काॅलेजमध्ये असताना मी परदेशवारीचं स्वप्नं पाहिलं होतं. त्याकाळी सिंगापूर, बॅंकाॅकच्या सहली स्वस्त होत्या. आमचा एक भालेराव नावाचा मित्र होता. त्याने बरेचदा अशा सहली केलेल्या होत्या. त्याने आम्हाला त्या सहलींची रसभरीत वर्णनं ऐकवली होती. त्यामुळे आम्ही देखील लवकरच सिंगापूरला जाऊ व मनसोक्त शाॅपिंग करु अशी दिवास्वप्नं पाहू लागलो.
शाॅपिंग कशाची, तर त्याकाळी नॅशनल कंपनीच्या व्हीसीआरचं खूप आकर्षण होतं तसंच एखादा व्हिडीओ कॅमेरा घ्यावा, असं मनापासून वाटायचं. लेटेस्ट स्टिल कॅमेरा घ्यावा व आपणही गौतम राजाध्यक्षासारखी फोटोग्राफी करावी अशी मला इच्छा होत असे.
काॅलेज झालं, व्यवसाय सुरु झाला. भालेरावच्या भेटीही कमी झाल्या. इतक्या दिवसांत पासपोर्टही न काढू शकल्यानं परदेशवारीचं स्वप्नं शेवटी मी ‘गुंडाळून’ ठेवलं.
त्याकाळी वर्तमानपत्रात कस्टमने जप्त केलेल्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांच्या जाहिराती असत. काही जाहिराती ‘छोट्या जाहिराती’ सदरात येत असत.
पहिल्या पानावर जाहिरात असायची ती ‘घरोंदा’ कस्टम शाॅपीची! त्या जाहिरातीत परदेशी घड्याळे, पर्फ्युम, कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, टेप रेकाॅर्डर, व्हिसीआर, खेळणी यांची यादी व किंमती दिलेल्या असत. अशीच जाहिरात वाचून आम्ही दोघे उंबऱ्या गणपती चौकातील ‘घरोंदा’च्या दुकानात गेलो. सर्व वस्तू पाहिल्या. काही वस्तूंच्या किंमती विचारल्या व बाहेर पडलो. खरेदी पेक्षा वस्तू पाहूनच आमचं मन भरुन जायचं.
दुसरं कस्टमचं रजनीगंधा नावाचं दुकान होतं, ना. सी. फडकेंच्या बंगल्याजवळ विजयानगर काॅलनीत. त्या छोट्या दुकानात आम्ही महिन्यातून एकदा तरी चक्कर टाकायचोच.
काही वर्षांनंतर ‘घरोंदा’चं दुकान हुजूरपागा शाळेच्या मागच्या बाजूला शकुनी मारुती जवळ स्थलांतरित झालं. त्याची जाहिरात पाहून आम्ही दोघं तिथे गेलो. कस्टमच्या वस्तूंनी दोन खोल्या खच्चून भरलेल्या होत्या. दोन वेळा सर्व वस्तू डोळ्यांखालून घातल्यानंतर एका प्रोजेक्टरपाशी थांबलो. तो ‘सुपर ८ एमएम’चा साऊंड असलेला नवा कोरा पोर्टेबल प्रोजेक्टर होता. त्याची किंमत होती २०००/- रुपये. आम्ही पैशाची व्यवस्था केली व त्याच दिवशी तो खरेदी केला. ऑफिसवर आणल्यावर तो उघडून पाहिला. कनेक्शन जोडून चालू असल्याची खात्री करून घेतली. आता प्रश्र्न होता, तो फिल्मचा. पुण्यात कॅम्पमधील ईस्ट स्ट्रीटवरील एका पुस्तकाच्या दुकानात “सुपर ८ एमएम’ची कार्टून फिल्मची रिळं मिळत असत. आम्ही दोघे त्या दुकानात गेलो व चार फिल्मची रिळं घेऊन आलो.
प्रोजेक्टर घरी घेऊन गेलो व जेवण झाल्यावर भिंतीलाच पडदा करुन प्रोजेक्टर सुरु केला. आठ दहा मिनिटांच्या त्या कार्टून फिल्म पाहून फार आनंद झाला. जोडीला साऊंड असल्यामुळे थिएटरमध्ये बसल्यासारखं वाटलं. त्या चारच फिल्म पुन्हा पुन्हा पाहून कंटाळलो. कॅम्पमध्ये जाऊन नवीन फिल्म खरेदी केल्या. रोज किंवा दिवसाआड आम्ही प्रोजेक्टरचा आनंद लुटत होतो.
मुंबईला कामानिमित्ताने गेल्यावर फोर्ट परिसरातील कॅमेरा, फिल्मच्या दुकानात अशी सुपर ८ एमएमची रिळं विकत मिळायची. तिथून मी डझनावर कार्टून व जाडया रड्याच्या फिल्म घेतल्या. रिळांचा संग्रह वाढू लागला. आमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना त्यात रस नव्हता. त्यांनी मला फक्त प्रोजेक्टर चालवताना लक्षात ठेवलं. त्या पाहुण्यांनी माझ्या लग्नाविषयीच्या चर्चेत नवरा मुलगा प्रोजेक्टरवर चित्रपट दाखवत गावोगावी हिंडतो, अशी बिनबुडाची जाहिरात केली. काही वर्षांनंतर मार्केटमधून ही रिळं मिळणं बंद झाली.
कामाच्या व्यापात आमचं त्या प्रोजेक्टरवर फिल्म पाहाणं देखील कमी झालं. एका मित्राच्या ओळखीने व्हिसीपी विकत घेतला. त्या व्हिसीपीवर भाड्याने व्हिडिओ कॅसेट्स आणून पाहू लागलो. काही दुर्मीळ इंग्रजी, मराठी, हिंदी चित्रपटांच्या कॅसेट्स विकतही घेतल्या. आमचे एक बाळासाहेब भिडे नावाचे मित्र आहेत. त्यांनी त्यांच्याकडील रामायणच्या कॅसेट्सचा खजिना आम्हाला दिला.
दोन वर्ष भरपूर चित्रपट पाहिल्यानंतर तो व्हिसीपी बिघडला. दुरुस्तीसाठी देऊ म्हणून राहून गेले. आता या गोष्टीला पंचवीस वर्षे होऊन गेलीत. दरम्यान तंत्रज्ञान प्रगत झालं. व्हिडिओ कॅसेट्स इतिहासात जमा झाल्या. व्हिसीआर, व्हिसीपी कालबाह्य ठरले. सीडी व सीडी प्लेयरचा जमाना आला व तोही काही वर्षांनंतर संपला. आता पेनड्राईव्हमध्ये चित्रपट लोड करुन मिळतात. यु ट्युबवर कोणताही चित्रपट पहाता येतो. अजूनही पुढे काही वर्षांनंतर नवीन तंत्रज्ञान येईल आणि आत्ताचं ‘जुनं’ होऊन जाईल.
परवा ऑफिसमधलं सामान कमी करताना तो प्रोजेक्टर, रिळं, व्हिसीपी व व्हिडिओ कॅसेट्स समोर आल्या आणि मी भूतकाळात गेलो. त्यावेळी मिळालेला आनंद हा अविस्मरणीय असाच होता मात्र आज या वस्तूंचं काय करायचं? हा मोठा प्रश्न आहे. तशी त्या वस्तूंना किंमत म्हणावी अशी मिळणारच नाही. एखादा संग्राहकच या वस्तू जपून ठेवू शकतो. अन्यथा आज त्या कवडीमोल आहेत.
कालाय तस्मै नमः
© सुरेश नावडकर
मोबाईल ९७३००३४२८४
२५-५-२१.
Leave a Reply