स्वातंत्र्यसैनिक, समाजसेवक आणि नाशिकच्या ‘गावकरी’,’अमृत’ व ‘रसरंग’ चे संपादक दत्तात्रय.शं.पोतनीस तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म.२२ नोव्हेंबर १९०९ रोजी वाई (जि. सातारा) येथे झाला.
दत्तात्रय पोतनीस यांचे वडिल शिलाई काम करून चरितार्थ चालवायचे. त्यामुळे त्याचे शालेय शिक्षण वाईतच झाले. नंतर ते पुण्याला आले. मात्र पुण्यात आल्यावर गांधी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत ओढले गेले. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी गांधीजींच्या हाकेला ओ देत थेठ नाशिक जिल्हयातील टेंभे गाव गाठले. तेथे अनेक सामाजिक कामं केली. परिसरातील गावात ४५ एक शिक्षकी शाळा सुरू करून ज्ञानयज्ञ आरंभिला. त्यासाठी गावकरी सुरू केले.
मात्र १९३९ च्या सुमारास त्यांना नाशिकला जाण्यासाठी सांगण्यात आले. ते नाशिकला गेले. गावकरी साप्ताहिक मग नाशिकमधून निघू लागला. तेथे त्यांनी ७००० रूपये गुंतवणूक एक छपाई मशिन घेतले. त्यावर ‘गावकरी’ छापला जायला लागला. मात्र याच वेळेस १९४२ च्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास झाला. त्यामुळं गावकरीचं प्रकाशन थाबलं. परत आल्यानंतर १९४४ मध्ये पुन्हा गावकरी पहिल्या जोमानं प्रकाशित व्हायला लागला. साप्ताहिकाच्या मर्यादा लक्षात घेऊन १९४७ मध्ये दादासाहेबांनी गावकरीचे दैनिकात रूपातर केलं. मुंबईची वृत्तपत्रं नाशिकात उशिरानं येत. गावकरी मात्र सकाळीच नाशिकात वितरित होऊ लागल्यानं गावकरी नाशिकच्या घराघरात आणि मनामनात घर करून बसला.
आपल्या वाचकांना उशिरातल्या बातम्या देता याव्यात म्हणून दादासाहेबांनी पीटीआय या वृत्तसंस्थेची सेवा घेतली. ताज्या बातम्या आणि सर्व विचारांना स्थान देणारे गावकरी अल्पावधितच लोकप्रिय दैनिक बनले. गावकरीचा चांगलाच जम बसल्यानंतर दादासाहेबांनी एक नवा प्रयोग कऱण्याचं ठरविलं. इंग्रजीतील रिडर डायजेस्टच्या धर्तीवर ‘अमृत’ हे मासिक सुरू केलं. या मासिकाला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. त्यानंतर आणखी एक नवा प्रयोग दादासाहेबांनी केला. कला,क्रीडा आणि मनोरंजनाला वाहिलेलं ‘रसरंग’ हे साप्ताहिक १० मे १९५८ रोजी सुरू केलं. मराठीतला हा प्रयोगही पहिल्यांदाच होत असल्यानं वाचकानं रसरंगवर देखील उडया टाकल्या.व्यावसायिकदृष्टया देखील रसरंग यशस्वी ठरले.
रसरंग सुरू करून अजून सहा महिनेही झालेले नव्हते तोच दादासाहेबांनी औरंगाबादेतून अजिंठा सुरू करण्याचा निर्णय़ घेतला.निजामी राजवटीतून मुक्त झालेल्या मराठवाड्यात परिपूर्ण दैनिक नव्हते. मराठवाडा होते पण ते साप्ताहिक स्वरूपात निघत होते.ही पोकळी विचारात घेऊन दादासाहेबांनी ३ डिसेंबर १९५८ पासून अजिंठा नावाचे दैनिक औरंगाबादेतून सुरू केलं. अलिकडच्या काळात मराठवाड्यात भांडवलदारी वृत्तपत्रं आल्यानं ध्येयवादी वृत्तपत्रं बंद पडू लागली. अगोदर मराठवाडा बंद पडले. २००० मध्ये अजिंठाही त्याच मार्गाने गेले. मात्र या काळात अजिंठानं मराठवाड्याला पत्रकारिता शिकविली. त्यांनी अनेक नवे पत्रकार निर्माण केले. मराठवाड्यातील अनेक प्रश्न धसास लावले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या निमित्तानं दादासाहेबाची कसोटी लागली होती. कॉंग्रेसमधील एक गट संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कार करणारा असला तरी दुसरा गट हायकमांडच्या तालावर नाचणारा होता. दादासाहेब स्वतःसंयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा मताचे होते. गावकरीनं त्याचा पुरस्कार केला पण त्याबद्दल त्याना कॉग्रेसवाल्याकडूनच मोठा त्रास सहन करावा लागला. त्याची त्यांनी पर्वा केली नाही.
१९६० मध्ये दादासाहेबांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेत आपलं लक्ष नाशिकच्या विकासावर केंद्रीत केलं. नाशिकला त्यांनी औद्योगिक विकास परिषद घेऊन त्यात नाशिकच्या विकासावर सांगोपांग चर्चा घडवून आणली. नाशिक मर्चंटस को ऑपरेटीव्ह बॅंक स्थापन केली.
नाशिकला एम.आय.डी.सी आणण्यात मोठे योगदान दादासाहेबांचे आहे. नाशिक लोकहितवादी मंडळाचे ते दहा वर्षे अध्यक्ष होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ नाशिकला व्हावे यासाठी देखील त्यांनी प्रय़त्न केले. नाशिक सहकारी साखर कारखाना देखील त्याच्याच प्रयत्नांचं फळ आहे.
राजकारण,गावकरीचा व्याप,आणि समाजसेवेत अडकून पडलेल्या दादासाहेबांनी वेगळं लेखन केलं नसलं तरी त्यांनी जी व्याख्यानं दिली ती “स्नेहयात्रा” या स्मृतीग्रंथात छापली आहेत.
दादासाहेबांना मुंबई मराठी पत्रकार संघानं आचार्य अत्रे पुरस्कारानं गौरविलं होतं, ग.गो.जाधव पुरस्कारही त्यांना मिळाला होता. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष होण्याचा मानही त्यांना मिळाला. पणजी येथे १९६९ मध्ये झालेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. पत्रकारितेवर अपार निष्ठा आणि प्रेम असणाऱ्या दादासाहेबांसाठी पत्रकारिता हा एक धर्म होता. वृत्तपत्रांना ते कान व डोळे मानत.पत्रकारिता हे समाजशिक्षण आणि समाज प्रबोधनाचे एक प्रमुख साधन असून ते नैतिक बळ देणारे एक माध्यमही आहे अशी त्यांची धारणा होती. त्यामुळंच त्यांनी एक व्रत समजूनच आयुष्यभर पत्रकारिता केली. पत्रकारितेत नवनवे प्रयोग करून व्यावसायिक यशही संपादन केले.
दादासाहेब पोतनीस यांचे २७ ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply