मी आठवीत असताना रमेशने मला, त्याच्या सरांनी वर्गात सांगितलेली ‘मॅकेनाज गोल्ड’ या इंग्रजी चित्रपटाची कथा सांगितली. उ. म. गाडगीळ सरांनी ऑफ तासाला वर्गात ती कथा सांगताना फळ्यावर खडूने त्यातील प्रसंगचित्रं काढून त्या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता रमेशच्या मनात निर्माण केली होती. तशीच चित्रे त्याने मला कागदावर काढून दाखवल्याने तो चित्रपट कधी एकदाचा पहातोय, असं मला झालं..
चार पाच वर्षांनंतर इंग्रजी चित्रपट ‘पहाण्याचं वय’ झाल्यावर, तो दिवस उजाडला. आम्ही दोघांनी राहुल टॉकीजला ‘मॅकेनाज गोल्ड’ पाहिला. कथा थोडीफार माहिती होतीच. ती भव्य पडद्यावर पहाताना, मी त्या कथानकात गुंग होऊन गेलो.
देव आनंद सारखा दिसणारा ग्रेगरी पेक व भारतीय चेहरेपट्टीचा दिसणारा ओमर शरीफ या दोघांचा हा साहसपट माझ्या मनावर ठसला.
या काल्पनिक कथानकातील त्या दोन टोळ्यांचा सोन्याच्या खाणी पर्यंत पोहोचण्याचा प्रवास, श्र्वास रोखून धरणारा आहे. कोलोरॅडो भागातील त्या भव्य डोंगरांच्या रांगांमधील, त्या उंच सुळक्याची सूर्योदयानंतर सावली ज्या ठिकाणी जाऊन काही क्षणांसाठी स्थिर होते, तिथून सोन्याच्या खाणीकडे जाणारा मार्ग असतो..
चित्रपटाच्या शेवटी तो अवघड कडा चढून गेल्यानंतर दोघांमध्ये मारामारी होते, तेवढयात भूकंपाचे धक्के बसून खडकांची पडझड होण्यास सुरुवात होते व घोड्यावर बसून जीव वाचविण्यासाठी सगळेजण तिथून पळ काढतात.. जेव्हा ग्रेगरी पेक व नायिकेचा निरोप घेऊन ओमर शरीफ निघून जातो.. तेव्हा ग्रेगरी पेकच्या घोड्यावरती सोनं भरलेल्या पिशव्या असतात व ओमर शरीफच्या पिशव्यांत असतात फक्त दगडं.. या चित्रपटात ओमर शरीफनं ‘बदमाश’ खलनायक रंगवला होता…
हा चित्रपट मी पाहिलेल्या चित्रपटांमधील नंबर एकचा आहे. त्या चित्रपटातील ग्रेगरी पेक इतकाच ओमर शरीफचाही अभिनय मला आवडला. दहा वर्षांनंतर मी या चित्रपटाची व्हिडिओ सीडी खरेदी केली व जेव्हा कधी वेळ मिळाला, तेव्हा त्याची ‘पारायणं’ केली.
रमेशचा वर्गमित्र, सुनील गोकर्ण याने एकदा गप्पा मारताना, त्यानं पाहिलेल्या ‘डाॅक्टर झिवॅगो’ बद्दल सांगितलं. त्या चित्रपटाची कथा, हिरो, फोटोग्राफी विषयी रंगवून सांगितल्यामुळे मला तो चित्रपट पहाण्याची जबरदस्त इच्छा झाली. १९६५ सालातील तो चित्रपट, तीस वर्षांनंतर टॉकीजला लागण्याची शक्यता सुतराम नव्हती..
तांबडी जोगेश्वरी जवळील एका सीडीच्या दुकानात मला ‘डॉक्टर झिवॅगो’ ची व्हिडिओ सीडी मिळाली. ती खरेदी करुन मी कॉम्प्युटरवर तो चित्रपट पाहिला.
डेव्हिड लीनचे सर्वच चित्रपट सर्वोत्तम आहेत. ‘डॉक्टर झिवॅगो’ हा क्लासिक सदरात मोडणारा अप्रतिम चित्रपट आहे. एका कवी मनाच्या डॉक्टरची पहिल्या महायुद्धानंतरची रशियात घडलेली ही प्रेमकहाणी आहे. तो विवाहित असूनदेखील एका नर्सच्या प्रेमात पडतो. अनेक नाट्यपूर्ण घटनांनंतर चित्रपटाच्या शेवटी गर्दीत नायिका दिसल्यावर तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वाटेतच कोसळतो..
ओमर शरीफच्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी, बर्फातील रेल्वे प्रवास पाहण्यासाठी, डेव्हिड लीनच्या सर्वोत्तम निर्मिती व दिग्दर्शनासाठी हा चित्रपट पुन्हा पुन्हा पहावा असाच आहे…
ओमर शरीफचं मूळ नाव मायकेल युसेफ दिमित्री चलहोब होतं. चित्रपटात पदार्पण केल्यानंतर ते बदललं. त्याने १९५५ पासून २०१५ पर्यंत सुमारे शंभरएक चित्रपटात काम केले. त्यांतील लॉरेन्स ऑफ अरेबिया, डॉक्टर झिवॅगो आणि मॅकेनाज गोल्ड हे तिन्ही चित्रपट जगभरात गाजले. त्याला पाच भाषा अवगत होत्या. ब्रिज व घोड्यांची रेस खेळण्याचा त्याला छंद होता. काळाप्रमाणे त्याने टीव्ही सिरीयल्स मधेही काम केले. सर्वसाधारणपणे सिनेकलाकारांच्या जीवनात येणाऱ्या नेहमीच्या चढ-उतारांनंतर १० जुलै २०१५ साली ओमर शरीफचा कैरोमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला…
आज त्या ‘डॉक्टर झिवॅगो’चा स्मृतिदिन!! त्यानिमित्तानं या हॉलीवुडच्या गुणी कलाकारास विनम्र अभिवादन!!
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१०-७-२१.
Leave a Reply