अखिल भारतीय विद्यार्थी परिषदही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी साम्य असलेली विद्यार्थी संघटना आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केली होती. १९४८ मध्ये अभाविपची स्थापना झाली. अर्थात, संस्थेची अधिकृत नोंदणी ही ९ जुलै १९४९ मध्ये झाली. देशातील विविध विद्यापीठांमधील डाव्या विचारांचा पगडा कमी करणं हा अभाविपच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश होता.
मुंबई मधील एक प्राध्यापक यशवंतराव केळकर हे खऱ्या अर्थानं अभाविपचे शिल्पकार होत. १९५८ मध्ये यशवंतराव केळकर हे अभाविपचे प्रमुख संघटक बनले. अभाविपच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सध्या अभाविपचं जे स्वरूप आहे, त्यामागे केळकरांचे प्रयत्न आहेत.
७०च्या दशकात जयप्रकाश नारायण यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात अभाविप आक्रमकपणे सहभागी झाली होती. आणिबाणीच्या काळात अभाविपची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली. आसाममध्ये उभे राहिलेलं बांगलादेशी घुसखोरी विरोधीचे जनांदोलन, १९८०च्या दशकातली खलिस्तानी चळवळी, श्रीलंकेतील तमिळवंशीय आंदोलनाचा प्रश्न, उत्तरार्धात आणि त्यानंतर उग्र रूप धारण केलेला काश्मीर प्रश्न आणि दहशतवादाचा प्रश्न अशा विविध राष्ट्रीय प्रश्नांवर अभाविपनं सातत्यानं भूमिका घेतल्या.१९९० च्या दशकात मंडल आयोग, राम मंदिर अशा प्रश्नावर सक्रिय होत अभाविपनं राजकारणातले आपले पाय अधिक ठामपणे रोवले.
अभाविप भलेही आग्रहानं आपण भाजपची नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना असल्याचं सांगते. पण अनेक अभ्यासकांच्या मते मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमधली सीमारेषाच धूसर आहे. त्यामुळे अभाविपला संघाची किंवा भाजपची विद्यार्थी संघटना म्हटल्यानं काहीच फरक पडत नाही.
अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात अभाविपचा विस्तार लक्षणीयरित्या झाला. पण २०१४ पासून अभाविपची सदस्य संख्या झपाट्यानं वाढली आहे.२०१४ ते २०१५ या एका वर्षात अभाविपच्या सदस्यसंख्येमध्ये दहा लाखांची भर पडल्याचा दावा अभाविपकडून करण्यात आला होता.तीस लाख वीस हजाराहून जास्त सदस्य असलेली ही जगातील मोठी विद्यार्थी संघटना आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी पास आउट होऊन बाहेर पडत असतात. त्यामुळे अभाविपकडून नियमितपणे नवीन विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग कॅम्प घेतले जातात.
भाजपमधील नेत्यांची एक मोठी फळी अभाविपतूनच राजकारणात सक्रिय झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, अनंत कुमार, रवी शंकर प्रसाद, जेपी नड्डा या भाजप सरकारमधील सध्याच्या नेत्यांची पार्श्वभूमी अभाविपचीच आहे. पाच हजारहून अधिक शहरांमध्ये शाखा, नऊ हजार कँपस युनिटसह देशभरातील हजारो महाविद्यालयांमध्ये अभाविप कार्यरत आहे.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply