बालकवी ठोंबरे यांचा जन्म १३ ऑगस्ट १८९० रोजी झाला.
बालकवी ठोंबरे यांचे संपूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे असे होते. बालकवींच्या फ़ुलराणी, संध्यारजनी, तारकांचे गाणे, अरुण, आनंदी-आनंद, निर्झरास, श्रावणमास यांसारख्या कवितांनी मराठी काव्यरसिकांस संमोहित केले आहे. बालकवींच्या एकूण कवितेमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या बारा-तेरा तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, दुबळे तारू, यमाचे दूत, निराशा, पारवा, शून्य मनाचा घुमट, काळाचे लेख, खेड्यातील रात्र, संशय, हृदयाची गुंतागुंत, जिज्ञासू, बालविहग ह्या कविता त्यांपैकीच होत.
बालकवींच्या निसर्ग कविता पाठ नाहीत, असे पन्नास वर्षापूर्वी महाराष्ट्रात क्वचितच घर होते. त्या काळात ‘सेव्ह’ नव्हतं. जे काही होतं ते पाठांतर. त्यामुळेच श्रावण संपत आला की, बालकवी आठवतात. त्यांचा इंद्रधनू आठवतो. त्यांची आनंदी आनंद गडे घडाघडा पाठ म्हटली जाते. जीवनाचा आनंद बालकवींना सर्वत्र दिसला. वाहणा-या वा-यावर, दशदिशांत आणि जगात सुद्धा आणि एवढा सगळा आनंद जीवनात अनुभवल्यानंतर तो शिल्लकही राहिला. द्वेष संपला, मत्सर गेला आणि जिकडे तिकडे आनंद उरला. बालकवींचे जीवन किती सुंदर होते, याची ही कविता म्हणजे साक्ष आहे.
बालकवींच्या कवितेमध्ये निसर्गवर्णनावर विशेष भर आहे. निसर्गामध्ये त्यांना मानवी चैत्यनाचा प्रत्यय येतो. नादमाधुर्य हे त्यांच्या कवितेचे आणखी एक वैशिष्टय सांगितले जाते. बालकवींना निसर्गाविषयी वाटणारे प्रेम आणि त्या प्रेमाचा त्यांनी आपल्या काव्यातून घडवलेला आविष्कार यामुळेच त्यांना ‘निसर्गकवी ’म्हटले जाते. फ़ुलराणीचे वर्णन करताना ते म्हणतात.
“हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती
फ़ुलराणी ही खेळ्त होती”
बालकवी ठोंबरे यांचे निधन ५ मे १९१८ रोजी झाले. बालकवी ठोंबरे यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply