सौ . राजलक्ष्मी
स. न. वि .वि.
आपले पत्र पावले. मजकुरास उशीर होत आहे, क्षमस्व.
सध्या मी “भावसरगम “या कार्यक्रमात फार अडकलो आहे. त्यामुळे ध्वनिमुद्रणास वेळ मिळत नाही. मला जरा वेळ मिळाला की मी या गाण्यांसंबंधी आपल्याशी सविस्तर चर्चा करीन.
गैरसमज नसावा. पत्ररूपाने भेटत राहावे म्हणजे आपल्या गीतांचा विसर पडणार नाही.
धन्यवाद.
हृदयनाथ
______________________________________________________________________
“भावगंधर्वांच्या” वरील पत्राला कारण म्हणजे एकदा आम्हीं माझ्या पत्नीच्या काही कविता त्यांच्या अवलोकनार्थ पाठविल्या होत्या. त्यांना हृदयनाथांनी चाली लावाव्यात आणि ध्वनिमुद्रण करून ती गीते रसिकांना उपलब्ध करून द्यावीत अशी संकल्पना होती.
खूप दिवस त्यांचे उत्तर आले नाही म्हणून आम्ही (चक्क मंगेशकरांना) स्मरणपत्र पाठविण्याचा अगोचरपणा केला.
त्याला हृदयनाथांचे आलेले आत्मीय उत्तर म्हणजे वरील पत्र ! त्यांची अजिजीची भाषा, “क्षमस्व “वगैरे लिहिणे त्यांच्या उंचीनुसार असले तरी अप्रत्यक्षरीत्या आमच्या खुजेपणाकडेही बोट दाखविणारे होते. परत त्यांना पत्र लिहिण्याचे धाडस झाले नाही. पत्रावरील पोस्टाचा शिक्का आहे – १५/३/९३
अभिजातपणाचा नमुना म्हणून हे पत्र आम्ही जपून ठेवले आहे.
काल पुण्यात अस्मिता दिक्षितांच्या “परतीचा पाऊस “या कवितासंग्रहाचे प्रकाशन त्यांच्याहस्ते मसाप मध्ये झाले. कार्यक्रमानंतर (खरा) पाउस ओसरण्याची वाट आम्ही बघत असताना प्रसिद्ध लेखक अरुण खोरे पंडितजींजवळ आले आणि म्हणाले – ” मी मध्यंतरी आदिनाथला विनंती केली होती -आपले चरित्र लिहिले गेले पाहीजे “. त्यांवर त्यांनी फक्त मंद स्मित केलं.
आणखी एकजण त्यांच्याकडे विचारणा करत म्हणाले – ” आपण आणि सुरेश वाडकर ज्ञानेश्वरांवर काही काम करणार होता असे मध्यंतरी वाचले होते.”
अचानक बोलता बोलता त्यांची माझ्याकडे नजर गेली.
हळुवार आवाजात पंडितजी म्हणाले – “असं बरंच राहिलंय .”
मी मनातल्या मनात म्हणालो – ” पंडितजी, माझ्या पत्नीच्या कवितांची तुमच्या स्वरात गीते व्हायचंही राहिलंय.”
प्रत्यक्षात “त्या घर थकलेल्या संन्याशी” वैरागी व्यक्तीला मी अबोलपणे मनातल्या मनात हात जोडले आणि स्मरणपत्राच्या धार्ष्ट्याची माफी मागितली.
दहा मिनिटे त्यांच्याशेजारी बसायचे भाग्य पावसामुळे लाभले.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply