लिंबे नावाच्या कॅमेरून मधील पोर्ट मध्ये जहाजाच्या मेन इंजिनचा टर्बो चार्जर रिपेअर होता होता बावीस दिवस गेले. टर्बो चार्जर ज्या कंपनीने बनवला होता त्या कंपनीचा टेक्निशियन जहाजावर लिंबे पोर्ट मध्ये जहाज पोहचताच आला, त्याने एक पार्ट खोलून नेला, त्या पार्ट चे बदल्यात दुसरा नवीन पार्ट युरोप मधून येता येता वीस दिवस गेले. आणखी दोन दिवस फिटींग आणि ट्रायल घेण्यात गेल्यावर जहाज नायजेरिया मधील ब्रास ऑईल टर्मिनल वर कार्गो लोड करायला गेले. जहाजावर क्रूड ऑइल लोड केले गेले आणि जहाज क्रूड ऑइल डिस्चार्ज करण्यासाठी अमेरिकेतील पोर्टलॅंड च्या दिशेने निघाले होते. साधारण सोळा दिवस जहाज कुठेही न थांबता नायजेरीयाहून अमेरिकेला पोचणार होते. निघाल्यापासून तिसऱ्या दिवशी महिन्यातून एकदा होणारी सेफ्टी मीटिंग संध्याकाळी चार वाजता सुरू झाली. कंपनीच्या फ्लीट मध्ये असणाऱ्या इतर जहाजांवर झालेल्या अपघातांची माहिती देऊन तसे अपघात आपल्या जहाजावर होऊ नये म्हणून सूचना दिल्या गेल्या.
त्यानंतर इतर कंपन्यांच्या जहाजांवर घडलेले प्रसंग आणि अपघात याबद्दल माहिती देण्यात आली, काही दिवसांपूर्वी एक जहाज व्हेनेझुएला देशातून अमेरिकेतील पोर्ट मध्ये गेले होते. सगळे अधिकारी आणि खलाशी यांच्यासह संपूर्ण जहाजाला अटक करण्यात आली होती. प्रकरण पण तसेच गंभीर होते. त्यामुळे जहाजासह त्यावर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थानबद्ध करण्यात आले होते. जहाजावर नेहमीची कामे करण्यास परवानगी होती फक्त जहाज आणि जहाजावरुन कोणालाही कुठे जाण्याची व बाहेरील कोणाशी बोलायला परवानगी नव्हती.
ते जहाज व्हेनेझुएला मधून निघाल्यावर अमेरिकेत पोचताच अमेरिकन कोस्ट गार्ड ने त्यांना अडवले होते. जहाजाच्या भोवती एका बोट मधून चार डायव्हर पाण्यात उतरले होते. चार पैकी एक डायव्हर अर्ध्या तासाने पाण्याबाहेर आला. त्याने काहीतरी सापडले असल्याचे सांगितले. थोड्या वेळात इतर तिघे पण पाण्याबाहेर आले. सगळ्यांनी पुन्हा एकदा पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर चढवले आणि जाताना सोबत मोठा दोर आणि हूक नेले. दहा मिनिटांनी दोघे जण बाहेर आले आणि त्यांनी त्यांच्या बोटच्या कॅप्टनला क्रेन च्या साहाय्याने दोर ओढायला सांगितले. जहाजावरील सगळे अधिकारी आणि खलाशी हा काय प्रकार चालू आहे हे बघून चक्रावले होते. कॅप्टनला तर घाम फुटला होता. हळू हळू दोर खेचला जाऊ लागला होता जहाजाच्या खालून नितळ निळ्या पाण्यातून एक जड वस्तू वर येताना दिसू लागली होती. जहाजावरील सगळ्या अधिकाऱ्यांनी श्वास रोखून धरले होते. शेवटी ती जड वस्तू छोट्या डायव्हर बोट च्या मेन डेकवर क्रेनच्या साहाय्याने उतरवली गेली. या सगळ्या प्रकाराचे कोस्ट गार्ड आलेल्या क्षणापासून व्हिडिओ शूटिंग सुरू होते तसेच अधून मधून यु एस कोस्ट गार्ड चे अधिकारी फोटो सुध्दा घेत होते. जहाजाच्या तळाशी एक मोठे आणि शक्तिशाली लोहचुंबक लावले होते आणि त्या लोहचुंबकाला सुमारे पन्नास किलो वजनाचे अंमली पदार्थ वॉटर प्रूफ पॅकिंग मध्ये बांधण्यात आले होते. ही गोष्ट जहाजावरील सगळ्या अधिकाऱ्यांना आणि खलाशांना समजल्यावर सगळ्यांचे अवसान गळून पडले. आता आपले पुढे काय होणार या भीतीने सगळ्यांचे चेहरे काळवंडले गेले होते. यामध्ये कोण कोण सामील असू शकतो या नजरेने जो तो एकमेकांकडे संशयाने बघू लागला. कॅप्टन शून्य नजरेने पाण्याकडे बघत स्तब्धपणे उभा होता. शेवटी कोस्ट गार्ड च्या अधिकाऱ्याने त्याला हलवले आणि सगळ्यांना घेऊन मेस रूम मध्ये येण्यास सांगितले. मेस रूम मध्ये सगळे जमल्यावर कोस्ट गार्ड कडून सर्वांना अटक करण्यात आली आहे असे सांगितले गेले आणि चौकशीसाठी सगळ्यांकडून सहकार्य मिळेल अशी अपेक्षा बोलून दाखवली गेली . सगळे अधिकारी आणि खलाशी हा अनपेक्षित प्रकार बघून खूप घाबरले होते कोणी घरच्यांची आठवण काढत होता तर कोणी देवाची प्रार्थना करू लागला होता.
साधारण दोन तासाच्या चौकशी नंतर कोस्ट गार्ड चे अधिकारी निघून गेले, जहाजावर चार सिक्यूरीटी गार्ड आणि खाली एक कोस्ट गार्ड ची अद्ययावत स्पीड बोट अशा पहाऱ्यात जहाज किनाऱ्यापासून दहा मैलांवर खोल समुद्रात थांबवले गेले होते.
दोन दिवस प्रचंड मानसिक दबावाखाली गेल्यावर सगळ्या अधिकाऱ्यांना आणि खलाशांना अमेरिकेत ड्रग्स आणल्याच्या आरोपातून मुक्त करण्यात आले. जहाजाच्या तळाशी लोहचुंबक लावून ड्रग्स ची स्मग्लींग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा छडा लावण्यात अमेरिकेतील यंत्रणा यशस्वी झाली होती. जहाज पोर्ट मध्ये असताना त्याच्या तळाशी रात्रीच्या अंधारात पाणबुडे उतरवून ड्रग्स ची स्मग्लिंग केली जात असे. पण त्या टोळीतील एक जण पैशांच्या वादातून बाहेर पडला आणि त्याने कोस्ट गार्ड ला सगळी माहिती पुरवली होती. जहाजावर सगळे जण ही माहिती मिळताच आनंदाने रडू लागले होते. अमेरिकेच्या जेल मध्ये खितपत पडल्याची स्वप्ने बघितलेले अधिकारी आणि खलाशी दोन दिवसाचा ताण आणि थकवा विसरून जहाज चालवायला लगेच सज्ज सुद्धा झाले होते.
ह्या प्रसंगाची माहिती आमच्या जहाजावर सांगितल्या नंतर पंप मन बोलू का नको अशा विचारात दिसल्यावर कॅप्टन ने शेवटी त्याला विचारलेच की पंपी तुला काही बोलायचे आहे का? त्यावर पंप मन चाचरत चाचरत सांगू लागला की नायजेरिया मध्ये कार्गो लोडींग सुरू असताना आपल्या जहाजाच्या मागे रात्री अकरा वाजता एक फिशिंग बोट बराच वेळ उभी होती आणि एक दोघे जण आळी पाळीने पाण्यात उड्या मारत होते. मला त्यांनी मागच्या बाजूला आलेले पाहिले आणि ते लगेच निघून गेले. पंप मनने हे सर्व सांगितलं आणि सगळ्यांच्या मनात भीती दाटून गेली की आता आपले पण जहाज अमेरिकेलाच चालले आहे आणि नायजेरियात जहाजाच्या मागे असणारी बोट फिशिंग ऐवजी स्मगलींग बोट असली तर आपल्याला वाचवणारा कोणी नसेल. पुढील पंधरा दिवस ही भीती घेऊन कसेबसे दिवस काढले जात होते. अमेरिकेत कार्गो डिस्चार्ज करून जहाज बाहेर पडले आणि कॅनडा मधील विफेनहेड पोर्टच्या दिशेने निघाले तेव्हा कुठे सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरिन इंजिनियर
B. E. (mech)
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply