अनंत विठ्ठल कीर म्हणजेच धनंजय कीर यांचा जन्म २३ एप्रिल १९१३ रोजी रत्नागिरी येथे झाला. त्यांच्या वडिलांचा पेशा सुताराचा होता. त्यांच्या प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी त्याच व्यवसायाला सुरवात केली. परंतु त्यांचे त्या कामात मन रमेना कारण त्यांना इंग्रजी शिक्षणाचा ध्यास लागला होता. त्यामुळे त्यांनी सुतारकाम सोडले आणि रत्नागिरीमधील पटवर्धन हायस्कुलमध्ये प्रवेश घेतला. १९३१ मध्ये त्यांनी पहिल्या तीन इयत्ता पूर्ण करुण १९३५ मध्ये ते मॅट्रिक झाले. त्यांनी नंतर स्कुल बोर्डात नोकरी केली.
१९३८ मध्ये धनंजय कीर मुबईला रहावयास आले आणि म्युन्सिपालिटीच्या शाळा खात्यात बदली इन्स्पेक्टर , तर १९४० साली स्कुल कमिटीच्या कचेरीत कारकून म्ह्णून लागले. कीर हे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात शिस्तप्रिय शाळा तपासनीस म्हणून ओळखले जात असत. त्यांनी दादर परिसरात त्यांच्या नावे मुलींसाठी एक रात्रशाळाही सुरू केली होती. ती अजूनही सुरू आहे. मात्र कीरांचा प्रथमपासून आग्रह होता की, ज्या दिवशी संस्थेत भ्रष्टाचार शिरेल त्या दिवशी संस्था बंद करावी.
मुंबईत स्थैर्य मिळाल्यावर त्यांचे लक्ष सर्वप्रथम दादरच्या ‘ फ्री रीडिंग रूम ’वर गेले. हल्ली ‘ काशिनाथ धुरू हॉल ’ म्हणून ओळखल्या जाणा-या या संस्थेतील ग्रंथ त्यांनी त्या काळात अक्षरशः अधाशासारखे वाचून काढले. या काळात आसपासचे लोक त्यांना ‘ वेडा जॉन्सन ’ म्हणत असत .
धनंजय कीर यांनी १९४३ पासून इंग्रजी वृत्तपत्रातून लेखनास प्रारंभ केला. काही लेख त्यांनी ‘ धनंजय ‘ या टोपण नावाने लिहिले. जेव्हा कीर ‘ धनंजय ‘ या नावाने लिहू लागले तेव्हा वसंत शांताराम देसाई यांनी त्यांच्या ‘ धनंजय ‘ या नावाला आक्षेप घेतला कारण ‘ धनंजय ‘ हे नांव देसाई यांनी आधीच घेल्यामुळे तो आक्षेप घेतला गेला होता. त्यामुळे कीर यांनी ‘ धनंजय कीर ‘ या नावानेच लेखन केले. ते रत्नागिरीला शिकत असताना त्यांच्यावर वीर सावरकर यांच्या विचाराचा फार प्रभाव पडला होता. मुंबईमध्ये ते जेव्हा आले तेव्हा सावरकर यांच्या क्रातिकारक आणि विज्ञाननिष्ठ सामाजिक विचारांचा त्यांचा अभ्यास चालू राहिला . हा अभ्यास करून त्यांनी १९५० साली ‘ सावरकर अँड हिज टाइम्स ‘ हा चरित्रग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे त्यांनी डॉ. आबेडकर , लोकमान्य टिळक : फादर ऑफ फ्रिडम स्ट्रगल , महात्मा जोतीराव फुले : फादर ऑफ अवर सोशल रिव्होल्यूशन , महात्मा गांधी : पोलिटिकल सेंट अँड अनआर्मड प्रॉफेट , शाहू छत्रपती : अ रॉयल रिव्होल्यूशनरी याशिवाय धनंजय कीर यांनी चरित्रात्मक प्रबंध लेखनही केले. त्यांनी डॉ. भाऊ दाजी लाड , का. त्रि . तेलंग , रा. गो. भांडारकर यांच्यावर १९७९ साली ‘ तीन महान सारस्वत ‘ म्हणून पुस्तक लिहिले. तर ‘ ह्यांनी इतिहास घडवला ‘ या पुस्तकात सुरेंद्रनाथ बानर्जी , लाला लजपतराय , देशबंधू दास, सुभाषचंद्र बोस , महंमद अली जीना ह्या व्यक्तिचित्रांवर लिहिले. याशिवाय ‘ लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज : एक मूल्यमापन ‘ हे पुस्तक १९७१ साली लिहिले.
आधुनिक महाराष्ट्र आणि भारत दीड-दोनशे वर्षात कसे घडत गेले आणि त्या घडणीसाठी कोणकोणत्या व्यक्ती , कोणती राजकीय आणि सामाजिक परिस्थिती कारणीभूत ठरली याचा अभ्यासपूर्ण आलेख आणि विवेचन धनंजय कीर यांनी आपल्या सर्वच चरित्रग्रंथातून घेतला. त्यांनी डॉ. स.ग. मालशे यांच्या सहकार्याने म . फुले समग्र साहित्यावर अत्यंत बहुमूल्य ग्रंथ लिहिला.
‘ कृतज्ञ मी , कृतार्थ ‘मी हे धंनजय कीर यांनी त्यांचे आत्मचरित्र लिहिले. त्यांचा संपूर्ण जीवनपट त्यात त्यांनी उलगडून दाखवला आहे. त्याचप्रमाणे या आत्मचरित्रात एक माणूस म्ह्णून आणि मुख्य म्हणजे एक चरित्रकार म्ह्णून ते कसे घडत गेले हे सर्व काही वाचून कळते. ख-या ज्ञानोपासकाच्या भूमिकेत ते कायम राहिले. माहीमच्या त्यांच्या दोन खोल्यांच्या घरात पुस्तकांचे ढीगच्या ढीग होते. कपाटातली जागा अपुरी पडली तेव्हा घराच्या आतील बाजूस कापडामध्ये गुंडाळलेली पुस्तके लटकू लागली. धनंजय कीर यांना लेखनाचा , अभ्यासाचा प्रचंड ध्यास होता , त्यांची दृष्टीदेखील तुमच्या आमच्यासारखी नव्हती. लहानपणापासून सतत वाचन आणि मग पुढे जे काही संशोधन करण्यासाठी अफाट वाचन करावे लागले त्याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर झालेला होता आणि त्याचमुळे त्यांच्या चष्मा हा अत्यंत जाड काचेचा होता.
कीरांचे सासरे भिकाजी तात्या कनगुटकरांचे असगोलीचे घराणे मातब्बर. त्यांच्या मुंबईतही चाळी होत्या. ते इतके श्रीमंत होते की, आपल्या गावाला जाण्यासाठी त्यांनी एकदा चक्क विमान केले होते. गुहागर तालुक्यातल्या या खेडेगावाच्या सागर किनाऱ्यावर कुठलीही धावपट्टी नसताना वाळूवर हे विमान उतरले होते. हे विमान चालवणारा कुणी कुशल पारशी पायलट होता. या वाळूवरून त्यांचे विमान पुन्हा हवेतही झेपावले. बायकोच्या सासरची इतकी श्रीमंती असताना कीरांनी त्यांचे लेखन कधी सोडले नाही. ते माहीमच्या छोटया घरात राहून लेखन करत राहिले.
धनंजय कीर याना भारत सरकारने १९७१ साली ‘ पद्मभूषण ‘ हा किताब देऊन त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला होता. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने त्यांना ‘ डॉक्टर ऑफ लिटरेचर ‘ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता.
धनंजय कीर यांनी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आबेडकर यांच्या विचारांवर जे विस्तृत लेखन केले ते खरोखरच पुढल्या अनेक पिढयांना मार्गदर्शक ठरणार आहे.
कीर हे अतिशय सज्जन आणि प्रामाणिक गृहस्थ होते, हे त्यांच्या संपर्कात आलेले अनेक लोक आजही सांगत असतात. कीरांनी ज्या महापुरुषांच्या चरित्रांना शब्दबद्ध केले त्या सर्वाचे अलौकिक गुण आपल्यातही उतरवण्याचे प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केले होते. एका अद्वितीय चरित्रकाराची सारी लक्षणे त्यांच्या स्वभावातही होती.
अशा अत्यंत महत्वाच्या चरित्रकाराचे १२ मे १९८४ निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply