पैसा गुंतविण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जमीन विकत घेणे. म्हणतात ना, सोन्याची विक्री हातोहात होते तर जमिनीची विक्री रातोरात होते. सांगायचे तात्पर्य हेच की, दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून स्वत:च्या मालकीची जमीन असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. माझी जमीन किती आणि कुठपर्यंत आहे ? याची प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यासाठी आपण जमिनीची मोजणी करत
असतो.
आपल्याकडे स्वत:च्या मालकीची अथवा वडिलोपार्जीत जमीन असेल तर त्याची मोजणी ही आपल्याला करावीच लागते. जमिनीची मोजणी कशी केली जाते ? दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर, तसेच आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी त्या जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिले जातात.
मोजणीच्या अनुषंगाने विविध प्रकारचे अभिलेख तयार करुन त्यामध्ये मोजणीचे नकाशे तयार केले जातात त्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडे त्यांचे संधारण केले जाते. जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीसाठी अर्ज करावा लागतो.
जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार मोजणी फी भरुन त्याची नोंद मोजणी नोंदवहीत घेतली जाते. संबंधितधारकांना आगावू नोटीसद्वारे कळवून मोजणीची तारीख निश्चित केली जाते. ठरलेल्या दिवशी भूमापक जागेवर येऊन प्रत्यक्ष कब्जेदाराच्या मोजणी अर्जदार, लगत कब्जेदार व पंचमंडळी यांच्या समक्ष मोजणी कामास सुरुवात केली जाते. वहिवाटीच्या खुणांवर निशाण लावून त्याआधारे प्लेन टेबलवर ठेवलेल्या नकाशा शीटवर वहिवाटीची आकृती नगरभूमापन मोजणीत 1.500 या परिमाणात तर शेतजमिनीची मोजणी 1.1000 या परिमाणात तयार होते.
त्यानंतर मूळ अभिलेखाच्या आधारे वहिवाटीच्या नकाशावर सुपर इंपोज करुन नकाशावर हद्दीच्या खुणा निश्चित केल्या जातात आणि त्या नकाशाच्या आधारावर मूळ अभिलेखाप्रमाणे अर्जदारास हद्दीच्या खुणा कायम करुन प्रत्यक्ष जागेवर नव्याने दाखवल्या जातात. अशा प्रकारे जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया पूर्ण होते.
यापुढे जेव्हा आपण जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे वादविवाद मिटविण्यासाठी भूमी अभिलेख व भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात जमीन मोजणीचा अर्ज कराल तेव्हा, या लेखात सांगितलेल्या पायऱ्या पूर्ण झाल्या की आपली नोंदणी पूर्ण झाली असे समजावे.
महसूल विभागाने या पुढे आपल्या भूमिसंदर्भातील सर्व अभिलेखांचे संगणकीकरण करण्याचेही काम हाती घेतले आहे. भूमापकांना प्रशिक्षण देण्यासाठी सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण देण्याची योजना आखली आहे. प्रशिक्षण हे मनुष्यबळ विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. कौशल्य स्थापित करुन त्याचा विकास करण्याच्या दृष्टीने व अद्ययावत ज्ञानाशी सुसंगत राहण्यासाठी औरंगाबाद येथे भूमी अभिलेख प्रशिक्षण शाळा सन 1985 पासून स्थायी स्वरुपात सुरू आहे. कुशल व प्रशिक्षित भूमापक म्हणजे काम चोख व वेळेत होण्याची हमी आहे.
— अर्चना शंभरकर
Leave a Reply