मार्च महिनाखेरीपासून भुसावळच्या रणरणत्या उन्हाला सामोरे जाण्यासाठी बिल्डिंगमधील आणि गल्लीतील महिलांची वार्षिक कामे सुरु व्हायची.
” रांधा, वाढा , उष्टी काढा ” हा एरवीचा दिवस ! कोणत्याही घरी भांडीवाली, कपडे धुवायला आणि केर-फरशीसाठी कामवाली नसायची. घरातल्या स्त्रिया घरकामाबरोबर हेही रोज मॅनेज करायच्या. वृत्तपत्र वाचन, ट्रान्झिस्टर ऐकणे ही पुरुष मंडळींची कामे. घरची बाई त्यापासून दूर. हिंडणे-फिरणे, खरेदी, प्रवास क्वचित. त्यामुळेही सगळ्याजणी या सामूहिक अनुभवांसाठी उत्सुक असायच्या.
हातशेवया हा त्यातल्या त्यात बराच किचकट आणि वेळखाऊ कार्यक्रम ! प्रत्येकीच्याच घरी व्हायचा असे नाही, पण एकंदरीत कलाकुसरीचा आणि बघणेबल उपक्रम असायचा. त्याचे नियोजन, कामाचे वाटप, मध्येमध्ये श्रमपरिहार सारं व्यवस्थापन शास्त्रानुसार असायचं. आम्हां मंडळींची लुडबुड मर्यादित आणि परिघाबाहेर ! शेवयांचा रंग आणि पोत यांची जपणूक असोशीने.
नंतर वर्षभराचे उडदाचे पापड. दुपारचे आवरून सगळ्याजणी आपापली पोळपाट लाटणी घेऊन एकेकीच्या घरी जमत. साधारण चार वाजेपर्यंत भला थोरला गोळा संपायचा आणि त्याचे रूपांतर दीड -दोनशे पापडांत व्हायचे. आम्हां मंडळींना बोटी ( हा खान्देशी शब्द) पळवायला आवडायची. सध्या त्याचा उल्लेख टीव्ही वरील जाहिरातीत “लाटी “असा होतो. गोडेतेलात बुडवून २-३ बोट्या सहज पोटात सारत असू आम्ही – आईच्या “पोट दुखेल ” या दटावणीकडे दुर्लक्ष करीत. बदल्यात ओले /कच्चे पापड उन्हात वाळवायला मदत करायची. आता पुण्यात या लाट्या पॅकबंद मिळतात. मध्यंतरी आवडतात म्हणून माझ्या बहिणीने मला एक पॅकेट आणून दिले होते.
त्यानंतर कुरडया ! सकाळपासून त्याचे शिजवणे आदि सोपस्कार असायचे. सांडेल/चटका बसेल म्हणून आम्ही दूर ठेवले जायचो. मात्र त्याचा वाटीभर चीक गरम असताना (मीठ,तिखट आणि तेल लावून) वाट्याला यायचा. सोऱ्या घेऊन सुबक कुरडया घातल्या जायच्या. दिवसभर गच्चीवर/रस्त्यावर वाळवण चालायचे. खान्देशातील त्याकाळी घराघरात होणारा आणखी एक पदार्थ ” बिबड्या ! ” तो काही भुसावळ सुटल्यापासून आजता गायत परत दृष्टीस पडलेला नाहीए. अगदी चवदार, खमंग !
मोसमाचा शेवट कैरीच्या लोणच्याने व्हायचा. लिंबाचे लोणचे तोवर प्रतिष्ठित नव्हते. बाजारातून १०-१२ किलो कैऱ्या विळ्यावर फोडून आणायच्या. त्या फोडी मिठात थोडावेळ अंगासरशी ठेवायच्या. बरण्या वाफवून ठेवायच्या. बाकीची पूर्तता (मसाल्याची, गुळाची, तेलाची वगैरे )झाली की लोणचे “घालायचे.” वर बरणीचे तोंड घट्ट कापडाने झाकायचे आणि २-३ दिवसांनी उपास सोडत रसरशीत लोणच्याची पहिली चव बघायची. त्याबरोबरच शेजारी-पाजारी एकेक वाटी लोणच्याची चव द्यायची. ५-६ उडदाचे पापड, ३-४ कुरडया हेही अभिप्रायार्थ पाठविले जायचे सगळ्यांकडे ! आणि न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार तेवढेच घराघरातून आमच्या कडे यायचे. काही घरी लोणच्याच्या सोबतीला ऐपतीनुसार साखरांबा-गुळंबा व्हायचा. वर्षभर हवी तेव्हा जेवणाची गोड सोबत ! आणि शाळेतल्या “टिफिन “साठी लोणचं- पोळी पुरेसं !
सगळं काही “साथी हाथ बढाना ” टाईप. १०-१२ जणी मिळून तितक्याच घरांसाठी वाळवण आणि साठवण निगुतीने करायच्या. मेहनताना वर लिहिलाय तसा – किंचित चव. तुलना वगैरे नसायची. २-३ महिन्यात वर्षभराची बेगमी ! त्याकाळी हे सगळंच सर्रास दुकानांमध्ये मिळत नसे. त्यामुळे गृहिणी जिंदाबाद !
अशा या सामूहिक भूतकाळाच्या चवी आजही ओठांवर आहेत आणि हमखास आठवतात, विशेषतः “दिल्ली -६ ” सारख्या चित्रपटातून वहिदा आणि मंडळी गच्चीवरील या कामकाजाचे मनोहारी दर्शन घडवितात तेव्हा !
भुसावळला अजून हे सुरु आहे का , कल्पना नाही.”
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply