मोत्यांसारखं लिहिलेलं अक्षर कुणाला आवडत नाही? ते सर्वांनाच मनापासून आवडतं. ते पाहून आपणही असंच सुवाच्य लिहावं, अशी पहाणाऱ्याची मनोमनी इच्छा होते..
असंच अगदी सुरेख, वळणदार अक्षरलेखन करणारा माझा एक जिवलग मित्र आहे, त्याचं नाव.. कुमार गोखले!! कुमारची पहिली भेट झाली ती वेलणकर स्टुडिओमुळे. माझा भाऊ रमेश, लक्ष्मी रोडवरील वेलणकर स्टुडिओत आर्टीस्ट म्हणून काम करायचा. त्यावेळी वेलणकरांच्या जाहिरातींमधील सुलेखन, कुमार करीत असे.
माझं बीकॉम पूर्ण झाल्यावर मी आणि रमेश छोटी मोठी डिझाईनची कामं घरातूनच करीत होतो. माझ्या कॉलेजमधील सरांनी व्हाईट माऊंट बोर्डवर काही पोस्टर हस्ताक्षरात करण्याचे काम मला दिले होते. ते काम मी कुमारकडून करुन घेतले. त्यावेळी कुमार बालगंधर्व पुलाच्या पलीकडे, एका बिल्डींगच्या तळमजल्यावरील एका रुममध्ये रहात असे..
काही वर्षांनंतर आम्ही ‘गुणगौरव’ मध्ये काम करु लागलो. नाटकांच्या जाहिराती करताना तात्या ऐतवडेकरांच्या ‘ग्राफिना’त तर कधी एल. के. पाटीलच्या ‘एलकेज डार्करुम’ मध्ये कुमारची व माझी हमखास भेट होत असे.
नाट्य निर्माते अण्णा कोठावळे यांच्या नाटकांची डिझाईन्स आम्ही दोघेही करायचो. एकदा ऑफिसमध्ये कुमार बसलेला असताना अण्णा आले. कुमारला पाहून ते गडबडले. त्यांना नवीन काम द्यायचं होतं, त्यासंबंधी कसं बोलावं हे त्यांना सुचेना.. शेवटी कुमारनेच अण्णांना सांगितलं, ‘आम्ही एकाच क्षेत्रातील असलो तरी एकमेकांचे स्पर्धक नसून चांगले मित्र आहोत.’ मग अण्णांच्या मनावरचे दडपण नाहीसे झाले..
कुमार मूळचा मिरजेचा. त्याच्या वडिलांच्या सुंदर अक्षरलेखनाचं बाळकडू त्याला लहानपणापासूनच मिळालं. मोठा झाल्यावर मिरजेचे शरद आपटे व मुंबईचे कमल शेडगे यांना गुरूस्थानी मानून, त्याने एकलव्याप्रमाणे अक्षरसाधना केली.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यात राजा बहादुर मिल व त्यानंतर दाई इची कंपनीत नोकरी करता करता त्यानं सुलेखनाची कामं केली. पुण्यातील जयंत ताडफळे, चंद्रमोहन कुलकर्णी, अनिल उपळेकर, विनय राजोपाध्ये, इ. चित्रकारांच्या सुलेखनाचा कुमारने अभ्यास केला.
‘दै. सकाळ’च्या विविध सदरांचे सुलेखन त्याने सहा सात वर्षे केलं. अक्षरलेखनाबरोबरच कुमारला फोटोग्राफीचीही आवड होतीच. राम अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने त्या कलेत प्राविण्य मिळवलं. नाटकांची डिझाईन करताना त्याने कलाकारांचे विशेष लाईटिंग करुन फोटो काढले व उत्कृष्ट जाहिराती केल्या. पेपरमधील या जाहिराती पाहून मुंबईतील चंद्रलेखा, सुयोग, नाट्यसंपदा, श्रीचिंतामणी, भद्रकाली, अश्वमी थिएटर्स अशा मोठ्या बॅनरची कामे त्याला मिळू लागली. ही कामं करताना त्याने कामामध्ये कधीही तडजोड केली नाही, त्यामुळे त्या कामाचे मानधनही मनासारखे घेण्यासाठी तो नेहमीच आग्रही राहिला. त्यामुळेच काम पूर्ण झाल्यानंतर बिल घेण्यासाठी रंगमंदिरावर त्याने टाकलेली चक्कर कधीही वाया गेली नाही.
कुमारने मराठी चित्रपटांसाठी स्थिरचित्रणाचे देखील काम केलेले आहे. सई परांजपे दिग्दर्शित ‘दिशा’ चित्रपटासाठी फोटोंचे काम करीत असताना सुप्रसिद्ध सिने छायाचित्रकार मधु आंबट यांच्याशी त्याचा संपर्क आला.
महेश मांजरेकरच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटाच्या लोगोचे काम त्याने केले. त्यानंतरच्या ‘लालबाग परळ’ चित्रपटासाठी केलेल्या डिझाईनच्या कामाबद्दल कुमारला महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. ‘व्हेंटिलेटर’ व इतर अनेक मराठी चित्रपटांच्या उत्कृष्ट लोगोचे काम त्याने केलेले आहे.
कुमारला मराठी साहित्याची विशेष आवड आहे. आवडते लेखक जी. ए. कुलकर्णी यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी मित्र, कैलास भिंगारेशी त्याने संपर्क ठेवला. मात्र अनेकदा प्रयत्न करुनही ती भेट झाली नाही.. आणि झाली तेव्हा जी. ए. अनंतात विलीन झाले होते…
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम रानडे सर हे मिरजेचेच. त्यांच्याशी कुमारचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यांच्या आत्मचरित्राच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ कुमारनेच केले आहे. त्यावरील सरांचा उभा फोटो त्यानेच काढलेला आहे. अभिनेता मोहन जोशीच्या ‘नट-खट’ पुस्तकाचेही मुखपृष्ठ त्याने सुंदर केलेले आहे. चंद्रकांत व विक्रम गोखले या पितापुत्रांशी त्याचं अनोखं नातं आहे..
मी ‘तू तिथं मी’ चित्रपटाचं काम करीत असताना अचानक माझा कॅमेरा बिघडला, कुमारशी संपर्क केल्यावर त्याने लागलीच त्याच्याकडील कॅमेरा देऊन मला त्या संकटातून वाचवले.
आम्ही एकत्र भेटल्यावर खूप गप्पा होतात. कुमारकडून कॉम्प्युटरमधील नवीन तंत्रज्ञान कळतं. त्याच्या ऑफिसवर गेल्यावर त्याने केलेल्या स्पेशल कॉफीचा आस्वाद घेता येतो. त्याच्यासोबत एकदा कमल शेडगे सरांना भेटायला मुंबईला जायचं होतं, परंतु सर अचानक गेले आणि ती इच्छा अपुरीच राहिली.
प्रत्येक कलाकाराची आयुष्यात एकदा तरी ‘जगाची सफर’ करण्याची सुप्त इच्छा असते. कुमारचीही तशी इच्छा होती. त्याने मित्रांसमवेत ती पूर्ण केली. त्या सर्व जगप्रसिद्ध ठिकाणी जाऊन त्याने ते क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपले.
गेल्या वर्षी एका आजारपणाने त्याला ग्रासले. अतूट इच्छाशक्तीच्या बळावर त्याने त्या आजारावर मात केली व तो पुन्हा पूर्वपदावर आला. आता त्याने कामाचा व्याप कमी केलेला आहे. पूर्वी आमच्या भेटीगाठी नेहमी होत असत. दोन वर्षांपूर्वी आम्ही दोघे व ज्येष्ठ कलादिग्दर्शक सुबोध गुरूजी आणि सुलेखनकार कुमार, आमची छान मैफल जमली होती. या कोरोनाने माणसांना मित्रांपासून दूर केले आहे… काही महिन्यांनी हा कोरोना गेल्यावर आमची मैफल नक्कीच पुन्हा जमेल..
आज कुमारचा प्रकटदिन! त्यानिमित्ताने मित्रवर्य कुमारला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
८-७-२१.
Leave a Reply