अनादि काळापासून मनुष्य प्राणी आपल्या अडचणीच्या काळात कोणाचा न कोणाचा आधार शोधत आला आहे. त्यातूनच देव या संकल्पनेचा उदय झाला. चांगल्या जीवनासाठी चांगले आचार विचार व बुद्धी आणि ज्ञानही आवश्यक असतात. या सर्वांसाठी व दीर्घायुष्यासाठी विविध देवतांची प्रार्थना व उपासना या मानवी जीवनाचा अविभाज्य भाग होऊन गेल्या आहेत. काळानुसार देवतांमध्ये फरक पडला एवढाच काय तो बदल. मानवी जीवनात तसेच अखिल विश्वात शांती आणि समृद्धी नांदावी म्हणून ऋग्वेदात ठायी ठायी देवतांकडून कृपाप्रसादाची याचना केलेली आढळते. काही सूक्ते संपूर्ण, तर काही सूक्तांमधील निवडक ऋचा शांतिपाठ या स्वरूपात म्हणण्याचा प्रघात आहे. प्रस्तुत `आ नो भद्राः ’ हे त्यापैकी एक आहे.
वेद काळातील काही देवतांची प्रार्थना या सूक्तामध्ये आली आहे. त्यांचा अर्थ लावताना मात्र काही अभ्यासकांनी कालमानानुसार वैदिक संकल्पनांमध्ये बदल करून धार्मिक कृत्ये/यज्ञ याऐवजी ज्ञान,बुद्धी तसेच देवतांऐवजी विद्वज्जनांचे मार्गदर्शन यांची कामना केली आहे.
ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील एकोणनव्वदावे हे सूक्त शांतिपाठ म्हणून ओळखले जाते. यातील ‘ भद्रं कर्णेभिः ’ व ‘ स्वस्ति न इन्द्रो ’ या दोन ऋचा विशेषत्वाने सर्वसामान्यांना परिचित आहेत. या सूक्ताचे रचयिता गौतम राहूगण ऋषी असून देवता विश्वेदेव आहे. परंतु पूषन व मरुत गण यांनाही आवाहन केलेले असून दहाव्या ऋचेत अदिती देवता सर्वव्यापी असल्याचे म्हटले आहे. हे सूक्त जगती, विराटस्थाना व त्रिष्टुभ अशा तीन छंदात रचलेले आहे. ऋचांमधील अक्षरांची संख्याही वेगवेगळी दिसते. ऋग्वेदाखेरीज इतरही धर्मग्रंथांमध्ये हे सूक्त समाविष्ट आहे.
विश्वदेवता – ऋग्वेदकाळी विश्वेदेव हे प्रमुख देव होते आणि अनेक वरदानांसाठी त्यांची पूजा केली जात असे. ते आता दैनंदिन प्रार्थनेत थेट दिसत नाहीत. विश्वेदेव हा देवतांचा एक समूह आहे ज्यात अग्नी, वरुण, वायु, सूर्य, मित्र, भग, बृहस्पती इत्यादींचा समावेश आहे. ते निसर्गाचे वरदान आहेत. त्यांना यज्ञांमध्ये सोम अर्पण केले जात असे. ऋग्वेदात ७५ पेक्षा अधिक सूक्तांमध्ये विश्वेदेवांचा उल्लेख येतो. मानवाचे संरक्षण करून आणि आधार देऊन त्यांना विपुल धन देणारे हे देव विश्वातील बौद्धिक आणि आध्यात्मिक पैलूंचे प्रतिनिधित्व करतात.
आ नो भद्राः क्रतवो यन्तु विश्वतोऽदब्धासो अपरीतास उद्भिदः ।
देवा नो यथा सदमिद् वृधे असन्नप्रायुवो रक्षितारो दिवेदिवे ॥ १.०८९.०१
मराठी- उदात्त, कल्याणकारी, न दबणारी, वाया न जाणारी (कालबाह्य न झालेली), दृग्गोचर शुभकर्मे (विचार) सर्व दिशांनी आमच्याकडे येवोत. प्रगतीपथावर नेणारे, प्रतिदिनी रक्षण करणारे देव आमची उन्नती करोत.
येवोत क्षेमकारी पुण्यकर्मे विश्वातुनी विनायासे अम्हाप्रती ।
(विश्वातुन विमुक्त विजयी वाहो विद्या पुण्यकारक अम्हाप्रती ।)
विनायासे जैं, देव नितदिन रक्षक अम्हा नेवोत प्रगतीपथी ॥ ०१
टीप- विविध अभ्यासकांनी क्रतु या शब्दाचे अनेक अर्थ स्वीकारलेले दिसतात. त्यानुसार विश्वातून आम्हाकडे कल्याणकारी यज्ञकर्मे,पवित्र कृत्ये,विचार,विद्या,बुद्धी प्रवाहित होवो असे अर्थ होऊ शकतात.
देवानां भद्रा सुमतिर्ऋजूयतां देवानां रातिरभि नो नि वर्तताम् ।
दे॒वाना सख्यमुप सेदिमा वयं देवा न आयुः प्रतिरन्तु जीवसे ॥ १.०८९.०२
मराठी- देवांची कल्याणकारी सद्बुद्धी आमच्याबाबत सौहार्दपूर्ण राहो. देवांची आमच्यावर कृपा राहो. देवांशी आमचा अनुबंध जुळावा, आम्हाला दीर्घायुष्याचा लाभ व्हावा म्हणून देवांनी आमचे जीवन संवर्धित करावे.
देवांची लाभो क्षेमकारी सुबुद्धी, लाभो औदार्य कृपा अम्हां त्यांची ।
दीर्घायु द्यावे चिरजीवनासी, आम्हा मिळावी मैत्री तयांची ॥ ०२
तान्पूर्वया निविदा हूमहे वयं भगं मित्रमदितिं दक्षमस्रिधम् ।
अर्यमणं वरुणं सोममश्विना सरस्वती नः सुभगा मयस्करत ॥ १.०८९.०३
मराठी- पूर्वापार मंत्रांनी आम्ही भग,मित्र (सूर्य),अदिती, यशस्वी दक्ष,अर्यमन (सूर्य), वरुण,सोम,अश्विनीकुमार यांना आवाहन करतो. भाग्यदायक सरस्वती आम्हाला सुखदायी ठरो.
प्राचीन मंत्रें अम्ही बोलवीतो अजिंक्य दक्षा, अर्यमणा, अदीती ।
भगा, चंद्रसूर्या, वरुणा, कुमारा, सोमा, अम्हा तोष देवो सरस्वती ॥ ०३ (कुमार- अश्विनीकुमार)
टीप- म.म. चित्राव यांच्या मते निविद मंत्र म्हणजे ‘देवांचे गुणवैशिष्ट्य सांगणार्या आणि त्यांची स्तुती करणार्या शब्दपंक्ती असून ते वेदपूर्वकाली विशेष प्रचारात होते.
भग ही बारा आदित्य देवता पैकी एक आहे. या शब्दाचा सामान्य अर्थ देणारा, स्वामी वा संरक्षक असा आहे. ऋग्वेदात ही देवता दाता, पाठीराखा या अर्थाने वर्णिली आहे. ही समृद्धी आणि ऐश्वर्य यांची देवता आहे. याचा उल्लेख अग्नि, इंद्र, मित्र-वरुण, अश्विनीकुमार, पूषन्, बृहस्पति, सोम तसेच रुद्र यांच्याबरोबर आमंत्रित करूनही केला जातो. उषा ही भगाची भगिनी आहे. यास्काचार्यांच्या मतानुसार भग हे सकाळच्या (उगवत्या) सूर्याचे एक रूप आहे. ऋग्वेदात वसिष्ठ मैत्रावरुणि ऋषींनी रचलेल्या ‘प्रातःस्मरण सूक्ता’त भगदेवतेची स्तुती केलेली आहे.
अश्विनी कुमार- इंद्र,अग्नी,सोम यांच्या खालोखाल महत्त्वाची देवता. सूर्य आणि उषा यांची ही दोन जुळी मुले. थोरला नासत्य आणि धाकटा दस्र. ते सदैव तरुण, देखणे, सोनेरी लकाकी असणारे, तेजस्वी, चपळ, ससाण्याप्रमाणे वेगवान आहेत. ते घोडेस्वार आहेत. तसेच ते घोड्यांनी किंवा पक्ष्यांनी ओढलेल्या सुवर्ण रथात स्वार होऊन, त्यांच्या आईचे(उषेचे – सकाळच्या आकाशातील प्रकाशाचे) अग्रदूत म्हणून पहाटेच्या आधी घाई करतात आणि तिच्यासाठी मार्ग तयार करतात.
ते देवांचे कुशल वैद्य आहेत आणि आयुर्वेदिक औषधाचे देव आहेत. त्यांच्या कौशल्याच्या अनेक कथा विविध सूक्तात वर्णिलेल्या आहेत आणि ते मुख्यत्वे तारुण्य आणि सौंदर्य, प्रकाश आणि वेग, उपचारात्मक शक्ती आणि सक्रिय परोपकाराशी संबंधित आहेत. विपत्तीतून प्राण्यांचा उद्धार तसेच रोगपरिहार हे त्यांचे मुख्य कार्य. त्यांना संबोधित केलेल्या स्तोत्रांच्या संख्येवरून (सुमारे ५०) त्यांना वैदिक काळी असलेल्या महत्त्वपूर्ण स्थानाची कल्पना येते.
तन्नोवातो मयोभुवातुभेषजं तन्माता पृथिवी तत्पिता द्यौः ।
तद् ग्रावाणः सोमसुतो मयोभुवस्तदश्विना शृणुतं धिष्ण्या युवम् ॥ १.०८९.०४
मराठी- पवन आमच्यासाठी सुखकर (गुणकारी) औषधे वाहून आणो. भूमाता आणि स्वर्गरूप पिता तसेच सोमरस काढणारे ग्रावन् (दगड) ती औषधे आम्हास देवोत. हे बुद्धिमान अश्विनीकुमारांनो तुम्ही आमचे हे म्हणणे ऐका.
आणो वाहून वायु, बाप माय स्वर्ग धात्री, मज औषध गुणी ।
देवोत ग्रावाणहि इंदुपुत्र, सुज्ञ अश्विनी कुमरा ही मागणी ॥ ०४
टीप- ग्रावन हा शब्द वनस्पतींपासून सोमरस काढण्यासाठी वापरले जाणारे साधन (म्हणजे दगडी बत्ता) या अर्थी वापरला जातो. वैदिक साहित्यात अनेक ठिकाणी ग्रावन या साधनाचा उल्लेख येतो. ऋग्वेदात ऐरावत जरत्कारु ऋषींनी रचलेले ‘सोमाभिषव ग्रावनसूक्त’ (१०.७६), ऋषी अर्बुद काद्रवेय सर्प यानी रचलेले ‘सोमाभिषव ग्रावनसूक्त’ (१०.९४) व ऊर्ध्वग्रावन अर्बुदि सर्प ऋषींनी रचलेले उर्ध्वग्रावन सूक्त (१०.१७५) अशी तीन ग्रावन वर्णन व स्तुतीपर सूक्ते आहेत.
तमीशानं जगतस्तस्थुषस्पतिं धियंजिन्वमवसे हूमहे वयम् ।
पूषा नो यथा वेदसामसद्वृ॒धे रक्षिता पायुरदब्धः स्वस्तये ॥ १.०८९.०५
मराठी- जगतातील सर्व स्थावर आणि जंगम गोष्टींचा स्वामी असलेल्या त्या पूषन देवाला आम्ही अत्यंत तळमळीने आमच्या ऐश्वर्य व संवर्धनासाठी आवाहन करतो. तो अपराजित देव आमच्यासाठी कल्याणकारी व संरक्षक होवो.
करू आवाहन ईशा चलाचल मालका, मतिप्रेरका, दान करा ।
हे पूषा, अपराजिता, अम्हास राखा, संवर्धन नि कल्याण करा ॥ ०५
टीप- पूषन् (जो पोषण करतो) हा एक प्रमुख वैदिक सौर देव आहे. ऋग्वेदातील असंख्य ऋचांमध्ये त्याचा उल्लेख येतो. तो कळपांचा पालनकर्ता आहे आणि समृद्धी आणतो. यास्काचार्यांच्या मतानुसार किरणांसह दिसणारा सूर्य म्हणजे पूषन्. त्याला मोहक स्वरूप आहे. त्याच्याकडे अमाप संपत्ती आहे आणि नेहमी त्याच्या आज्ञेनुसार एक रथ स्वार होण्यास तयार असतो. तो सारथींमध्ये श्रेष्ठ आहे. रस्त्यावर येणाऱ्या आपत्तींना दूर करण्यासाठी म्हणून त्याची प्रार्थना करत असत.
पूषन् विवाह, प्रवास आणि रस्त्यांचा स्वामी आहे. ऋग्वेदातील सूक्ते, त्याला पशुधनाचे रक्षण करण्याचे आणि हरवलेले पशुधन शोधण्याचे आवाहन करतात. तो एक सहाय्यक, मार्गदर्शक, एक चांगला देव आहे, जो त्याच्या अनुयायांना समृद्ध कुरण आणि संपत्तीकडे नेतो. पूषन् हा भेटीगाठींचा देव आहे आणि त्याची प्रवासात, आणि विवाहांमध्ये शुभेच्छा देण्यासाठी प्रार्थना केली जाते. बहुतांश विवाह समारंभात, नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या आयुष्याच्या प्रवासात शुभेच्छा देण्यासाठी पूषनचे आवाहन केले जाते. त्याचा गुरेढोरे आणि त्यांचे खाद्य, यांच्याशीही संबंध जोडला आहे. पूषन हा एक संरक्षक आणि दयाळू देव आहे, प्रवासात तो प्रवाशांची काळजी घेतो, जंगली पशू आणि क्रूर माणसांपासून त्यांचे रक्षण करतो आणि त्यांना आनंदाचा सर्वोत्तम मार्ग शोधण्यात मदत करतो.
स्वस्ति न इन्द्रो वृद्श्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥ १.०८९.०६
मराठी- अतीव चपळ इन्द्र आमचे कल्याण करो. सर्वज्ञ पूषन आमचे कल्याण करो. अरिष्टनेमी तार्क्ष्य आमचे कल्याण करो. बृहस्पती देवता आमचे कल्याण करो.
टीप- विविध अभ्यासकांनी या ऋचेतील वृद्धश्रवाः, पूषा, अरिष्टनेमी या शब्दांचे वेगवेगळे अर्थ स्वीकारलेले दिसतात. अरिष्ट-नेमि, गरुड, अरुण आणि आरुणि ही कश्यप आणि विनता यांची अपत्ये सहसा तार्क्ष्य या संज्ञेशी संलग्न झालेली आढळतात. या दृष्टीने अरिष्टनेमी याचा अर्थ ‘दुःखांचा नाश करणारा’ ऐवजी ‘ज्याचे रथचक्र अव्याहत चालू असते (अरुण) असा अर्थ घेतला जाऊ शकतो. ऋग्वेदात ऋषी अरिष्टनेमी तार्क्ष्य यांनी रचलेले ‘तार्क्ष्यसूक्त’ आहे, ज्यात मुख्यत्वे वेगाने उडत जाणार्या तार्क्ष्य पक्ष्याची (गरुडाची) स्तुती आहे.
पूषन गाढे पंडित, वृद्धश्रवा जिष्णू, क्षेमकारी।
बृहस्पतीही, अरिष्टनेमी ठरोत अम्हा कल्याणकारी॥ ०६
पृषदश्वा मरुतः पृश्निमातरः शुभंयावानो विदथेषु जग्मयः ।
अग्निजिह्वा मनवः सूरचक्षसो विश्वे नो देवा अवसा गमन्निह ॥ १.०८९.०७
मराठी- जे भूमिपुत्र रंगीबेरंगी घोड्यांवर बसून (जे ठिपकेदार हरिणांच्या रथात बसून) शुभ कर्मांच्या (यज्ञाच्या) ठिकाणी येतात, युद्धाच्या (अगर संमेलनाच्या) ठिकाणी जातात, ज्यांची जीभ (वाणी) अग्नीसमान लखलखीत आहे, जे चिंतनशील आहेत, सूर्यासारखे तेजस्वी (कांतीचे) आहेत, असे विश्वेदेव मरुत आमच्याकडे सुरक्षासाधनांसह येवोत.
मरुतांनो, ठिपक्यांच्या घोड्यांवर, रवितेजे यज्ञस्थळी, सभास्थली
शुद्ध वाणी, मननी मग्न, राखण्या आम्हा यावे भूमि सुता, महाबली ॥ ०७
टीप- ऋग्वेदात मरुत देवतेची सुमारे ५० उल्लेखपर सूक्ते आहेत. मरुत हे रुद्रपुत्र मर्त्य असून गटांमध्ये विभागलेले असत, म्हणून त्यांचे उल्लेख संघांमध्ये केले जातात. ते उग्र परंतु ज्ञानी, दूरदर्शी, अत्यंत कुशल, उत्कृष्ट सैनिक आहेत. त्यांचा एक गट ६३ (७x७ + ७x२ Side Guards) सैनिकांचा असतो. सर्व मरुत दिसायला एकसारखे व समान आहेत. त्यांच्यात श्रेष्ठ मध्यम अगर कनिष्ठ असा भेदभाव नाही. सर्वांची शस्त्रे एकच असून ते घोड्यावर किंवा रथात स्वार होतात. घोडे किंवा ठिपकेदार हरणे त्यांच्या रथांना जोडलेली असतात. काही रथ स्वंचलित तर काही आकाशगामी आहेत.
भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः ॥ १.०८९.०८
मराठी- हे यज्ञ करण्यास योग्य आणि स्तुत्य देवांनो, आम्ही आमच्या कानांनी (नेहेमी) चांगल्या गोष्टीच ऐकाव्यात, डोळ्यांनी चांगल्या गोष्टीच पहाव्यात, सुदृढ अवयवांनी युक्त बलशाली शरीराने आम्ही देवांनी दिलेले आयुष्य उपभोगावे (असा आशीर्वाद तुम्ही आम्हास द्यावा).
यज्ञार्ह देवा, शुभ तेच कानी, असे इष्ट जे दिसो तेच नैनी ।
समाधानी, पुष्ट देहे जगावे अम्ही जिणे दिधले सुरांनी ॥ ०८
शतमिन्नुशरदो अन्ति देवा यत्रा नश्चक्रा जरसं तनूनाम् ।
पु॒त्रासोयत्र पितरोभवन्ति मा नो मध्या रीरिषतायुर्गन्तोः ॥ १.०८९.०९
मराठी- हे देवांनो, ही (आमच्या) आयुष्याची शंभर वर्षांची मर्यादा (तुम्ही घालून दिली) आहे ज्यात (ज्यानंतर) शरीराला वार्धक्यही येते आणि मुलेही बाप होतात. या आयुष्यक्रमात मध्येच खंड न येईल असे (काहीतरी) तुम्ही करा.
वय शंभर सरे, वृद्धता ना, सुरांनो, अम्हा ये शरीरी ।
पुत्रांचे बाप बनती, मधेच होवो कधी खंड ना नित्य चक्री ॥ ०९
अदितिर्द्यौरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः ।
विश्वे देवा अदितिः पञ्च जना अदितिर्जातमदितिर्जनित्वम् ॥ १.०८९.१०
मराठी- (देवता) अदिती स्वर्ग आहे, अंतराळ आहे, (आमचे) आई, वडील, मुलगा आहे, (अदितीच) सर्व देवता स्वरूप आहे, पंचजनांचा समूह आहे, आजपर्यंत जे झाले आहे व पुढेही जे होणार आहे, ते सर्व अदितीच आहे.
अदिती अंतराळ स्वर्ग अदिती माय नि बाप नि पुत्र असे |
देव सर्व अदितीच, पाच गण, माजी भावी अदितीच असे ॥ १०
टीप- या ऋचेतील ‘पंचजन’ संबंधी म.म. चित्राव यांनी तीन साहित्यांचा संदर्भ देऊन विभिन्न समूहांचा उल्लेख केला आहे. ते असे (ऐतरेय ब्राह्मण- देवता,मनुष्य,गंधर्व,सर्प,पितृगण), (सायणाचार्य- ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य,शूद्र,निषाद), (यास्काचार्य- गंधर्व,पितर,देव,असुर,रक्षस्). काही अभ्यासकांनी पंचजन याचा संबंध पंच ज्ञानेंद्रियांशी लावला आहे.
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
— धनंजय बोरकर (९८३३०७७०९१)
It is very much creditable and commendable. It makes now very clear after it has been translated in marathi.
Shrisukta and Purushasukta have you translated in marathi?