नवीन लेखन...

क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर

पद्माकर शिवलकर म्हटले की अनेक गोष्टी आठवतात त्याचबरोबर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा उल्लेख हमखास होतो परंतु पद्माकर शिवलकर यांनी सहसा स्वतःबद्दल भाष्य उघडपणे फारसे केले नाही , ते केले तो प्रसंग त्यांच्या क्रिकेट-आत्मचरित्रात आढळला आणि तो प्रसंग होता रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘ मराठी माणसावरचा अन्याय ‘ ह्या विषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित केले होते . त्यावेळी ते जे बोलले ते इतके सत्य होते आणि त्याचा परिणामही तितकाच… त्यावेळचे सभागृह ‘ पिन ड्रॉप ‘ झालेले होते. त्यांनी मनामध्ये खदखदणारी खंत बोलून दाखवली. ती खंत वाचून आपण फक्त निःशब्द होतो. असे एखाद दुसरे प्रसंग सोडले तर हे पुस्तक खऱ्या अर्थाने एक ‘ क्रिकेटपटूंची आनंदयात्राच ‘ आहे.

‘ हा चेंडू दैवगतीचा ‘ ह्या पुस्तकात पॅडी म्हणजे पद्माकर शिवलकर काय आहेत याचे , त्यांचे त्यांच्याच भाषेमधील शब्दाकन इतके प्रामाणिक आणि नितळ , निर्विष आहे हे जाणवते. पुस्तकाला लेखन सहाय्य करणारे आणि संकलन करणारे अरुण धाडीगावकर यांची भूमिका फक्त लेखनिकाची आहे जण पद्माकर शिवलकर त्यांच्या भाषेमधून ते संवाद ‘ लाईव्ह ‘ साधत आहेत हे जाणवते. अर्थात अरुण धाडीगावकर ह्याने लिहिताना स्वतःला पूर्णपणे बाजूला ठेवले आहे सबकुछ ‘ पॅडी ‘ हीच त्यांची भूमिका आहे.

पदमाकर शिवलकर यांनी जे पाहिले दोन चेंडू टाकले त्याचे वर्णन त्यांच्याच शब्दात वाचणे महत्वाचे आहे आणि ते चेंडू टाकले कुणासमोर तर साक्षात विनू मनकड यांच्यासमोर तरीपण त्या चेंडूची गती-प्रगती पहाता काहीच निष्पन्न झाले नसते जर विनूभाई च्या जागी दुसरा असता.तर वेगळेच घडले असते कदाचित पद्माकर शिवलकर आज दिसतेस नसते एक क्रिकेटपटू म्हणून. त्यांना विनूभाईनी जे काही दिले ते का दिले याचा शोध आजही पद्माकर शिवलकर घेताना दिसतात वास्तविक विनूभाई मराठी नव्हते किंवा इतर भाषिकही नव्हते ते फक्त उत्तम जाणकार क्रिकेटपटू होते हे लक्षात ठेवले पाहिजे. विनूभाई काय किंवा विजय मांजरेकर काय किंवा मित्र सुधाकर अधिकारी , दत्तू साटलेकर अशी अनेक मंडळी त्यांना सहाय्य करतच होती ती कशी त्यांना मदत करत होती हे पॅडी यांच्याच शब्दात वाचणे हा एक आनंद आहे. रुईया विरुद्ध दादर क्रिकेटर्सचा सामना हिंदू जिमखान्यावर चालला होता त्यावेळी दादर क्रिकेटर्सचे दोन बलाढ्य क्रिकेटपटू मैदानावर उभे होते माधव मंत्री आणि विजय मांजरेकर त्या दोघांनी पद्माकर शिवलकर यांची गोलंदाजी बघून पदमाकर शिवलकर यांची चौकशी केली आणि पुढला जो इतिहास घडला तो ह्या पुस्तकात दिला आहे.

माधव मंत्री यांनी टेनिस चेंडूने गोलंदाजी न खेळण्याबद्दल ताकीद दिली होती ती त्यांची सूचना पद्माकर शिवलकर यांनी शेवटपर्यंत पाळली. तर शेवटी शेवटी दिलीप सरदेसाई आणि पॅडी यांच्या मधील वादाच्या एका प्रसंगाने पदमाकर शिवलकर यांना काय ‘ बेनिफिट ‘ मिळाले . हे देखील कळणे गरजेचे आहे. हे सर्व वाचताना एकच जाणवते ते म्हणजे आज पर्यंत खरा पॅडी त्याच्या जवळच्या माणसाना कळला होता तो आता प्रत्येक वाचकाला आणि क्रिकेट रसिकाला निश्चित कळेल म्हणून लिहितानाआता मी सर्व प्रसंग देऊ शकत नाही . तरीपण रमाकांत देसाई यांची गोलंदाजी काय होती हेदेखील एका भागात सांगितले आहे. खऱ्या अर्थाने त्यावेळचे सगळेच खेळाडू वेगळ्याच दैवगतीच्या तालावर फिरत होते , आपले कर्तृत्व दखवात होते काहींना देशाची कॅप मिळाली तर काहींना नाही.

पद्माकर शिवलकर यांच्या आयुष्याची सुरवात जडणघडण क्रिकेटनेच केली आहे हे वाचताना जाणवले. अगदी दादर जिमखान्याच्या एंट्रीपासून ते कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत आणि तेथपासून ते ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापर्यंत आणि पुढेही पद्माकर शिवलकर यांना त्यांच्या ‘ दैवगतीच्या चेंडूने ‘ साथ दिली . पण एक क्षणी मात्र त्याच चेंडूने त्यांना हुलकावणी दिली तो चेंडू होता ‘ भारतीय संघाच्या कसोटी कॅप ‘ च्या बाबतीतला . ह्यावरून एकच सागावे लागते एखादा चेंडू फसवा असतो जातो गंडवून , विकेट घेतो .’ त्या चेंडूने पद्माकर शिवलकर यांची विकेट घेतली तरी संपूर्ण क्रिकेटने त्यांना जे काही दिले त्याबद्दल ते नम्रपणे कबुल करतात.

पद्माकर शिवलकर यांच्या आयुष्यात अनेक घटना अनपेक्षितपणे घडत गेल्या ज्या त्यांच्या ध्यानीमनीही नव्हता. उदाहरणार्थ त्यांना दोन वर्षे सी.सी.आय. मध्ये दोन वर्षे प्लेइंग मेंबरशिप मिळाली, अर्थात त्यांना मागून कळले ती त्यांना माधव मंत्री यांच्यामुळे मिळाली. तोपर्यंत ते फक्त सी.सी.आय. म्हणजे ब्रेबॉन स्टेडियम कारण तेथे जगातील मोठमोठे खेळाडू खेळून गेले होते. तेथे त्यांना जावयास मिळाले तेथील ड्रेसिंग रूम चा ते एक भाग झाले. अगदी ग्राउंड्समन पासून सगळ्यानी त्यांच्यावर प्रेम केले त्यांच्याकडून अपेक्षा बाळगल्या कधी त्यांनी त्या पुऱ्या केल्या तर कधी त्या पुऱ्या झाल्या नाहीत म्हणून देखील त्यांना काही कॉमेंट्स ऐकाव्या लागल्या परंतु ते स्वतःच्या बाबतीत अत्यंत परखड होते ते कधी चिडले नाहीत कारण शेवटी ग्राउंड्समन पासून हितचिंतकांपर्यंत सगळ्यांना आपला संघ जिंकावा असावा असे वाटत असे. बेहोशीत वेल बोल्ड म्हणून दाद दिली जाते तर कधी ‘ काय फालतू बॉलिंग केलीस रे तू आज ‘ हे पण ऐकावे लागते. असे प्रसंग वेळोवेळी या पुस्तकामध्ये वाचावयास मिळतात. बापू नाडकर्णीनेहमी म्हणतात अत्यंत क्रूर खेळ आहे कोणत्या घटनेला काय आणि कोण कारणीभूत होईल याचा नेम नाही. हे सर्वानाच माहित आहे गोलंदाजच्या हातून एकदा चेंडू सुटला की एकत्तर तो त्याला समृद्ध करतो किंवा बरबादही करतो. पद्माकर शिवलकर आपल्या आत्मकथनात म्हणतात ‘ …माझ्यावरच एवढा अन्याय झालेला असताना …केवळ एक कसोटी सामना खेळावयास मिळावयाला हवा होता..जसा धीरज परसानाला मिळाला.. त्या सामन्यात चार षटके जरी टाकावयास मिळाली असती तरी माझ्या फिरकीचे काय गारुड आहे , हे क्रिकेटप्रेमींना दिसले असते. माझे हात त्या कसोटीनं आभाळाला टेकल्याचे समाधान तरी मिळाले असते. भारतीय संघाची ‘ कॅप ‘ मला मिळाली नाही , की बहुदा मिळू दिली नाही , ही भळभळणारी जखम , त्याची असह्य वेदना मी एकट्याने भोगली आहे.’

मधू पाटील , प्रभुदेसाई , मोहन साळवी , अजित वाडेकर ,जयवंत जुकर , बाळू गुप्ते , रमाकांत देसाई की, गणा कर्णिक कितीतरी त्यावेळची मोठी नावे त्यांच्या भोवती होती. पद्माकर शिवलकर यांना गाण्याचा छंद होता . मला आठवतंय ते ‘ चढता सुरज ..’ ही कव्वाली जबरदस्त गात असत . ते एका वाद्यवृदात गाणी गात असत.

वयाची ४५ वर्षे ओलांडली असताना पदरी ५८६ विकेट्स असतानाही त्यांना ‘ मुंबई संघाकडून ‘ ‘ रणजी ‘ खेळण्यासाठी पाचारण केले गेले ते दिलीप वेंगसरकर यांच्या मुळे कारण दिलीप वेंगसरकर यांचा त्यांच्या गोलंदाजीवर विश्वास होता आणि त्यावेळी पद्माकर शिवलकर यांची गरज होती. त्याच्याबरोबर खेळणारे अनेक खेळाडू त्यावेळी पॅव्हेलियन मध्ये बसले होते कारण ते निवृत्त झाले होते आणि ‘ पॅडी ‘ मात्र मैदानात उतरले होते त्यावेळीही त्यांनी ३ विकेट्स घेतल्या . त्या कुणाच्या , कशा घेतल्या हे सर्व ह्या पुस्तकात वाचावयास मिळते. तर पुढे त्यांची बेनिफिट मॅच घ्यायची ठरले असतानाच प्रसंग एका भागात आलेला आहे.

‘ हा चेंडू दैवगतीचा ‘ हे शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेले गाणे त्यांनी गायले होते त्याची ध्वनिमुद्रिकाही निघाली होती. परंतु हे गाणे त्यांच्या ‘ आयुष्याचे गाणे ‘ झाले. कारण हा दैवगतीचा खेळ त्यांनी वेळोवेळी अनुभवला आहे.

डिंपल प्रकाशनाने काढलेल्या पुस्तकाला सुबोध गुरुजी यांनी पद्माकर शिवलकर यांचे उत्तम रेखाचित्र काढले आहे. खरे तर हे पुस्तक हे क्रिकेट आत्मचरित्र एकदा वाचावयास घेतले की वाचून पुरे होइपर्यंत समाधान होणार नाही अर्थात हे अत्यंत महत्वाचे आणि संग्राह्य पुस्तक आहे कारण त्या कालखंडातील मुंबईतील क्रिकेट त्यामध्ये दिसते आहे. तसेच दीपक जोशी यांनी त्यात जी आकडेवारी दिली आहे ती माहिती अत्यंत महत्वाची आहे , अभ्यासपूर्ण आहे.

खऱ्या अर्थाने म्हणजे आजच्या टी आर पी च्या भाषेत सांगायचे झाले तर ‘ हा चेंडू दैवगतीचा ‘ हे क्रिकेट आत्मचरित्र एकदम फिट आहे आणि वाचनीय आहे कारण ओघवती खरी भाषा आणि प्रसंग हे तर निश्चित.

त्यांच्या या क्रिकेट आत्मचरित्रामधील शेवटच्या ओळी ‘ दैवगतीचा ‘ प्रभाव दाखवतात. त्या शेवटच्या ओळी आहेत ‘” माझ्या पश्चात माझी ‘ शोकसभाही ‘ आयोजित करू नये. कुणीही कुठेही. मी काही आता रडत जाणार नाही. जन्मल्याबरोबर आपण रडतोच . पण जमले तर हसत जाणार ! दुखवट्याची भाषणं , दुःख व्यक्त करतानाचे त्यांचे खोटे मुखवटे , शो करणारे…हे मला ऐकवणार नाही , पाहवणार नाही. माझ्या आत्म्याला ते सारे क्लेषकारक ठरेल. मला शांततेत , आनंदात जाऊ दे…’ आनंदयात्री ‘ म्हणून राहू दे…इतकीच माझी माफक अपेक्षा आहे. ”

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..