नवीन लेखन...

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ८ – अंजीर

वड, पिंपळ, उंबर या वनस्पतींच्या मोरेसी कुलातील हा वृक्ष असून याचे शास्त्रीय नाव Ficus carica असे आहे. हा पानझडी वृक्ष मूळचा भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील आहे. हे एक मोठ्या आकाराचे झुडूप असते. हे झाड नैऋत्य आशिया आणि पूर्व भूमध्य विभागात (ग्रीस ते अफगाणिस्तानापर्यंत) आढळते. तुर्कस्तानात आणि भूमध्य सागराच्या आसपासच्या भूखंडामध्ये याचे उत्पत्ति स्थान मानले जाते. भूमध्यसागरीय तटीय वाले देश आणि तेथील हवामानात हे चांगल्या प्रकारे पिकते. निस्संदेह हे आदिकाळातील वृक्षांपैकी एक आहे ग्रीसच्या लोकांनी याला कैरिया (एशिया माइनर चा एक प्रदेश) येथुन प्राप्त केले म्हणून याच्या जाति चे नाव कैरिका पड़ले. रोमवासी या वृक्ष ला भविष्यातील समृद्धि चे चिह्न मानतात. स्पेन, अल्जीरिया, इटली, तुर्की, पुर्तगाल आणि ग्रीस मध्ये याची शेती व्यावसायिक स्तर वर केली जाते.

हे झाड साधारणत: ३ ते १० मी उंच वाढते. याचा देठ करड्या रंगाचा असतो. या झुडपाची पाने १२ ते २५ से.मी. लांब आणि १०-१८ सेंमी रुंद असतात. ती हृदयाकृती, किंचित खंडित व दातेरी असतात. अंजिराचे फळ ३-५ सेंमी. लांब असून प्रत्यक्षात तो फुलांचा गुच्छ आहे..

या कपासारख्या पुष्पविन्यासामध्ये असंख्य एकलिंगी नर, मादी व अलिंगी फुलांची मांडणी असते. तोंडाकडील भागात नरफुले असतात तर खालच्या भागात मादीफुले असतात. तोंडाकडील बारीक छिद्रांमधून वरट (ब्लॅस्टोफॅगा) नावाच्या लहान कीटकाची मादी कपामध्ये प्रवेश करते. मादी कीटक थेट खालच्या भागातील मादीफुलाकडे जाते. तिच्या अंगाला चिकटलेले व दुस-या पुष्पविन्यासातील नरफुलाकडून आणलेले परागकण मादीफुलांवर पडून परपरागण होते. यावेळी कीटकाची मादी काही मादीफुलांमध्ये अंडी घालते. या अंड्यांपासून नवीन पिढी निर्माण होते. यांत काही नर तर बहुसंख्य माद्या असतात. त्यांचे मीलन आतच होते. मीलनानंतर नर मरून जातात. कीटकाच्या फलित माद्या नरफुलातील पराग घेऊन दुस-या मादीफुलाकडे जातात. पुष्पविन्यासाचे रूपांतर संयुक्त, औंदुबर प्रकारच्या फळात होते. मूळचा हिरवा रंग जाऊन तो ‘अंजिरी’ होतो. हेच अंजीर होय.

नाशपातीच्या आकाराच्या या छोट्याशा फळाचा स्वतः चा काही विशेष तेज़ सुगंध नाही पण हे रसदार आणि गरयुक्त असतो. रंगात हे फळ हलक्या पिवळ्या, गडद सोनेरी किंवा गडद जांभळा असु शकतो. छिलक्याच्या रंगाने स्वादावर काही ही प्रभाव पडत नाही पण याचे स्वाद याला कोठे उगवले गेले आणि किती पिकला आहे या वर निर्भर करते. याला आपण पूर्ण छिलक्या, बी आणि गरासह खाऊ शकतो.

अंजिराचे चार प्रकार आहेत. पहिल्या प्रकारात यूरोपातील ‘सामान्य’ प्रकार येतो. यामध्ये (परागणाशिवाय होणारे) बीया नसलेले फळ वर्षातून दोनदा बनते. दुसरा ‘स्मर्ना’ प्रकार अतिशय उत्तम फळ तयार करणारा आहे. तिसरा ‘रानटी’ प्रकार आहे. ‘सान पेद्रो, या चौथ्या प्रकारच्या अंजिराची लागवड कॅलिफोर्नियात केली जाते. याला वर्षांतून दोनदा बहार येतो.

1) पूना अंजीर – या जातीच्या अंजिराच्या फळाचा रंग गडद किरमिजी, लाल रंगाचा असतो. फळाचे सरासरी वजन ३०-६० ग्रॅमपर्यंत असते. फळांमध्ये सुमारे ८०% पर्यंत साखर असते. पाच वर्षांच्या झाडापासून सरासरी २५-३० किलो फळांचे उत्पादन मिळते.

2) दिनकर – ही जात पूना अंजीर या जातीमधून निवड पद्धतीने निवडलेली असून, या जातीची फळे किरमिजी, लाल रंगाची असतात. फळाचे सरासरी वजन ४०-७० ग्रॅमपर्यंत असते.

भारतात कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यात अंजिराची लागवड केली जाते. पिकलेली ताजी अंजीरे रुचकर असतात. सुकविलेली गोड फळे तसेच त्यांचा मुरंबा खाल्ला जातो. पूर्ण पिकून गळून पडलेल्या अंजिरापासून खाण्यासाठी सुकी अंजिरे तयार करतात. सुके अंजीर बरेच दिवस टिकते. ती इराण, अफगाणिस्तान आणि ग्रीसमधून भारतात आयात करण्यात येतात. भारतातही थोड्या प्रमाणावर सुकी अंजिरे बनवितात. सुक्या अंजिरांची प्रतवारी त्यांच्या रंगावरून आणि आकारावरून ठरवितात. काजू, संत्री या फळांच्या बर्फीप्रमाणे अंजिराची बर्फीही बाजारात मिळते.
व्यापारी दृष्टीने अंजीराची लागवड फक्त महाराष्ट्रातच केली जाते. सध्या महाराष्ट्रात एकूण १२००-१५०० हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्यापैकी ५०० हेक्‍टर पेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पुणे जिल्‍हयात आहे. सातारा व पुणे जिल्‍हयाच्‍या शिवेवरील नीरा नदीच्या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर – सासवड तालुका) १०-१२ गावांचा परिसर हाच महाराष्‍ट्रातील अंजीर उत्पादनाचा प्रमुख भाग होय. औरंगाबादजवळील दौलताबाद भाग, नाशिक आणि पूर्व खानदेश जिल्‍हयात या फळझाडाची थोडीफार लागवड होते.

अंजीर हे कमी पाण्यावर येणारे काटक फळझाड आहे. अलिकडे सोलापूर- उस्मानाबाद येथे अंजीराची लागवड शेतकरी करू लागले आहेत त्यावरून अंजीर हे सर्व दुष्काळी भागात उत्तम होईल असे म्हणायला हरकत नाही.

अंजिरामद्धे कैलशियम, व विटामिन ए, बी, सी ने युक्त असते. एका अंजीरा मध्ये सुमारे ३० कॅलरी मूल्य असते. एका सुक्क्या अंजीरा मघ्ये कॅलरी ४९, प्रोटीन ०.५७९ ग्राम, कर्ब १२.४२ ग्राम, फाइबर २.३२ ग्राम, एकूण फैट ०.२२२ ग्राम, सैचुरेटेड फैट ०.०४४५ ग्राम, पॉलीअनसैचुरेटेड फैट ०.१०६, मोनोसैचुरेटेड फैट ०.०४९ ग्राम, सोडियम २ मिग्रा आणि विटामिन ए, बी, सी युक्त असते. यात सुमारे ८३ टक्के साखर असल्याने हे विश्वातील सर्वात गोड फळ आहे.

हवामान

उष्णव कोरडे हवामान अंजीराला चांगले मानवते. त्यामुळे महाराष्ट्रात हे फळ आणखी मोठया क्षेत्रात करायला भरपूर वाव आहे. कमी उष्णतामान या पिकाला घातक ठरत नाही. ओलसर दमट हवामान मात्र निश्चितपणे घातक ठरते. विशेषतः कमी पावसाच्‍या भागात जिथे ऑक्टोबर ते मार्चपर्यंत पाण्याची थोडीफार सोय आहे अशा ठिकाणी अंजिर लागवडीस वाव आहे.

जमीन

अगदी हलक्या माळरानापासून मध्यम काळया व तांबडया जमिनीपर्यंत अंजीर लागवड शक्य आहे. भरपूर चुनखडी असलेल्‍या तांबूस काळया जमिनीत अंजीर उत्तम वाढते. चांगला निचरा असलेली एक मीटर पर्यंत खोल असलेली कसदार जमीन अंजीरासाठी उत्तम होय. मात्र या जमिनीत चुन्याचे प्रमाण असावे. खूप काळया मातीची जमिन या फळझाडाला अयोग्य असते. खोलगट आणि निचरा नसलेल्या जमिनीत हे झाड पाहिजे तसे चांगले वाढत नाही.

सुधारीत जाती

अंजीराच्या अनेक जाती आहेत. त्यात सिमरना, कालिमिरना, कडोटा, काबूल, मार्सेल्‍स, (व्हाईट सान पेट्रो) आदी जाती प्रसिध्‍द आहेत. पुणे भागातील पुना अंजीर नावाने प्रसिध्‍द असलेली जात असून महाराष्ट्रात मुख्यतः हीच जात लावली जाते.
अंजिराची अभिवृद्धी फाटे कलमाने केली जाते. खात्रीच्या बागायतदारांच्या रोगमुक्त बागेतील जोमदार वाढीची झाडे निवडून नंतर त्‍यातून उत्तम व दर्जेदार फळे देणारी झाडे निवडतात.

अंजीराचे औषधी व इतर उपयोग :

अंजीराच्या फळामध्ये आर्दता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, काबरेहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे सकस आहारासोबतच औषधी द्रव्य म्हणूनही अंजीराचा उपयोग केला जातो. अंजीर स्वतंत्रपणे वा इतर अन्नपदार्थाबरोबर खाल्ल्यास त्याची पौष्टीकता वाढते. ते वाळवून सुके अंजीर ड्रायफ्रुट म्हणून आहारामध्ये वापरले जाते.

अंजीर शीत गुणात्मक, मधुर व पचनास जड असते. ते पित्त विकार आणि वात व कफ विकार दूर करते. अंजीर मधुर रसाचे विपाकातही मधुर, शीतवीर्य व सारक असते. ताजे अंजीर हे सुक्या अंजीरापेक्षा जास्त पौष्टीक असते.

अंजीर हा सुकामेव्यातील एक पदार्थ आहे. ओलं फळ किंवा सुकवलेले अंजीर हे दोन्ही आरोग्याला फायदेशीर ठरते. अंजीरामध्ये कॉपर, सल्फर, क्लोरिन घटक मुबलक असतात. सोबतच व्हिटॅमिन ए, बी आणि सी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. ताज्या अंजीरापेक्षा सुक्या अंजीरामध्ये साखर, क्षार घटक मुबलक प्रमाणात असतात. अंजीर पाण्यात भिजवून खाल्याने अनेक आरोग्याच्या समस्या कमी करण्यास मदत होते. नियमित 10 दिवस भिजवलेले अंजीर खाल्ल्याने अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत होते.

अंजीर साधारण बद्धकोष्ठतेवर औषधी म्हणून वापरले जाते. अंजीर या फळातून शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते. अंजीर फळाच्या सेवनाने पोटातील वात कमी होतो.
अंजीर फळातील औषधी गुणामुळे पित्त विकार,रक्तविकार व वात दूर होतात.
अंजीरमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 घटक मुबलक असतात. त्यामुळे हृद्याचे आजार आटोक्यात राहण्यास मदत होते. अंजीरा मध्ये कॅल्शियम व पोटॅशियम घटक मुबलक असल्याने हाडांना मजबुती मिळते घटक व रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. अंजीरमुळे शक्ती, उर्जा वाढते सोबतच एजिंगचा त्रास कमी करण्यास मदत करतात. अंजीरमध्ये फायबर घटक मुबलक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. ताजे आणि सुकवलेले अंजीर दोन्हींमुळे बद्धकोष्ठ्तेचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

औषधी उपयोग :

१.अंजीर पित्त विकार, रक्त विकार, वात व कफ विकार दूर करणारे आहे. ताज्या अंजीरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात, तर सुक्या अंजीरामध्ये अनेक प्रकाराचे उपयोगी क्षार आणि जीवनसत्त्वे असतात.
२. अंजीरात लोह घटक अधिक असतो. यामुळे आमाशय जास्त क्रियाशील बनते; त्यामुळे भूक फार लागते म्हणूनच रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) या आजारामध्ये अंजीर सेवन करावे. अंजीरामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत राहण्यास मदत होते.
३. कच्च्या अंजीराची जीरे, मोहरी, कोिथबीर घालून भाजी करावी. यामुळे शरीरातील ‘अ’ जीवनसत्व व लोह यांचे प्रमाण प्राकृत राहते.
४. पिकलेल्या अंजीराचा मुरंबा करून वर्षभर खावा. हा मुरंबा दाहनाशक, पित्तनाशक आणि रक्तवर्धक असतो.
५. अंजीरामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अंजीराच्या रोजच्या सेवनाने मलावस्तंभ नाहीसा होतो
६. अंजीराच्या नियमित सेवनाने सप्तधातूचे पोषण होऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व त्यामुळेच क्षयरोगासारखे आजार बरे होऊ शकतात.
७ शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी, पिकलेल्या अंजीराचे दोन भागात विभाजन करून त्यामध्ये गूळ भरून ठेवावा. पहाटे ब्रह्म मुहूर्तावर चूळ भरून खावे. असे नियमितपणे सेवन केल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढतेच व उष्णताही कमी होते.
८. नियमितपणे अंजीर खाल्ल्याने आजारपणात शरीराची झालेली हानी लवकर भरून येते. अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो. मुखपाक या आजारात ओठ, जीभ, तोंड यांना कात्रे पडतात व फोड येतात. अशा वेळी अंजीर खाल्ल्यास या जखमा लवकर भरून येतात. तसेच कच्च्या अंजीराचा चीक या जखमांना लावावा.
९. मूळव्याधीवर अंजीर हे औषधाप्रमाणे कार्य करते. थंड पाण्यामध्ये दोन ते तीन अंजीर रात्री भिजत घालून सकाळी तेच अंजीर खावे. त्यामुळे शौचास साफ होऊन गुद्द्वाराची आग होत नाही. हा प्रयोग सलग महिनाभर केल्यास मूळव्याध हा आजार आटोक्यात आणता येतो.
१० अशक्तपणा खूप जाणवत असेल तर अंजीर, खजूर, बदाम व लोणी एकत्र करून खावे. १५ दिवसातच अशक्तपणा कमी होऊन शरीरास शक्ती प्राप्त होते. अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते. श्वेतकुष्ठामध्ये (पांढरे डाग) अंजीराचा नियमितपणाने आहार सेवन केल्यास फायदा होतो.
११. पायांना जळवातांच्या भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास लवकर भरून येतात.
१२. दम्यावरही अंजीर गुणकारी आहे. अंजीर आणि लालसर पांढरी गोरख चिंच समप्रमाणात घेऊन रोज सकाळी दहा ग्राम खावी. त्यामुळे श्वसन क्रिया सुलभ होत दम्याचा त्रास कमी होतो.
१३. अंजीराचा उपयोग गळवांवर देखील करता येतो. अंजीर चटणीसारखे बारीक वाटून गरम करून त्यांचे पोटीस बनवावे. ते पोटीस शरीरावर आलेल्या गाठीवर किंवा गळवावर बांधावे. दर दोन तासांच्या अंतराने नवे पोटीस करून बांधल्यास वेदना कमी होतात आणि ती अपरिपक्व गाठ परिपक्व होते किंवा गळवा गळू लागते.
१४. अंजिराच्या गरापासून जॅम, मिल्कशेक व आईस्क्री , सरबत बनवता येते. हा एक सध्या गृहउद्दोग बनला आहे. त्यापासून चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळते.

सावधानता

बहुगुणी अंजीर जसे उपयुक्त आहे, तसेच ते पचनालाही जड आहे. म्हणूनच अंजीर अतिप्रमाणात खाल्ल्यास अपचन होऊन अनेक आजार उद्भवू शकतात. म्हणून पचनशक्तीचा अंदाज घेऊन योग्य प्रमाणातच अंजीर खावेत. तसेच कृत्रिमरीत्या रासायनिक पूड वापरून पिकविलेले अंजीर अजिबात खाऊ नयेत.

टाईप १ च्या मधुमेहींनी अंजीराच्या पानाचा चहा पिल्यास त्यांची इन्सुलिन ची मात्र कमी होते असे प्राथमिक संशोधनात आढळून आले आहे. त्यावर अधिक संशोधनाची गरज आहे.

— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 78 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

4 Comments on महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ८ – अंजीर

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..