चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म ५ ऑगस्ट १९३० रोजी झाला.
अंतराळवीर बनण्याआधी नील आर्मस्ट्राँग नौदलात होते आणि त्या वेळी त्यांनी कोरिया युद्धात भाग घेतला होता. ते एअरोस्पेस इंजिनीअर, नौदल अधिकारी, टेस्ट पायलट आणि प्राध्यापकदेखील होते.
नौसेनेतील नोकरीनंतर आर्मस्ट्राँग यांनी पुरूडू विद्यापीठातून पदवी घेतली आणि त्यानंतर एका ड्रायडेन फ्लाईट रिसर्च सेंटरमध्ये दाखल झाले. तेथे टेस्ट पायलट म्हणून त्यांनी ९०० पेक्षा जास्त वेळा उड्डाण केले. आर्मस्ट्राँग यांनी जेमिनी मोहिमेदरम्यानही अंतराळ प्रवास केलेला होता. त्यांचे वडील स्टीफन हे ओहायो येथे सरकारी अंकेक्षक होते. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय ओहायोच्या अनेक भागांमध्ये भ्रमण करीत होते.
नील यांच्या जन्मानंतर त्यांच्या वडिलांची किमान २० ठिकाणी बदली झाली होती. याच काळात नील यांना हवाई उड्डाणाचे वेड लागले. आर्मस्ट्राँग यांनी आपल्या १६ व्या वाढदिवशीच स्टुडण्ट फ्लाईट सर्टिफिकेट मिळविले होते आणि त्याच वर्षी ऑगस्टमध्ये स्वत: विमान उडविले होते. त्या वेळी त्यांच्याजवळ विमान उडविण्याचा परवानाही नव्हता.नंतर नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेत नील आर्मस्ट्राँग १९७१ पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी सिनसिनाटी विद्यापीठात अनेक वर्षे ज्ञानदानाचे कार्य केले.
२० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांच्या रूपाने मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. अपोलो ११ नावाच्या यानातून आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरले, तेव्हा ते ३८ वर्षाचे होते. बझ अल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या सहका-यांसोबत चार लाख किलोमीटरचा प्रवास तीन दिवसांत नील आर्मस्ट्राँग यांनी केला. या तीन दिवसांत काय होणार याच्या उत्सुकतेने तमाम पृथ्वीवासीयांच्या हृदयाचे ठोके चुकत होते.
१९६१ मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी याच दशकात अमेरिका माणसाला चंद्रावर उतरवून सुखरूप परत आणेल, असे आश्वासन दिले होते. रशियाबरोबर सुरू असलेल्या शीतयुद्धात त्यामुळे अमेरिकेचा हा मोठा विजय ठरला.
नील यांच्यानंतर सुमारे १५ मिनिटांनी त्यांचा सहकारी अल्ड्रिनही चंद्रावर उतरला. नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर सुमारे २ तास ३२ मिनिटांचा काळ व्यतित केला होता. चंद्रावर अमेरिकी झेंडा फडकावून, काही दगड सोबत घेऊन आणि शास्त्रीय प्रयोगांची सुरुवात करून हे दोघे अंतराळवीर यानात परतले होते. परतल्यानंतर रेडिओद्वारे नील आर्मस्ट्राँग यांनी म्हटलेले ‘हे एका माणसाचे छोटेसे पाऊल आहे. पण अखिल मानवजातीसाठी खूप मोठी झेप आहे,’ हे वाक्य अजरामर झाले आहे.
चांद्रमोहीम आणि अंतराळवीर असे वलय असूनही नंतर ते अत्यंत साधेपणानेच आयुष्य जगले.
नील आर्मस्ट्राँग यांचे २५ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply