नवीन लेखन...

माझी प्रवास’साठी’

जन्म कुंडलीतील नववं घर, हे त्या माणसाच्या आयुष्यातील प्रवास सांगतं. तिथं जर शुभ ग्रह असेल तर प्रवासाचं सुख हमखास मिळतं. त्यातूनही तिथे शुक्र असेल तर परदेशप्रवास हा नक्कीच होतो. माझ्या त्या घरात शुक्रच काय, कोणताही ग्रह नाहीये, त्यामुळे माझा प्रवास हा आजपर्यंत मर्यादितच राहिला..

माझा प्राथमिक शाळेतील किशोर नावाचा बालमित्र, त्याला प्रवासाची फारशी आवड नसताना, नोकरीच्या निमित्ताने सतत परदेश प्रवास करावा लागला. कधीही मला भेटल्यावर, तो नुकताच परदेश वारी करुन आलेला असतो…

माझा जन्म जरी सातारामधील एका खेड्यात झालेला असला तरी एक वर्षानंतर, मी पुण्याचाच झालो. त्यानंतर दिवाळी सुट्टी व उन्हाळी सुट्टीत गावी जाणे, हे दरवर्षी ठरलेले असायचे.

लहानपणी पुण्याहून जाताना स्वारगेटवरुन एसटीतूनच जात असू. आम्ही तिघे भाऊ व आई-वडील असा पाच जणांचा प्रवास सुरु होत असे. त्यावेळी स्वारगेट सोडल्यानंतर जादा लोकवस्ती नसल्यामुळे पद्मावती, कात्रज आल्यावर पुणे खूप मागे राहिल्यासारखं वाटायचं. पुढे कात्रजच्या बोगद्यातून जाताना त्या अंधारात, बालमन आनंदून जायचं. शिरवळला गाडी थांबायची. उसाच्या गुऱ्हाळाच्या घुंगरांचा आवाज एका लयीत ऐकू यायचा. अंजीरवाले, काळी मैनावाले गाडीतून फिरायचे. मग खंबाटकी घाट सुरु होत असे. उलटीचा त्रास होऊ नये म्हणून वडिलांनी दिलेली गोळी मी घेतलेली असायची. त्या घाटातून जाताना एका बाजूने फोडलेला उंच डोंगर आता, अंगावर पडेल की काय अशी भीती वाटत असे. गाडीच्या प्रत्येक वळणाला मी सीटला घट्ट धरुन बसे. या खंबाटकी घाटाच्या माथ्याला पोहचल्यावर रस्त्याच्या कडेला डोंगरातील पाण्याच्या टाकीला लागून असलेलं एक छोटं देवीचं मंदिर दिसतं. तिथं वडिलांनी मला दिलेलं एक रुपयाचं नाणं मी खिडकीतून त्या मंदिराच्या दिशेने भिरकावत असे. गाडीच्या वेगामुळे ते मागेपुढे पडल्यावर तेथील दाढीवाला साधू ते उचलून घेत असे. घाट उतरल्यावर गाडी वेगाने साताऱ्याकडे पळू लागे. भुईंज, पाचवड गेल्यावर डोंगराच्या रांगा दिसू लागत. सातारा स्टॅण्डला गाडी थोडा वेळ थांबून पुढे निघे. थोड्या वेळाने नागठाणे आल्यावर आम्ही उतरत असू.

नागठाण्यातील रोडलाच काटे यांचं एक झोपडीवजा हॉटेल होतं. ते वडिलांच्या ओळखीचे. तिथं आम्ही बरोबर आणलेली पोळीभाजी खाऊन घेत असू. गावी त्या दिवशी येणार असल्याचं, पत्र पाठवून कळविलेलं असल्यामुळे आमच्या आजोबांनी पाठविलेली बैलगाडी चारच्या सुमारास येत असे. मग आम्ही सगळे त्या बैलगाडीतून तासाभराने सोनापूरला पोहोचत असू.

सुट्टी संपल्यावर निघताना पुण्याला जाऊच नये असं मनापासून वाटायचं. जेवण करुन निघायला दोन वाजायचे. आजी-आजोबांच्या आशीर्वाद घेऊन पुन्हा बैलगाडीतून निघायचो. हात हलवून निरोप देणारे आजी आजोबा लहान लहान दिसू लागायचे. गाडीने वळण घेतल्यावर ते दिसेनासे व्हायचे.

तासाभराने नागठाण्यात आल्यावर एक दाढीवाला माणूस गाडी मिळवून द्यायला मदत करायचा. एसटी नाहीच मिळाली तर संध्याकाळ होऊ लागल्यावर एखाद्या ट्रकमध्ये बसून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु होत असे. हे ट्रकवाले एखाद्या ढाब्यावर तासभर जेवणासाठी थांबून पुन्हा पुढे निघत. खंबाटकी, शिरवळ, खेड शिवापूर गेल्यावर कात्रजचा बोगद्यातून बाहेर पडताना असंख्य लाईट्सनी चमचमणारे पुणे दिसू लागायचे. हा ट्रक शहरात न येता स्वारगेटच्या अलीकडे भापकर पंपावर आम्हाला उतरवायचा. तिथून टांगा करुन आम्ही सदाशिव पेठेत पोहोचायचो.

असाच सातारा-पुणे प्रवास माझ्या पाचवी इयत्तेपर्यंत चालू होता. त्यांनंतर मी एकट्याने तर कधी घरच्यांसोबत सातारला जाणे येणे करीत होतो. दहावी नंतर सुट्टीत जाण्याला खंड पडू लागला. कधी कुणाच्या लग्नाला किंवा यात्रेला जात होतो. गावी आता बैलगाडी राहिली नव्हती. गावातच एसटी येऊ लागल्याने सुविधा झालेली होती.

गांवी असलेले आजोबा, वयोवृद्ध काका अशी एकेक जवळची माणसं कमी होऊ लागली. जुनी पिढी काळाच्या पडद्याआड गेल्यानंतर गावी जाणं कमी होऊ लागलं. व्यवसायात पडल्यावर आणि लग्न झाल्यावर, आई-वडील गांवी राहू लागले. अधूनमधून त्यांची चक्कर असायची. गावची यात्रा मात्र कधी चुकवली नाही. सगळे नातेवाईक भेटण्याची, ती वर्षातील एक संधी असते. आई-वडील थकल्यावर त्यांच्या औषधपाण्यासाठी सातारला फेऱ्या व्हायच्या. वर्ष निघून जात होती. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढल्याने गावी जास्त दिवस रहायला जमत नसे. प्रसंगी एका दिवसातच जाऊन यावे लागे.

दरम्यान बरीच वर्षे गेली. आधी आई आणि दोन वर्षांनंतर वडील गेले. आता गाव फारच दूरवर गेल्यासारखं वाटू लागलं. कोरोना महामारी मुळे गेले दोन वर्ष गावाचं तोंड पाहून शकलो नाही.

लॉकडाऊनच्या काळात गावातील अनेकजण कोरोनाला बळी पडले. या साठ वर्षात शेकडो वेळा पुणे-सातारा प्रवास मी कधी एसटीने, कर्नाटक गाडीने, चितळे दूधाच्या गाडीतून, टू व्हिलरवरुन केलेला आहे. अलीकडे मी, दोन वर्ष सातारला गेलोच नाही..

पंधरा दिवसांपूर्वी मला अचानक सातारला जावं लागलं. घरातून निघाल्यापासून माझ्या मनात आतापर्यंत अनेकदा केलेला प्रवास आठवत होता.. कोरोनाचे सावट असल्याने रस्ता मोकळाच होता. कात्रज बोगद्यातून खाली उतरल्यावर रस्त्यावर रहदारी अशी नव्हतीच. एरवी गजबजलेली हॉटेलं बंद होती. काही ठिकाणी फक्त पार्सल सुविधा होती. पावसाळी वातावरणामुळे सर्वत्र हिरवीगर्द वनश्री नटलेली होती. कुठेही न थांबता, वेळेआधी सातारा गाठले. काम झाल्यावर परतीच्या प्रवासात सर्व हॉटेलं बंद असल्याने त्यांची निऑन्सची भली मोठी नावं पोरकी वाटत होती. इतक्या वर्षांनंतरचा हा प्रवास मला ओकाबोका वाटला. त्यामध्ये प्रवासाचा पूर्वीचा आनंद नव्हता..

अशी ही माझ्या पुणे-सातारा प्रवासाची ‘साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’…

© सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२-७-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..