आषाढ महिना म्हटलं की आपल्या सगळ्यांना डोळ्यांसमोर येते ती आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा. पण आषाढ मासाच्या पहिल्याच दिवशी आणखीन एक महत्वाचा दिवस असतो आणि तो दिवस म्हणजे ‘महाकवी कालिदास दिन’.
“आषाढस्य प्रथम दिवसे मेघ माश्र्लिष्टसानुं, वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श”
महाकवी कालिदासांच्या ‘मेघदूत’ मधल्या या ओव्या. महकवी कालिदास यांचे वाङमय प्रसिद्ध असले, तरीदेखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही.
त्यांच्याबद्दल एक लोककथेनुसार अशी आख्यायिका आहे की, विद्योत्तमा नावाच्या एका राजकुुमारीने जो तिला शास्त्रार्थात हरवेल त्याच्याशी लग्न करायचे ठरवले होते. राज्यातील सर्व विद्वानांना ती हरवते. तिचा सूड उगवण्यासाठी राज्यातील सर्वात मूर्ख व्यक्तीचा शोध घेऊन, त्याला जिंकवून तिचा विवाह लावून दिला जातो. कालांतराने हे जेव्हा तिला कळते तेव्हा ती व्यक्तीचा अपमान करते. ती म्हणते, ‘अस्ति कश्चित् वाग्विशेषः? आपल्या वाणीमध्ये काही विशेषत: आहे?’ राजकन्या रागात त्या व्यक्तीला हाकलून देते. पश्चात्ताप होऊन ती व्यक्ती जीव देण्यासाठी निघून जाते. वाटेत एक कालिमातेचे देऊळ लागते. तिथे गेल्यावर त्या व्यक्तीची समाधी लागते आणि सात दिवसानंतर कालिमाता प्रसन्न होऊन त्या व्यक्तीला दृष्टांत देते, `तू मरणाचा विचार सोडून दे. शिक्षण घे. कष्ट कर. सर्व कलांमध्ये, शास्त्रांमध्ये पारंगत हो आणि साहित्यनिर्मिती करून राजकन्येशी सुखाचा संसार कर.’
देवीच्या सांगण्यानुसार ती व्यक्ती एका गुरुंना शरण जाते, त्यांच्याकडे सेवा करून ज्ञानार्जन करते आणि बारा वर्षांच्या खडतर ज्ञानतपश्चर्येनंतर शिक्षणात परिपूर्ण होऊन विद्वत्तसभांमध्ये जाते. काही काळाने ती व्यक्ती सासऱ्यांच्या राज्यात येते, तिथेही विद्वतसभा जिंकते. सासरे आणि त्याची पत्नी त्या व्यक्तीला ओळखत नाहीत. ती व्यक्ती स्वत:ची ओळख करून देत क्षमा मागते. त्याची विद्वत्ता पाहून पत्नीही खुश होते आणि त्यांचा संसार पूर्ण होतो. अशी ती विद्वान व्यक्ती कालिमातेचा भक्त म्हणून `कालिदास’ नावाने ओळखली जाते.
आपल्या अपमानाला उत्तर म्हणून कालिदासांनी खूप अभ्यास करून आपल्यावरचा मूर्ख हा शिक्का काढून टाकला, आणि अस्ति, कश्चित् आणि वाग् या शब्दांनी सुरू होणारी तीन काव्ये रचली. ती काव्ये अशी : अस्त्युत्तरस्याम् दिशि देवातात्मा हिमालयो नाम नगाधिराज:। (कुमारसंभवची सुरुवात); कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत:। (मेघदूताची सुरुवात) आणि वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिप्रत्तये । जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ ॥(रघुवंशाची सुरुवात).
मेघदूत नाटकात नवविवाहित यक्ष आणि त्याच्या पत्नीची कहाणी महाकवी कालिदासांनी लिहिलेली आहे. त्यात यक्ष हा कुबेराचा सेवक असून तो रोज सकाळी शिवशंभुच्या पूजेसाठी फुलांची परडी कुबेरासाठी तयार करून ठेवत असे. हा यक्ष सकाळच्या बदल्यात रात्रीच फुलं तोडून ठेवत असे. नवदाम्पत्य असल्याने सकाळी उठण्यास उशीर होत असे. तरीही फुलांची परडी कुबेर पूजेला बसण्यापूर्वी पूजेच्या स्थळी पोहोचत असे. एक दिवस पूजेला बसतेवेळी कुबेराला त्या फुलांवर भ्रमर मकरंद सेवन करीत असल्याचे ध्यानात येते. कुबेराला शंका येते आणि तो त्या यक्ष सेवकाला त्याबद्दल विचारणा करतो आणि सत्य समोर येते. कुबेर त्या यक्ष सेवकाला दंड म्हणून एक वर्ष घरापासून दूर राहण्याची आज्ञा करतो व वर्षभर तुझं सगळं सामर्थ्य जाऊन तू दुबळा होशील असा शाप यक्षाला मिळतो.
यानंतर यक्ष रामगिरी पर्वतावर आपली शिक्षा भोगत असतो. शापामुळे तो खरोखरच दुबळा होऊन त्याच्या मनगटात असलेलं सोन्याचं कडं ही हातातून गळून खाली पडतं. तो पत्नीच्या विरहाने व्याकुळ होतो. आता त्याच्या मनात आपल्या प्रियतमेला एखादा प्रेमसंदेश पाठविण्याचा विचार येतो. पण तो कोणासोबत पाठवायचा? हा दुसऱ्या विचारांचा तरंग त्याला निराश करून सोडतो. इतक्यात त्याला त्याच्या समोरून आषाढाचे काळेकुट्ट मेघ येताना दिसतात. तो त्यांच्याशी संवाद साधून त्यांना आपल्या हिमालयातील निवासाचा पत्ता देऊन आपल्या प्रिय सखीचं वर्णन करतो आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करतो व त्या आपल्या प्रिय सखीला सांगण्याची विनंती करतो.
या नाटकात शृंगाररस जरी भरभरून असला तरी त्यात कुठेच अश्लीलता दिसून येत नाही.
महाकवी कालिदासांनी मेघदूत या नाटकांव्यतिरिक्त ऋतुसंहार, कुमारसंभव, रघुवंश ही काव्य व मालविकाग्नीमित्रम, शाकुंतल, विक्रर्मोवशीय ही नाटकं लिहिली आहेत.
अशा या थोर विद्वान महाकवींना आषाढ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच ‘महाकवी कालिदास दिनाचे’ औचित्य साधून आपल्या समूहातर्फे मानवंदना.
– आदित्य दि. संभूस.
(अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)
संदर्भ: माहितीजाल, लोकमत मधील ज्योत्स्ना गाडगीळ यांचा लेख.
११/०७/२०२१.
Leave a Reply