सिंधुदुर्गमधील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्यावर १८ ऑगस्ट १८६८ रोजी वातावरणातील हेलियम वायूचा शोध लागला. आज या घटनेला १५३ वर्षे होत आहेत. हेलियमचे पाळणाघर अशी ओळख असलेला आणि पराक्रमाची गाथा सांगणारा किल्ले विजयदुर्ग पर्यटकांबरोबरच आता अभ्यासकांनाही साद घालीत आहे. जगात कुठेही हेलियम डे साजरा केला जात नाही, मात्र विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्यामुळे गेली अनेक वर्षे हेलियम डे साजरा केला जात आहे.
विजयदुर्ग किल्ल्यावर ‘साहेबाचे ओटे’ या ठिकाणी ‘हेलियम डे’ साजरा करण्यात येतो. अलीकडे हाच दिवस “हेलियम डे’ म्हणून साजरा करण्यामुळे याविषयी जागृती वाढली. ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून विविध मान्यवरांसह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करून “हेलियम डे’ साजरा होतो. यामुळे या ऐतिहासिक किल्ल्यावर विज्ञानप्रेमींची गजबज वाढते. सिंधुदुर्गातील सर्वात प्राचीन जलदुर्ग म्हणून किल्ले विजयदुर्गकडे पाहिले जाते.
११९५ ते १२०५ या कालावधीमध्ये शीलाहार घराण्यातील राजा भोज याने किल्ल्याची निर्मिती केली. शिवाजी महाराज यांच्या आरमारामध्ये या किल्ल्याला मोठे महत्त्व होते. मराठ्यांच्या आरमारात या किल्ल्याला सर्वोच्च स्थान होते. ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ले विजयदुर्गने आठशेहून अधिक वर्षांत अनेक स्थित्यंतरे अनुभवली. त्यातीलच एक म्हणजे हेलियम वायूचा शोध. त्यामुळे केवळ ऐतिहासिक घटनांचाच नव्हे; तर वैज्ञानिक संदर्भानेही किल्ले विजयदुर्गची ओळख तयार झाली. १८ ऑगस्ट १८६८ या दिवशी किल्ले विजयदुर्गने विलक्षण घटना अनुभवली. ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जे. नॉर्मन लॉकियार यांनी याच दिवशी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी किल्ले विजयदुर्ग ही जागा निश्चिघत केली. अक्षांश, रेखांशाच्या दृष्टीने ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ही जागा त्यांना संयुक्ति्क वाटली. दुर्बीण ठेवण्यासाठी त्यांनी तेथे लहान दगडी चबुतरा बांधला होता. त्याला पुढे “सायबांचे ओटे’ असे संबोधले जाऊ लागले.
ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ले विजयदुर्ग खगोलशास्त्रज्ञांसाठीसुद्धा हेलियमचे शोधस्थान म्हणून महत्त्वाचा ठरला आहे. सर जे. नॉर्मन लॉकियार यांनी दुर्बिणीवर स्पेक्ट्रो्मीटर चढवून १८ ऑगस्ट १८६८ ला सूर्यग्रहणाचा अभ्यास केला. ग्रहणकाळ सकाळी ८ वाजून २१ मिनिटांनी सुरू झाला. त्यांनी दुर्बीण सूर्यावर रोखून ठेवली होती. ९.२४ ते ९.३२ या काळात खग्रास सूर्यग्रहण होते. या काळात त्यांना स्पेक्ट्रो ग्राफवर ५८७.४९ नॅनोमीटर लहर लांबी (व्हेवलेंग्थ) असलेली एक पीत वर्णरेषा दिसली आणि हा क्षण अभूतपूर्व ठरला. या वर्णरेषेचा स्रोत हा सूर्याच्या तप्त वातावरणातील एका नवीन मूलद्रव्यात असला पाहिजे, असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्याला त्यांनी हेलियम (ग्रीक भाषेत Helios म्हणजे सूर्य) नाव दिले. पुढे सुमारे २५ वर्षांनी विल्यम रामसे यांनी या पायावर कळस चढवला आणि हेलियमच्या शोधावर शिक्का मोर्तब केले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply