नवीन लेखन...

नामांकित संगीतकार व गायक अच्युत ठाकूर

अच्युत ठाकूर हे गेल्या ४० हून अधिक वर्षांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत होते. ठाकूर यांचे मूळ गाव अलिबागजवळचं कोपर हे. घरची पार्श्वभूमी संगीताची. वडील जि. प. शाळेत शिक्षक. पोयनाड येथील शाळेच्या स्नेहसंमेलनात ठाकूर यांनी गायलेल्या ‘इंद्रायणी काठी’गाण्याला प्रथम पारितोषिक मिळाले होते. त्यांनी सुरुवातीचे संगीताचे धडे पं. शिवरामबुवा वरळीकर यांच्याकडे त्यांनी घेतले होते. पुढे या क्षेत्रातील त्यांचे गुरू पं. प्रभाकर म्हात्रे, आचार्य डी. पी. अडसूळ, खाँ साहेब गुलाम खाजाँ, पं. यशवंतबुवा जोशी, विश्वनाथ मोरे हे होत. संगीतकार, गायक सुधीर फडके यांनी तर १९७२ साली अच्युत ठाकूर यांना सांगितले होते की, तू मुंबईत येऊन गाणं शिक, उद्याचा चांगला गायक होशील. वडिलांकडून केवळ १० रुपये घेऊन गाणं शिकण्यासाठी ते मुंबईतआले. मुंबईत आल्यावर त्यांनी गांधर्व महाविद्यालयातून ‘संगीत विशारद’केले. संगीतकार विश्वनाथ मोरे यांच्याकडे त्यांनी सात वर्षे सहाय्यक म्हणून काम केले. या काळात त्यांनी त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकून घेतल्या. १९८३ साली ‘श्री रामायण’हा मराठी चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट होता. त्यातली गाणी त्या वेळी गाजली होती. त्यानंतर ‘सौभाग्य वैंकण’, ‘पैज लग्नाची’,‘घे भरारी’,‘सत्ताधीश’,‘गृहलक्ष्मी’,‘सख्खा भाऊ पक्का वैरी’,‘आता लग्नाला चला’,‘सर्जा राजा’,‘मर्मबंध’,‘चिमणी पाखरं’,‘तुझा दुरावा’,‘विठाबाई’ अशा अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. ‘चिमणी पाखरं’हा चित्रपट तर गाण्यांसाठी खूप गाजला. अनेक नाटकांनाही अच्युत ठाकूर यांनी संगीत दिले होते. ‘चूप गुपचूप’,‘नटरंग’, ‘तीन पैशांचा तमाशा’,‘जांभूळ आख्यान’तसेच आगरी भाषेतलं ‘हा वनवा ईझेल का’ही नाटके रंगभूमीवर फार गाजली. जवळजवळ त्यांनी ४० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले होते, तसेच तर २० नाटकांना संगीत दिली होते. ‘जांभूळ आख्यान’ हे त्यांनी संगीतबद्ध केलेले नाटक आज ३० हून अधिक वर्षे चालू आहे, तर ‘पैज लग्नाची’ आणि ‘मर्मबंध’ या चित्रपटांना संगीतकार, गायक म्हणून त्यांना दोन-दोन राज्य पुरस्कार मिळाले होते. शिवाय त्यांनी काही मालिकांनाही संगीत दिले आहे. त्याही मालिका खूप गाजल्या.

१९८९ साली एकदा ‘जांभूळ आख्यान’नाटकाच्या प्रयोगाला पु. ल. देशपांडे आले होते. त्यांनी हे नाटक पाहिलं आणि या नाटकाचं संगीत त्यांना इतके आवडलं की, त्याच दरम्यान ते त्यांच्या ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाची जुळवाजुळव करीत होते. ह्या नाटकासाठी संगीतकार म्हणून पु. लं. नी तत्काळ अच्युत ठाकूर यांची निवड केली होती. १९८४ साली नागपूरमध्ये एका कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यासमोर अच्युत ठाकूर यांनी आपल्या सुमधूर आवाजात महाराष्ट्र गीत गायले. तेव्हा वसंतदादांनी हे गीत ऐकून ‘अंगावर रोमांच उभे राहिले,’ या शब्दांत त्यांचा गौरव केला, तर त्याच वर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका कार्यक्रमात त्यांचं गाणं ऐकल्यानंतर ‘तू उद्याचा निश्चित मोठा कलावंत होशील,’ अशी भविष्यवाणी वर्तविली होती. अच्युत ठाकूर हे मुंबई आकाशवाणीचे उच्च श्रेणीप्राप्त सुगम संगीत गायक व संगीतकार होते. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या संगीत विभागात सुगम संगीताचे प्राध्यापक म्हणून काम केले असून अनेक नवोदितांना गायकीचे प्रशिक्षण देण्याचे काम ते करीत असत. त्यांचे उर्मिला धनगर, संगीतकार नीलेश मोहरीर, मोना कामत, विद्या करलगीकर, अनरब चक्रवर्ती असे अनेक शिष्य ही आज या संगीत क्षेत्रात नावारूपाला आले आहेत. अच्युत ठाकूर यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सुरेश वाडकर, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, देवकी पंडित, आशा खाडिलकर, साधना सरगम, फैय्याज, त्यागराज खाडिलकर, आरती अंकलीकर, वैशाली मांडे, शरद जांभेकर, स्वप्नील बांदोडकर, मिलिंद शिंदे, उर्मिला धनगर अनेक सुप्रसिद्ध गायक-गायिकांनी गायली आहेत.

आजपर्यंत अच्युत ठाकूर यांना सहा राज्य पुरस्कार प्राप्त झाले. तसेच १९९२ साली अ. भा. मराठी नाट्य परिषदेचा उत्कृष्ट संगीतकार म्हणून, तर १९९६ साली मुंबई महापालिकेचा उत्कृष्ट संगीत शिक्षक म्हणून महापौर पुरस्कार व रायगड जिल्हा परिषदेचा ‘रायगड भूषण’ पुरस्कारही त्यांना मिळाला होता. तसेच त्यांना अ. भा. चित्रपट महामंडळातर्फे  ‘चित्रकर्मी’ पुरस्कारही मिळाला होता. अच्युत ठाकूर यांनी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग व भारत सरकारतर्फे आयर्लंड येथे साजरा झालेल्या जागतिक महोत्सवात गायक म्हणून सहभाग घेतला होता, तर मॉरिशस येथे जागतिक सागर महोत्सवात प्रमुख गायक म्हणून भाग घेतला होता. त्यांनी आजवर महाराष्ट्रातील विविध भागांबरोबरच आसाम, नागालँड, उत्तर प्रदेश, दिल्ली, काश्मीर, प. बंगाल इत्यादी भारतातील अनेक राज्यांत सुगम व लोकसंगीताचे कार्यक्रम सादर केले. मराठी लोकगंगा, सूर तेच छेडीता या कार्यक्रमांबरोबरच युवक बिरादरी आणि इंडियन नॅशनल थिएटर या संस्थांमधूनही त्यांनी देशाच्या विविध भागांत कार्यक्रम केले.

जन्म – ७ मे १९५२
मृत्यू – १८ मे २०२१

संजीव वेलणकर
पुणे.

९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..