वसंत विश्वनाथ बापट यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड येथे झाला. त्याचे वडील रावसाहेब बापट हे न्यायाधीश होते. त्यांना जगन्नथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळाली होती , ते संस्कृतचे व्यासगी अभ्यासक होते. त्यांचे मूळ नांव विश्र्वनाथ वामन बापट असे होते. बापट यांचे प्राथमिक शिक्षण बेळगाव येथील शाळेत आणि माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात आणि महाविद्यालयीन शिक्षण सर परशुरामभाऊ महाविद्यालयात झाले. सिनिअर बी.ए . च्या वर्गात असताना महात्मा गांधींचे ‘ चले जावं ‘ आंदोलन सुरु झाले . तरुण स्वातंत्र्यप्रेमी बापटांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण सोडून दिले आणि भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला.
झालेल्या तुरूंगवासामुळे बापट साने गुरुजी , एस .एम. जोशी, ना.ग.गोरे यांच्या संपर्कात आले. तुरूंगातून सुटल्यावर त्यांनी पुन्हा महाविद्यालयीन अभ्यासाला सुरवात केली. १९४६ साली बापट संस्कृत घेऊन प्रथम श्रेणीत बी. ए . आणि १९४८ साली संस्कृत घेऊन एम.ए . झाले. १९४८ साली धारवाड महाविद्यालय , आणि १९४९ ते १९६४ नॅशनल महाविद्यालय , बांद्रे येथे बापटांनी नोकरी केली. १९७४ ते १९८२ बापटांनी ‘ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर तौलनिक साहित्याचे प्राध्यापक म्ह्णून काम करून मुंबई विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त झाले. ते जवळजवळ ३५ वर्षे अध्यापनाच्या क्षेत्रात सक्रिय होते.
वसंत बापट यांचा पहिला ‘ बिजली ‘ हा काव्यसंग्रह १९५२ साली प्रकाशित झाला. वसंत बापट यांनी ४५ वर्षात ३४ पुस्तके लिहिली आहेत. त्यात १३ कविता संग्रह , ६ बालकविता संग्रह , १ बालनाट्य , १ बाल नृत्य -नाट्य , ३ प्रवासवर्णने , ललितगद्य , राजकीय उपहास , समीक्षा संपादिक , संकीर्ण अशा विविध विषयांवरची पुस्तके आहेत. त्यांचे १९४८ साली ‘ धडपडणाऱ्या मुलांचे साने गुरुजी ‘ हे पुस्तक प्रथम प्रकाशित झाले होते.
त्यांच्या प्रमुख पुस्तकांची नांवे सेतू , अकरावी दिशा , प्रवासाच्या कविता, बारा गावचे पाणी, जिंकूनि मरणाला, ताणें-बाणे अशी आहेत
वसंत बापट यांच्या आयुष्याची घडण आणि त्यांची कविता यांच्यात जवळचे नाते आहे. त्यांना राष्टीय जाणिवेचे भान आहे. त्यांनी अनेक पोवाडे रचलेले आहेत , ते सेवा दलात होते. १९४२ चे आंदोलन , राष्ट्र सेवा दलातील सहभाग , पंढरपूर विठ्ठल मुक्ती लढा , गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन , भूदान चळवळ , राष्ट सेवा दल कलापथक यात प्रत्यक्षपणे-अप्रत्यक्षपणे सहभाग होता. समाजात जागृती निर्माण व्हावी म्ह्णून काव्य लेखन केले. राष्टीय गीते, स्फुर्तीगीते , पोवाडे , राष्ट्रीय तमाशा , वगनाट्ये यांसारखे लेखन प्रारंभीच्या काळात केले. ‘ जनजागरण ‘ हे त्यांच्या प्रारंभिक कवितेचे महत्वाचे प्रयोजन आहे. त्यांच्या कवितेत सामाजिक जिव्हाळा , सामाजिक समता , माणसाबद्दलचे प्रेम , मानवतावाद , आशावाद यांचे दर्शन घडते. ‘ बिजली ‘ पासून ‘ रसिया ‘ पर्यंत बापटांच्या कवितेत भावनेचा विकास झाला आहे. तसे बापट प्रेमकवीच आहेत . त्यांचे ‘ अजून त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते ‘ हे गीत आजही कुणी विसरले नाही . त्यांचे ‘ येशील येशील राणी , पहाटे पहाटे येशील ‘ हे गाणे किंवा त्यांची एक लावणी आहे ती आयुष्याचे संपूर्ण सार सांगून जाते , ‘ मैतर हो , खातरजमा करू कशी , आमी जाणार हो कधीतरी पटदिशी ‘. त्यांची ‘ फुंकर ‘ ही कविता आणि त्या कवितेचा शेवट माणसातील प्रेमभावना किती आर्त करतो हे ती कविता वाचल्याशिवाय कळणार नाही. तर दुसरीकडे त्यांच्या दक्खनच्या राणीची कविता निसर्गाबरोबर बरेच काही सांगून जाते . त्यांची झेलमचे अश्रू , सावंत , आंबा पिकतो , ‘ लावणी : अखेरच्या विनवणीची ह्या आणि अशा अनेक कविता मी अनेक वेळा त्याच्या तोडून ऐकल्या आहेत . त्या आजही विसरणे अशक्य आहे. वसंत बापट कवी म्ह्णून लोकप्रिय होतेच परंतु त्यांची गद्यलेखनातील कामगिरी महत्वाची आहे . साने गुरुजी यांच्या इच्छेनुसार त्यांनी ‘ साधना ‘ साप्तहिकाच्या प्रारंभकाळात साने गुरुजींना सहकार्य केले आणि पुढे १९८३ पासून १९९८ पर्यंत ‘ साधना ‘ साप्तहिकाच्या संपादनाची धुरा संभाळली. त्यातील अग्रलेख, टीकालेख , प्रासंगिक लेख या स्वरूपाचे लेखन केले. त्यांनी सेवा दलाचे करी देखील निष्ठेने केले. त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी सांगता येतील . मुबंईत साहित्य संमेलनात जो काहीं प्रकार झाला त्या भाषणाच्या वेळी मी तेथे होतॊ. भल्याभल्यांची त्यावेळी भंबेरी उडली होती. बापटांच्या कविता , भाषणे खूप ऐकली आहेत.
वसंत बापट , विदा करंदीकर आणि मंगेश पाडगांवकर या तीन कवींनी ४० वर्षे महाराष्ट्रभर शेकडो कविता वाचनाचे कार्यक्रम केले. महाराष्ट्रातील जनतेला कविता ऐकायला शिकवले. तिघेही भिन्न प्रवृतीचे कवी परंतु त्यांच्यामधील मैत्री अतूट होती. मला आठवतंय मी विंदा करंदीकर यांच्याकडे त्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी माझा मित्र रमेश पारधे यांच्याबरोबर जायचो , एके संध्याकाळी पाडगांवकरही तेथे आले होते ,जाता जाता विंदा पाडगांवकरांना म्हणाले अरे आज वसंताची आठवण आली रे , त्यावेळी पाडगांवकर काहीच बोलले नाहीत , त्यांच्या चष्म्याआड डोळ्यात आलेले पाणी मात्र मला दिसले. आज तिघेही काळाच्या पद्याआड गेले. परंतु त्यांच्या कविता , कार्यक्रम आजही आठवतात.
अशा महाराष्ट्रातील कवी , ललित गद्यलेखक वसंत बापट यांचे १७ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply