आगरीकोळी समाजात हुंडा देत नाही आणि घेत नाहीत कारण घरातील स्त्रिया लग्नासारख्या महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत पुरुषांपेक्षाही रोखठोक असतात.
एकत्र कुटुंबात वाढलेल्या दोन देखण्या मुली त्यांच्या मागे अजून एक लहान बहीण आणि एक भाऊ. मोठी बावीस वर्षाची तर दोन नंबर वीस वर्षाची. पंधरा वर्षांपूर्वी त्यांची आई वारली, बापाने दुसरं लग्न न करता चारही पोरांना वाढवले. घरात काका आणि पोरांच्या दोन्हीही काकूंनी त्यांना त्यांच्या आईची कमतरता भासू दिली नाही. दोन्हीही काकूंनी त्यांना नुसती आईची मायाच लावली नाही तर चांगल्या शिक्षणासह संस्कार सुद्धा दिले. घरातील कामं करून न घेता घरकामाचे वळण लावले. संपूर्ण गावात आईविना वाढलेल्या पोरींबद्दल सगळ्यांना मान होता. जसजशा त्या मोठ्या होऊ लागल्या तशा त्यांना गावातूनच लग्नासाठी मागणी येऊ लागली. पोरींच्या बापाची घरची शेती व जमीन भरपूर पण त्यातून उत्पन्न नसल्याने परिस्थिती खाऊन पिऊन सुखी अशीच होती. एकत्र कुटुंब असल्याने भावा भावांमध्ये लहान मोठे वाद असायचे पण तिघांचे कामं धंदे वेगवेगळे असले तरीही बऱ्यापैकी चालायचे. घरात पोरांमध्ये किंवा बायकांमध्ये कुरबुर किंवा कटकटी असा प्रकारच नसायचा.
मुलींसाठी वर येऊ लागले, मुलं आणि त्यांच्या घरचे मुलींना बघून लगेचच होकार कळवून टाकायचे. मुलींच्या तोडीस तोड शिक्षण आणि रूप बघून दोघींसाठी दोघांना होकार कळवले.
दोन्हीही मुलींसाठी आलेली स्थळं बऱ्यापैकी श्रीमंत होती. साखरपुडा करण्यापूर्वी मोठ्या मुलीला पसंत केलेल्या मुलाकडच्यांनी कुंकू लावण्याचा कार्यक्रम करून घेऊ या असे सांगितले. त्याप्रमाणे मुलाकडील पंचवीस माणसं कुंकू लावण्याच्या कार्यक्रमाला आली, मुलीला साडीचोळी आणि सोन्याची चैन आणली, आता एक प्रकारे लग्न ठरलं म्हणून जेवण करून निघून गेली.
दुसऱ्या मुलीचे पण लग्न जमलं होतं त्यामुळे लग्नाची तारीख काढून दोघींचा एकाच दिवशी एकाच खर्चात दोन्हीही लग्न करायचा असे मुलींच्या घरी सगळ्यांनी लग्न जमायचा पहिलेच ठरवून ठेवले होते. मोठ्या मुलीचा जिचा कुंकू लावण्याचा कार्यक्रम झाला होता तिच्या होणाऱ्या सासूने तिला एका दिवशी फोन करून सांगितलं की ते सगळे त्यांच्या मुरबाड तालुक्यातल्या फार्म हाऊस वर दोन दिवसासाठी जाणार आहेत, आणि त्यांच्या होणाऱ्या सुनेने पण त्यांच्या सोबत यावे असं तिने सुचविले. मुलीने तिच्या काकींना आणि वडिलांना याबद्दल सांगितले असता, लहान काकूने मुलीच्या होणाऱ्या सासूला या गोष्टीसाठी स्पष्टपणे नकार कळवला. मुलासोबत कोणी सोबत असो वा नसो मुलीला लग्न होईपर्यंत पाठवणार नाही असं निक्षून सांगितलं. त्यानंतर त्या मोठ्या मुलीची होणारी सासू मुलीला अधून मधून फोन करायची आणि तिला तुला आता असं वागावं लागेल, तुझ्यात असे बदल करवून घ्यावे लागतील असे सल्ले द्यायला लागली. लग्न ठरल्यानंतर असे सल्ले यायला लागल्यावर मुलीला आणि तिच्या काकूंना थोडं विचित्र वाटायला लागले होते, पण त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले.
एक महिन्यात लग्नाची तारीख ठरवायला दोन्हीही मुलांकडची माणसं एकत्र आली तारीख ठरवून दोन्ही कडची माणसं निघून गेली. दुसऱ्या दिवशी मोठ्या मुलीला मागणी घातलेल्या मुलाच्या बापाने फोन करून सांगितले की लग्नाला आमची दोन हजार माणसं येतील, आमच्या लोकांची सोय करण्यासाठी दोन्ही मुलींचे लग्न वेगवेगळ्या दिवशी ठेवा किंवा एकीचा सकाळी व दुसरीचा संध्याकाळी. तसं शक्य नसल्यास दोन्हीही मुली आणि दुसऱ्या नवऱ्या मुलाला आम्ही ठरवू त्या ठिकाणी यावे लागेल असं कळवलं.
दोन्हीही लग्न ठरल्यानंतर अचानक अशी मागणी झाल्यावर मुलींचा बाप घायाळ झाला, त्याला काय करावे ते सुचेना, त्याच्या ऐपती प्रमाणे तो थाटामाटात लग्न करून देणार होता. दोन्ही काकांनासुद्धा या गोष्टीचा राग आला, त्यांनी मोठ्या मुलीच्या होणाऱ्या सासरकडच्या चार लोकांना पुन्हा बोलणी करून मार्ग काढायला बोलावले. मुलाकडचे चार शहाणे लोकं आले. मुलाच्या बापाने आल्या आल्याचं तुमची मुलीकडची बाजू आहे, जरा समजून विचार करा अशी धमकीवजा सूचना केली. मुलीचा बाप आणि काका शांत राहून तोडगा काढायला बघत होते. पण एका दिवशी दोन लग्न करण्याऐवजी आता तुम्हाला मुलीना घेऊन आम्ही सांगू तिकडेच यावे लागेल. आमची दोन हजार लोकं आणि तुम्हा दोन्हीही वऱ्हाडा कडची किती किती लोकं येतील त्यांचा हिशोब करू. सगळा खर्च मग दहा लाख लागो की पंचवीस लाख सगळे वाटून घेऊ.
मुलीच्या बापाने माझी एवढा खर्च करण्याची ऐपत नाही असं काकुळतीला येऊन सांगितलं. त्यावर मुलाचा बाप म्हणाला लग्न म्हटलं की खर्च करावाच लागतो, ऐपत नव्हती तर मोठ्या घरातल्या मुलांना होकार कशासाठी द्यायचा. काही वेळ सगळे चिडीचूप होते. इकडे आतल्या खोलीत दोन्हीही काकूंनी मुलीला विश्वासात घेतले आणि तिला बाहेरून ऐकू येणाऱ्या संभाषणावर तिचे मत विचारले. मुलीने क्षणाचाही विलंब न करता मला हे लग्न करायचे नाही असं सांगितले.
मुलीच्या मोठ्या काकूने कुंकू लावायच्या कार्यक्रमाला आणलेली साडीचोळी आणि सोन्याची चैन घेतली आणि बाहेर बैठकीत बसलेल्या मुलाच्या बापाच्या हातात नेऊन दिली. मुलाच्या बापासह आलेले चार जण तोंड वासून बघत राहिले. मुलीची काकू बोलू लागली, ही तुम्ही दिलेली साडीचोळी आणि सोनं घ्या आणि निघा, आम्ही हे लग्न मोडत आहोत. तुम्ही मोठे आणि श्रीमंत असाल तुमच्या घरी पण आम्ही गरीब असलो तरी आमच्या मुलीला सुन करून घ्यायची तुमची निश्चितच लायकी नाही. तुमच्या मुलासोबत आम्ही मुलीला फिरायला पाठवले असते तर आज आम्हाला माती खायला लागली असती कारण तुमच्या मुलाला होकार का दिला म्हणून आमची ऐपत काढणारे तुमच्या सारख्या लोकांनी तुमची मुलगी आमच्या मुलासोबत फिरलीय असं पण निर्लज्जपणे बोलले असता. आलेल्या पाहुण्यांवर मोठी काकू कडाडली,आता बोलणी बस झाली, उठा आणि निघा, आम्ही लग्न मोडतोय.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B. E. (Mech ),DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply