आपल्या कसदार अभिनयाने रसिकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचा जन्म १२ फेब्रुवारी १९२० रोजी झाला.
प्राण किशन सिकंद ऊर्फ ’प्राण’ हे खऱ्या अर्थाने बॉलिवूडचा प्राण होते. दमदार आवाज आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवले. खलनायक म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.
प्राण यांचे वडील लाला केवल कृष्णन सिकंद हे सरकारी सेवेत होते. कामामुळे वडिलांची सतत बदली होत असल्याने प्राण यांचे शिक्षण कपूरथळा, उन्नाव, मेरठ, डेहराडून आणि रामपूर या शहरांमध्ये झाले. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर प्राण हे मुंबईत स्थायिक झाले.
प्राण नशिबानेच चित्रपटसृष्टीत आले. त्यांनी लाहोरमध्ये फोटोग्राफर म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र, १९४० नंतर त्यांचे नशीब पालटले. प्राण यांनी बॉलीवूड मध्ये ७० हून अधिक वर्षे काम करून ४०० हून अधिक चित्रपटांत अभिनय केला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश नूरजहान यांच्या बरोबर ‘खानदान’ या चित्रपटात १९४२ साली केलेल्या नायकाच्या भूमिकेपासून झाला. प्राण यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात लाहोरमध्ये तयार झालेल्या १७ चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यांना “यमला जट’ या पंजाबी सिनेमात अभिनय करण्याची संधी पहिल्यांदा मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांना उपकार, आँसू बन गये फूल, बेईमान या चित्रपटांमधील उत्कृष्ट भूमिकांबद्दल फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. याशिवाय अन्य अनेक पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. तर चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले.
“बाल ब्रम्हचारी’ या चित्रपटाद्वारे खलनायक म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. त्यांनी जंजीर, कर्ज, डॉन या चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. प्राण यांनी दमदार अभिनयाने खलनायकी व चरित्र अभिनेता म्हणून अनेक चित्रपट गाजवले. सर्वच चित्रपटांमध्ये त्यांनी जबरदस्त भूमिका केल्या. राम और श्याम, खानदान, दुनिया, जिस देश मे गंगा बहती है, उपकार, जॉनी मेरा नाम, जंजीर, डॉन, साहिब, आँसू बन गये फुल, बेमान, बाल ब्रम्हचारी आदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
प्राण यांचा अभिनय एवढा दमदार होता की “राम और श्याम’ या चित्रपटानंतर प्रेक्षक खासगी आयुष्यातसुद्धा त्यांच्याकडे खलनायक म्हणून पाहू लागले होते. त्यांच्याविषयीची एक किस्सा प्रसिध्द आहे,की लोकांमध्ये त्यांची भिती अशाप्रकारे होती,की त्याकाळी कुणीच आपल्या मुलाचे नाव प्राण ठेवत नव्हते. मात्र “उपकार’मधील मलंग चाचाच्या भूमिकेनंतर त्यांची पडद्यावरील प्रतिमा साफ बदलून गेली. फोटोग्राफी आणि अभिनयाबरोबर प्राण यांना खेळातही विशेष आवड होती. त्यांनी अनेक क्रिकेटपटूंना सढळ हस्ते आर्थिक मदत केली होती. त्यांना फुटबॉलचीही आवड होती. त्यांनी एक फुटबॉल क्लबही स्थापन केला होता. प्राण यांचे १२ जुलै २०१३ रोजी निधन झाले. प्राण यांना आदरांजली.
– संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply