायचीच. सुधीर भटांनी एकदा किशोरच्या खाजगी जीवनाबद्दल सांगितलं होतं. त्याचं मुंबईतील घर छोटं असल्यामुळे त्याला मंदिरात झोपावं लागायचं.
महेश मांजरेकरच्या ‘वास्तव’ चित्रपटापासून किशोरला हिंदी चित्रपटांची “कवाडं” खुली झाली. त्याआधी मराठी चित्रपटातून किशोरने छोट्या मोठ्या भूमिका केल्या होत्या. काही मालिकांमधूनही किशोरने आपली छाप सोडली होती.
सई परांजपेंच्या ‘दिशा’ चित्रपटात गिरणी कामगाराची छोटी भूमिका किशोरने केली होती. पुरू बेर्डेच्या ‘हमाल दे धमाल’ चित्रपटात लक्ष्या बेर्डे बरोबर किशोर हमाल शोभला होता. ‘शेम टू शेम’ चित्रपटात शाळेतील शिपाई म्हणून किशोर दिसला होता.
हिंदी चित्रपटातील त्याच्या छोट्या भूमिका, मराठी माणसाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या होत्या. मध्यमवर्गीय मराठी माणूस त्याच्या देहबोलीतून जाणवायचा. अभिनयाचा हा वारसा त्याला वडिलांकडून मिळाला होता. स्पर्धेच्या नाटकात छोट्या भूमिका करत करत त्याने अभिनयाचा मोठा पल्ला गाठला.
जेव्हा त्याच्या “सकाळ’ मधील मुलाखतीतून मंदिरात झोपण्याविषयी सांस्कृतिक मंत्री, विलासराव देशमुख यांना कळले, त्यांनी किशोरला घर मिळवून दिले.
पहिल्यापासूनच किशोरची तब्येत शिडशिडीत असल्यामुळे वयोमानानुसार व्याधी मागे लागल्या होत्या. हार्ट सर्जरी झाल्यानंतर त्याना पेसमेकर बसवला होता. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने शुटींग बंदच होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने किशोरला गाठले. ठाणे येथे उपचार चालू असतानाच हा हवाहवासा वाटणारा ‘पाहुणा’ आपल्यातून कायमचा निघून गेला. आज ना उद्या हा कोरोना जाईलही, मात्र जाताना अजून किती जणांना घेऊन जाणार आहे? हे त्याचा तोच जाणे.
किशोर नांदलस्कर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!
© सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
२०-४-२१
Leave a Reply