आज आषाढी एकादशी! त्यानिमित्ताने मागील काही जुन्या नाटकांचा अभ्यास करते वेळेस अचानक समोर ‘संगीत संत कान्होपात्रा’ नामक नाटक उभं ठाकलं. जास्तीचा अभ्यास करताना हे नाटक केवढं जुनं आहे हे लक्षात आलं.
१९३१ च्या काळात हे नाटक रंगभूमीवर आलं असं वाचनातून निदर्शनास आलं. १९ नोव्हेंबर १९३१ रोजी या नाटकाचा प्रथम प्रयोग झाला. या नाटकाला संगीत मा. कृष्णराव व विनायकबुवा पटवर्धन यांचं लाभलं.
नाटकात संत कान्होपात्रा यांच्या जीवनावर आधारित घडलेल्या काही ठळक प्रसंगांना नाट्य लेखक ना. वि. कुलकर्णी यांनी अधोरेखित केलं आहे.
असं म्हणतात की संत कान्होपात्रा या मंगळवेढ्याच्या श्यामा नामक गणिकेची मुलगी पण पूर्वकर्मानुसार व संचित पूर्वपुण्यानुसार लहानपणापासूनच भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या. त्यांची भक्ती इतकी थोर होती की प्रत्यक्षात परब्रम्ह विठू माऊलीला त्यांची तळमळ पहावली नाही आणि खरोखरच त्याने त्यांचा अंत न पहाता त्यांना हृदयात स्थान दिलं.
सामान्य कुटुंबात जन्माला आलेल्या संत कान्होपात्रा यांचे वास्तव्य पंढरपूर जवळ असलेल्या मंगळवेढ्यात होते. त्या अत्यंत रूपवान होत्या आणि म्हणूनच कर्नाटकातील बेदर बादशहाने त्यांना पळवून आणण्यासाठी त्याच्या सेवकाला धाडलं. कान्होपात्रा नेमाप्रमाणे एका विठ्ठल मंदिरात वीणा आणि चिपळ्या घेऊन भक्तीत तल्लीन झालेल्या असताना तो सेवक त्या घरी जाण्यासाठी बाहेर पडतील त्यावेळेस त्यांना पळवता येईल या दृष्टीने बाहेर उभा राहतो. बराच काळ बाहेर तात्कळल्यानंतर तो आत प्रवेश करतो आणि कान्होपात्रा यांच्या ध्यानात ती गोष्ट येते आणि त्या गर्भगृहात जाऊन पांडुरंगाच्या चरणांना घट्ट मिठी मारून त्याच्यापासून बचाव करण्याची भाक भाकू लागतात आणि इथेच त्या प्राण सोडतात.
संत कान्होपात्रा नाटकातील गाणी:
१)अगा वैकुंठीच्या राया
२)अवघाचि संसार सुखाचा
३)अशी नटे ही चारुता
४)जोहार मायबाप जोहार
५)दीन पतित अन्यायी
६)देवा धरिले चरण
७)धाव घाली विठू आता
८)नुरले मानस उदास
९)पति तो का नावडे
१०)पतित तू पावना
११)शर लागला तुझा गे
यातील ‘अगा वैकुंठीच्या राया’ या अभंगात त्यांची आर्तता अधिक दिसून येते. वैकुंठीच्या राया तुझ्या चरणाशी मला अखंड थारा दे, सखया विठ्ठला मला या भवनदीतून पार कर, नारायणा मला भक्तीचं दान देऊन माझ्या नरदेहाला गती दे, वासुदेवाच्या नंदना, रखुमाई वल्लभा आता तू मलाही पदरात घे साधारणतः असा भाव संत कान्होपात्रा यांचा त्यावेळी असावा असं मला वाटतं.
याच अभंगाची व्हिडीओ लिंक खाली देत आहे.
(किर्ती शिलेदारांच्या आवाजात)
https://www.youtube.com/watch?v=7qtZbvCNDxc
(पं. राम मराठे यांच्या स्वरात)
https://www.youtube.com/watch?v=azhXqtzIrFw
— आदित्य दि. संभूस.
(अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)
व्हिडीओ सौजन्य: मुकुंद मराठे व दीप्ती भोगले यांचे यूट्यूब चॅनेल.
२०/०७/२०२१.
Leave a Reply