लाखो टन वजन वाहून नेण्याची क्षमता असणारे तेलवाहू, मालवाहू आणि कंटेनर नेणारे प्रचंड मोठी जहाजे निर्माण करण्यात येत आहेत. अशा जहाजांना चालविण्यासाठी तेवढ्याच प्रचंड आणि शक्तिशाली इंजिन्सची आवश्यकता असते. जहाजाचे आकार वाढले, शक्ती वाढली तसेच माल वाहतूक करण्याची क्षमता सुद्धा वाढली परंतु अशा जहाजांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची संख्या वाढण्या ऐवजी दिवसेंदिवस कमी कमी व्हायला. पंचवीस हजार टन क्षमता असणाऱ्या जहाजावर पण एकूण पंचवीस ते तीस अधिकारी व कर्मचारी असतात आणि चार लाख टन क्षमता असणाऱ्या जहाजावर सुद्धा तेवढ्याच कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची आवशयकता असते. कॅप्टन सह चार नेव्हीगेशन ऑफिसर आणि चार इंजिनियर ऑफिसर अशा कमीत कमी आठ अधिकाऱ्यांसह इतर खलाशी असतात. जहाजाच्या कंडिशन नुसार कमी अधिक अधिकारी किंवा खलाशी वाढविले जातात. भविष्यात नवीन अधिकारी आणि खलाशी तयार व्हावेत म्हणून कॅडेट, ट्रेनी सी मन आणि जुनियर इंजिनियरना प्रशिक्षणार्थी म्हणून ठेवले जाते. काही काही कंपन्या तर त्यांना सुद्धा पाठवायला तयार नसतात.
एवढी महाकाय आणि प्रचंड जहाजे फक्त पंचवीस ते तीस जण दिवस रात्र आणि महिनोमहिने न थांबता कसे काय चालवत असतील असा प्रश्न एखादे जहाज जवळून बघणाऱ्यांना नेहमी पडत असतो. जहाजाचा प्रोपेलर शाफ्ट फिरवून जहाजाला पाण्यात पुढे किंवा मागे नेणाऱ्या इंजिनला जहाजाचे मेन इंजिन बोलतात काही काही जहाजे जसे की क्रूझ लायनर किंवा कंटेनर शिप यांच्यावर जास्त वेग मिळावा म्हणून दोन दोन मेन इंजिन असतात अन्यथा बहुतेक सर्व जहाजांवर एकच मेन इंजिन असते. हे मेन इंजिन जहाजाच्या नेव्हीगेशनल ब्रिज, इंजिन कंट्रोल रूम तसेच प्रत्यक्ष इंजिन जवळील कंट्रोल वरून चालू करता येते. पुढे जाण्यासाठी अहेड मुव्हमेन्ट आणि मागे किंवा रिव्हर्स येण्यासाठी अस्टर्न मुव्हमेन्ट असा शब्द प्रयोग केला जातो. जहाज सुरु करून त्याचा वेग कमी जास्त करण्यासाठी इंजिन कंट्रोल कॉन्सोल नावाचा एक लिव्हर असतो ज्याला अहेड आणि अस्टर्न म्हणजेच पुढे आणि मागे नेण्यासाठी डेड स्लो, स्लो, हाफ आणि फुल्ल तसेच मॅक्स फुल्ल अशा दोन्हीही बाजूला इंजिनचा स्पीड सेट केलेला असतो. मोठ्या जहाजाचे मेन इंजिनचे आर पी एम फक्त 100 ते 125 एवढेच असते. म्हणजेच एका मिनिटात प्रोपेलर जर 100 ते 125 वेळा फिरत असतो तेव्हा जहाज तासाभरात सुमारे बारा ते पंधरा नॉॅट्स म्हणजेच पंचवीस ते तीस किलोमीटर अंतर कापू शकते. साधारण पणे संपूर्ण दिवसभरात एखादे जहाज 650 ते 725 किलोमीटर अंतर पार करत असतं.
लाखो टन माल वाहून नेणारे जहाज हल्ली एवढे अत्याधुनीक आणि स्मार्ट झाले आहेत की त्यावरील मेन इंजिन, जनरेटर, क्रेन, पंप आणि इतर सर्व मशिन्स आणि मशीनरी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर द्वारे नियंत्रीत केली जाते. टच स्क्रिन पॅनल वर नुसते टच केल्याने जहाजाचे इंजिन चालू किंवा बंद होते. इंजिन किंवा मशिनरी मध्ये वाढणारे तापमान, प्रेशर किंवा अन्य काही बिघाडाची सूचना आणि अलार्म कंट्रोल रूम मधील कम्पुटर वर येतात. शक्य असल्यास कम्पुटर द्वारेच सूचना देऊन नियंत्रण मिळवले जाते. असं टच करुन जहाज चालत आणि नियंत्रीत होतं असेल तर जहाज चालवणे खूप सोप्प आहे पण जहाज आणि इतर मशीनरी चालू करण्यापूर्वी सर्व यंत्रणा व्यवस्थित सेट कराव्या लागतात. फ्युएल प्रेशर, फ्युएल टेम्परेचर अंदाजे 110 °c , कूलिंग वॉटर, इंजिन सुरु करण्यासाठी हाय प्रेशर कॉम्प्रेस एअर, लुब्रिकेशन ऑइल अशा कितीतरी यंत्रणा सुरु ठेवाव्या लागतात. दिवसेंदिवस वाढणारी अत्याधुनिकता आणि तंत्रज्ञान कामं तर सोप्पे करत आहेत पण कामं करणाऱ्यांची संख्या मात्र कमी करत आहे. जागतिक व्यापार वाढतोय, नवीन जहाजे येतायत पण येणारे एकच मोठे महाकाय जहाज पूर्वीच्या जुन्या चार जहाजांचा माल वाहून नेतंय ज्यामुळे जहाजावर काम करणाऱ्या खलाशी आणि अधिकाऱ्यांना असणाऱ्या नोकऱ्या कमी होतायत. वाढणाऱ्या जागतिक व्यापारात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळं नोकरीच्या संधी मात्र दिवसेंदिवस कमी कमी होतं जातायत.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर.
B. E. (Mech), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply