काही व्यवसायांची नावं ही पिढ्यानपिढ्या एकाच प्रकारची असतात. तशा प्रकारची नावं, तो व्यवसाय अधोरेखित करीत असतात..
मी पन्नास वर्षांपासून पहातोय, अमृततुल्य चहाच्या हाॅटेलांची नावं ही शंकराच्या विविध नावांचीच असायची. जसं आपेश्वर, नर्मदेश्वर, चण्डीश्वर, जबरेश्वर, इत्यादी. या ..श्वर’च्या पुढे भुवन हा शब्द काॅमन असायचा. अलीकडच्या काळात ही नावं कमी झाली आणि नावाच्या पुढे ‘अमृततुल्य’ असा शब्द सर्व ठिकाणी दिसू लागला.
गेल्या काही वर्षांत या चहाच्या व्यवसायाची नाव ब्रॅण्डेड होऊ लागली. म्हणजे येवलेकर, साईबा, ढवळे, कडक, इराणी, दोस्ती, मैत्री, इत्यादी. काहींनी ‘टी’ आणि मी, माई, रावसाहेब, प्रेमाचा चहा, बासुंदी चहा, इ. अशी आधुनिक नावं दिली.
सध्या गुळाच्या चहाला खूप ‘डिमांड’ आहे. ‘खोमणे गुळाचा चहा’ची बरीच दुकानं दिसतात. यांच्याकडे चहाच्या मिश्रणाची पाकीटंही मिळतात. उकळलेल्या पाण्यात ती पूड घातल्यानंतर गुळाचा चहा तयार होतो.
उन्हाळ्यात चहाच्या ऐवजी उसाच्या रसाला अनेकजण पसंती देतात. पन्नास वर्षांपूर्वी शहरांतील अनेक पेठांत तात्पुरती उसाची गुऱ्हाळं उभी केलेली असायची. दोन बिल्डींगमधील चिंचोळ्या जागेतही अशी रसवंती गृह थाटलेली असायची. बांबूच्या तट्यांच्या भिंती उभ्या केलेल्या असायच्या. नटनट्यांची, देवदेवतांची भरपूर कॅलेंडर्स लावून भिंती सजवलेल्या असायच्या. गुऱ्हाळावरचा बोर्ड हा कापडी रंगवलेला असायचा. सकाळपासून या गुऱ्हाळातील माणसं उसांच्या कांड्यांना स्वच्छ करताना दिसायची. ही माणसं मुळशी तालुक्यातून चार महिन्यांसाठी आलेली असायची. पावसाळा सुरु झाला की, गुऱ्हाळं बंद व्हायची.
या गुऱ्हाळांची नावं नवनाथ पंथातील नाथांचीच असायची. जसं कानिफनाथ, नवनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, इत्यादी. त्याकाळात रस दहा पैसे हाफ व पंधरा पैसे फुल ग्लास असे. ‘जंबो ग्लास’ प्रकार त्यावेळी नव्हता. आमच्या घरी कुणी पाहुणे आले की, मी पेरुगेट जवळील गुऱ्हाळात चार हाफ ग्लासची ऑर्डर देऊन येत असे. अर्धा तास वाट पाहून परत गेल्यावर त्या रसवाल्या माणसाला घेऊनच येत असे.
आता बारा महिने उसाचा रस मिळू शकतो. शनिपार जवळील मुरलीधर, त्यापुढे असलेलं इंद्रायणी, खजिना विहीर जवळील शैलेश रसवंती गृहात कधीही रस मिळतो.
सदाशिव पेठेत एकेकाळी नॉनव्हेज निषिद्ध होतं. हळूहळू शेडगे आळीतील ‘हॉटेल नागपूर’ने सुरुवात झाली. मंडई जवळील बाबू गेनू चौकातील ‘दुर्गा’ची बिर्याणी सुप्रसिद्ध होती. कुमठेकर रस्त्यावर कुलकर्णी पेट्रोल पंपाच्या मागे आवारे मटनाची खानावळ होती, ती आता नव्या दिमाखात उभी आहे.
गेल्या दहा वर्षांत फक्त सदाशिवच नव्हे तर सर्व पेठांतून नॉनव्हेजची हॉटेलं मोठ्या संख्येने सुरु झाली. ‘आमची इतरत्र कुठेही शाखा नाही’ असे बोर्ड लावून एकाच नावाची अनेक हॉटेलं गिऱ्हाईकांनी तुडुंब भरु लागली.
दहा वर्षांनी सध्या नॉनव्हेज हॉटेलांनी ‘नवा फंडा’ सुरु केला आहे. इतर भरमसाठ नॉनव्हेज पदार्थ करण्यापेक्षा तीनच गोष्टी करायच्या.. मटन, चिकन व अंडा बिर्याणी! त्यात हाफ आणि फुल असे प्रकार ठेवायचे .. आणि नाव ठेवायचं, ‘गारवा’ बिर्याणी!! सध्या पुण्यात अशी शंभरेक हॉटेलं असावीत. पेठेतील चौका-चौकात अशी ‘गारवा’ची ठिकाणं आपलं लक्ष वेधून घेतात. त्यांनी प्रथमदर्शनीच तीन पसरट भांडी झाकून ठेवलेली असतात. खाली शेगडी असते. जसं गिऱ्हाईक येईल तसं, नाव जरी ‘गारवा’ असलं तरी गरमागरम प्लेट भरुन बिर्याणी वाढली जाते. तिथेच मागे बसून खाण्याची व्यवस्था केलेली असते.
या ‘गारवा’ ब्रॅण्डनेमच्या नावामागचं रहस्य मला तरी अद्याप कळलेलं नाहीये. मात्र हा ‘गारवा’ झोंबून घेणाऱ्या खवैय्यांची संख्या मात्र दिवसेंदिवस शहरात वाढतेच आहे, एवढं मात्र नक्की!!
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१६-७-२१.
Leave a Reply