“ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी गोव्यातील बांदिवडे या छोट्या गावात झाला त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव होते दुर्गा केळेकर. त्यांच्या वडिलांचे नाव होते वामन केळेकर तर आईचे नाव होते राधाबाई. ऐकून चौदा भावंडांपैकी त्या एक होत्या. वयाच्या आठव्या वर्षी दोन इयत्ता बांदिवड्याच्या शिक्षण पूर्ण करून आपल्या थोरल्या बहिणीबरोबर म्हणजे गिरिजाबाई यांच्याबरोबर त्या मुबंईला आल्या . गिरिजाबाई गायिका होत्या. संगीत शिक्षणासाठी त्यांना मुंबईला येणे भाग होते. त्या लॅमिंग्टन रोडवर रहात असत आणि तिथल्याच महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले . संगीत हे ध्येय असल्यामुळे त्यांनी शाळा सोडली.
गिरिजाबाई आग्रा घराण्याचे प्रसिद्ध गवई खाँसाहेब विलायत हुसेन यांच्याकडे तालीम घेत असत. ज्योत्स्नाबाईही आग्रा घरण्याचे खादिम हुसेन खाँ यांची तालीम घेऊ लागल्या. मुबंईत शाळेत , आंतरशाळेत पहिला नंबर पटकावून त्यांचे खूप नाव झाले. ‘ बॉम्बे ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन ‘ या आकाशवाणीवर ज्योत्स्नाबाई महिन्यातून तीन-चार वेळा गात होत्या. त्यावेळी त्या बालगायिका म्ह्णून खूप प्रसिद्ध झाल्या. तेराव्या-चौदाव्या वर्षीच त्या रागदारीत पारंगत झाल्या.
त्यावेळी केशवराव भोळे हे ‘ भावगीत ‘ गायक म्ह्णून खूप प्रसिद्ध झाले होते. कारण त्याचवेळी ‘ भावगीत ‘ हा प्रकार लोकप्रिय होऊ लागला होता. केशवराव भोळे हे केशव ‘ एकलव्य ‘ ह्या टोपणनावाने संगीतावर समीक्षण लिहित असत .
केशवराव भोळे यांचा मित्र रामराव हा केशवराव यांचा मित्र आणि चाहता होता आणि विशेष म्हणजे तो त्योत्स्नाबाईचा भाऊ होता. रामरावने आपल्या बहिणीला म्हणजे ज्योत्स्नाबाईना गाणे शिकवण्याची विनंती केशवराव भोळे यांना केली . ज्योत्स्नाबाईना ह्या वेगळ्या प्रकारच्या गाण्याचे म्हणजे ‘ भावगीतांचे ‘ वेड लागले . त्यांनी भावगीत गायन आत्मसात केले. गाण्यातले भावनेतले महत्व त्यांना कळले तोपर्यंत त्यांचे गाणे हे स्वाभाविकपणे नकळतपणे ‘ भावगीते ‘ सारखेच होत असे. त्यानंतर त्या भावगीत गायिका म्ह्णूनही लोकप्रिय झाल्या.
केशवराव भोळे आणि त्यांचा १९३२ साली विवाह झाला. त्यावेळी केशवराव भोळे यांचे संगीत असलेल्या ‘ संत सखू ‘ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. ज्योत्स्नाबाईनी त्यात सखूची भूमिका केली होती परंतु त्यावेळी त्यांचे नाव दुर्गा भोळे असे होते परंतु त्यावेळी त्या सिनेमात दुर्गा शिरोडकर नावाच्या नटी काम करत होत्या , या दोन दुर्गा नावामुळे गोंधळ उडत असल्या कारणाने त्यांचे नामकरण ‘ ज्योत्स्ना ‘ असे झाले आणि त्या ज्योत्स्ना भोळे झाल्या. त्यांचा विवाह झाला तेव्हा त्यांचे वय अठरा वर्षे होते. केशवराव भोळे यांचा मंजी खाँ , रामकृष्णबुवा वझे , मल्लिकार्जुन मन्सूर , मास्तर कृष्णराव अशा अनेक गवयाशी सबंध होता त्यामुळे , त्यांनी अनेक बंदिशीचा संग्रह केला होता त्याचा फायदा ज्योत्स्नाबाईना झाला, वेगवेगख्या घराण्याच्या रागामुळे त्यांच्या गायकीचे एक स्वतंत्र , प्रभावी रसायन तयार झाले.
लग्नानंतर वर्षभरात ज्योत्स्नाबाईना नाटकात काम करण्याचा योग्य आला. त्यांनी ‘ आंधळ्यांची शाळा ‘ ह्या नाटकात काम केले, लेखक वर्तक , के. नारायण काळे , आळतेकर . केशवराव दाते , केशवराव भोळे यांनी ‘ नाट्य मन्वंतर ‘ नावाची संस्था स्थापन केली. त्यांनी केलेले ‘ आंधळ्यांची शाळा ‘ हे नाटक आधुनिक तर होतेच त्यामध्ये अनंत काणेकर यांची भावगीते होती. ह्या नाटकाचे संगीतकार केशवराव भोळे होते. पुढे १९४१ साली ‘ नाट्यनिकेतन ‘ या संस्थेत प्रवेश केल्यावर संगीत अभिनेत्री म्ह्णून त्या चांगल्याच प्रस्थापित झाल्या त्यांनी या संस्थेत अकरा नाटकांमधून भूमिका केल्या त्यामध्ये ‘ संगीत कुलवधू ‘ या नाटकात त्यांना अजरामर कीर्ती मिळाली. या नाटकाला मास्तर कृष्णराव यांचे संगीत होते. कुलवधू नाटकातील सर्व पदे , क्षण आला भाग्याचा , मज रमणा मधुसूदना , बोला अमृत बोला ही पदे खूप गाजली , त्यानंतर त्यांची एक होता म्हातारा , कोणे एके काळी , राधामाई , भूमीकन्या सीता ह्या त्यांच्या नाटकांमधील अनेक पदे गाजली. परंतु कुलवधू नाटकातील ‘ बोला अमृत बोला ‘ ने रसिकांच्या अंतःकरणाचा ठाव घेतला. त्यांची माझीया माहेरा जा , आला खुशीत समिंदर ह्यासारखी अनेक गीते गाजली .
ज्योत्स्नाबाईचे गीतापासून भावगीत , भावगीतांपासून पद आणि पदापासून ख्याल हे सर्व प्रकार रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यांनी थोडे लेखनही केले. १९६० च्या सुमारास त्यांनी ‘ आराधना ‘ हे नाटक लिहिले . त्यानंतर ‘ अंतरीच्या खुणा ‘ हे पत्ररूपी पुस्तक लिहिले तर नभोवाणीसाठी ‘ घराण्याचा पीळ ‘ ही नाटिका लिहिली. १९९९ मध्ये ‘ तुमची ज्योत्स्ना भोळे ‘ हे आत्मचरित्र लिहिले.
ज्योत्स्नाबाई भोळे यांना विष्णुदास भावे पुरस्कार , महाराष्ट्र गौरव पुरस्कार , लता मंगेशकर पुरस्कार असे महत्वाचे पुरस्कार मिळाले.
त्यांचे ५ ऑगस्ट २००१ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply