अली सरदार जाफरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९१३ रोजी उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात बलरामपूर या गावात झाला. त्यांचे लहानपण तेथेच गेले, त्यांचे हायस्कुलचे शिक्षण तेथेच झाले. परंतु वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी अलीगढ मुस्लिम विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. परंतु त्याआधीपासून वयाच्या १७ व्या वर्षापासून लिहित होते. १९३८ मध्ये त्यांचा पहिला लघुकथा संग्रह ‘ मंजिल ‘ हा प्रकाशित झाला.
सुरवातीला ते ‘ हाजिन ‘ या नावाने लिहीत होते परंतु पुढे त्यांनी त्या नावाने लिहिणे बंद केले. तेथे त्यांना त्यावेळचे तरुण शायर मित्र लाभले त्यामध्ये अख़्तर हुसैन रायपुरी, सिब्ते-हसन, जज़्बी, मजाज़, जाँनिसार अख़्तर और ख़्वाजा अहमद अब्बास सदजी अशी महत्वाची नावे होती. त्या कालखंडात इंग्रजांविरुद्ध स्वतंत्रता आदोलनाला सुरवात झाली होती. अनेक तरुण त्यात सहभागी होत होते. त्यावेळी वॉयसराय यांच्या एक्झिकेटीव्ह कौंसिलच्या सदस्यांविरुद्ध हरताळ केला म्हणून अली सरदार जाफरी यांना यूनिवर्सिटीमधून काढून टाकले . त्यांनी आपले शिक्षण दिल्लीमधील एँग्लो-अरेबिक कालेज मधून बी.ए. केले. पुढे लखनौ विश्वविद्यालयामधून एम.ए. ची पदवी मिळवली. तरीपण विद्यार्थी आदोलनात भाग घेणे कमी झाले नाही . त्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले.
त्या तुरुंगात त्यांची ओळख प्रगतीशील लेखक संघाचे सज्जाद ज़हीर यांच्याशी झाली. त्यामुळे त्यांना मार्क्स आणि लेनिन यांच्या साहित्याचे वाचन करण्यास वेळ मिळाला. त्या वाचनामुळे, चिंतनामुळे त्यांचा विचारांचा, कृतीचा पाया पक्का झाला. त्यांच्या समाजवादी विचारधारेमुळे ते प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर, फ़ैज़ अहमद ‘ फ़ैज़ ‘, मुल्कराज आनंद अशा भारतीय लेखकांप्रमाणे पाब्लो नेरुदा, लुई अरंगा अशा परदेशी लेखकांच्या विचारांशी त्यांची ओळख झाली. तेथे त्यांना संगीताची पण ओळख झाली आणि म्हणून की काय त्यांच्या शायरीमध्ये मेहनत करणाऱ्या कामगार वर्गाचे दुःख-वेदना त्यांच्या शायरीमधून दिसून आल्या.
अली सरदार जाफरी यांचा पहिला शायरीचा संग्रह ‘ परवाज ‘ हा प्रकशित झाला. ते ‘ नया अदब ‘ या साहित्यिक जर्नल चे सह-संपादकही होते. ते प्रगतिशील लेखन आंदोलनाशी जोडले गेले होतेच त्याचप्रमाणे सामाजिक, राजनैतिक आणि साहित्यिक आंदोलनाशी जोडले गेले होते. १९४९ साली त्यांनी प्रगतिशील उर्दू लेखकांचे संमेलन आयोजित केल्यामुळे त्यांना भिवंडी येथे पकडले होते. तीन महिन्यानंतर त्यांना पुन्हा पकडले.गरीब, पिडीत लोकांच्या समस्यांसाठी, त्यांच्या समस्या त्यांनी आपल्या लेखनातून त्यांनी जगासमोर आणल्या म्ह्णून त्यांना खूप यातना, कष्ट देखील सोसावे लागले .
अली सरदार जाफरी यांनी जलजला, धरती के लाल (1946), परदेसी (1957) अशा चित्रपटात गाणी लिहिली . 1948 से 1978 या दरम्यान त्यांनी नई दुनिया को सलाम, खून की लकीर, अमन का सितारा, एशिया जाग उठा, पत्थर की दीवार, एक ख्वाब और पैरहन-ए-शरार आणि लहू पुकारता है हे संग्रह प्रकाशित झाले. त्यांचा ‘ मेरा सफर ‘ पुस्तक खूप गाजले त्यामधील ” गुफ्तगू बंद न हो बात से बात चले ” या ओळी सुप्रसिद्ध आहेत.
सरदार अली जाफरी यांनी कबीर, मीर आणि गालिब ह्यांच्या संग्रहाचे संपादनही केले. त्यांच्या शेवटचा संग्रह ‘ सरहद के नाम ‘ हा होता. त्यांनी त्यांच्या रचनांमधून फारसी भाषेचा वापर केलेला दिसतो. त्यांची शायरी केवळ आपल्या देशात नाही तर परदेशातील साहित्य क्षेत्रातही सन्मानित झालेली आहे.
त्यांच्या ‘ नया साल मधील ह्या ओळी बरेच काही सांगून जातात.
शिकायतें भी बहुत हैं हिकायतें भी बहुत
मज़ा तो जब है कि यारों के रू-ब-रू कहिए
१९९८ मध्ये अली सरदार जाफरी याना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला . त्याचप्रमाणे त्यांना १९६७ साली भारत सरकारने ‘ पदमश्री ‘ देऊन त्यांचा सन्मान केला, उत्तर प्रदेश सरकारचा उर्दू अकादमी पुरस्कार आणि इकबाल सन्मान, रशिया सोवियत लैण्ड नेहरू पुरस्कार मिळाले. अली सरदार जाफरी यांच्या अनेक कार्यक्रमांतून मी त्यांच्या तोडून त्यांच्या रचना ऐकल्या आहेत. एक साधा माणूस असेच त्यांचे व्यक्तिमत्व होते.
त्यांच्या अनेक रचना भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांची काही नावे अशी आहेत रवाज़, जम्हूर, नई दुनिया को सलाम, ख़ूब की लकीर, अम्मन का सितारा, एशिया जाग उठा, पत्थर की दीवार,एक ख़्वाब और, पैराहने शरर, लहु पुकारता है मेरा सफ़र अशी आहेत. त्यांच्या खालील चार ओळीत ते बरेच काही सांगून जातात.
मैं सोता हूँ और जागता हूँ
और जाग कर फिर सो जाता हूँ
सदियों का पुराना खेल हूँ मैं
मैं मर के अमर हो जाता हूँ।
अली सरदार जाफरी यांचे १ ऑगस्ट २००० या दिवशी मुबंईत ब्रेन ट्युमरच्या आजाराने निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply