नवाब बानो म्हणजेच ‘ निम्मी ‘ चा जन्म १८ फेब्रुवारी १९३३ रोजी आग्रा येथे झाला. तिची आई सुप्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री होती. त्याचे नाव होते वाहिदा. त्याचे वडील अब्दुल हकीम मिलिटरीमध्ये कॉन्ट्रॅक्टर होते. निम्मीच्या आजोबानी तिचे नाव ‘ नबाब ‘ ठेवले आणि पुढे आजींनी ‘ बानो ‘ नाव लावले. निम्मी जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिची आई मेहबूबखान आणि त्याच्या कुटूंबाशी त्यांचे चांगले संबंध होते त्याचप्रमाणे मेहबूब खान हे चित्रपट व्यवसायात होते. निम्मीच्या आईने मेहबूब खान यांच्या अली – बाबा चालीस चोर मध्ये ‘ मर्जिनाचे ‘ काम केले होते. निम्मी अकरा वर्षाची असताना तिच्या आईचे अकस्मात निधन झाले. पुढे ती मुंबईला निम्मीच्या आत्याकडे आली तिचे नाव ज्योती होते. ती त्यावेळी मुंबईच्या चित्रपटसृष्टीत अभिनेत्री होती. ज्योतीचे पती जी. एम. दुराणी भारतीय चित्रपटसृष्टीत लोकप्रिय गायक आणि संगीतकार होते.
मुंबईला आल्यावर ती अनेकवेळा शूटिंग बघायला जायची. एकदा बरसात चे शूटिंग बघायला गेली असता नर्गिसची आई जद्दनबाई एका खुर्चीवर बसली होती, बाजूच्या खुर्ची रिकामी असल्यामुळे निम्मी त्या रिकाम्या खुर्चीवर जाऊन बसली ती जद्दनबाईच्या सांगण्यावरून कारण निम्मी त्यावेळी बाजूलाच उभी होती. शूटिंग संपल्यानंतर राजकपूर जद्दनबाईजवळ आला तेव्हा राजकपूरने तिला पाहिले, त्यावेळी तो एका मुलीच्या शोधात होता बरसात या चित्रपटासाठी. त्याने निम्मीला तिचे नाव विचारले तेव्हा निम्मीने आपले नाव सांगितले नवाब बानो.
आठ-दहा दिवसानी मेहबूब स्टुडिओंमधून बोलावणे आले, तयार रहा तुझी स्क्रीन टेस्ट घ्यायची आहे. दोन-तीन मुली स्क्रीन टेस्ट साठी आल्या होत्या. त्यावेळी निम्मीने तिला दिलेला डायलॉग म्हणता म्हणता तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. स्क्रीन टेस्ट संपली. आणि काही वेळाने स्टुडिओत पेढे वाटले जात होते, तिला कळेना काय झाले तेव्हा तिने तेथील एकाला विचारले तेव्हा तिने सांगितले तुला कळले नाही का ? राजकपूरच्या बरसातसाठी तू सिलेक्ट झालीस. राजकपूरनेच तिचे नामकरण चित्रपटांसाठी ‘ निम्मी ‘ असे केले. ते साल होते १९४९ आणि ‘ जिया बेकरार है..’ या गाण्यापासून त्यांचे शूटिंग सुरु झाले. ह्या गाण्यापासून नुसती त्यांची चित्रपट कारकीर्द सुरु नाही झाली तर शंकर, जयकिशन यांचीसुद्धा. त्यावेळी निम्मीबरोबर प्रेमनाथ काम करत होता. त्याने पूर्वीही चित्रपटातून कामे केली होती परंतु या बरसात चित्रपटापासून त्याची खरी चित्रपटातील कारकिर्द सुरु झाली. गीतकार हसरत जयपुरी हे देखील नवे होते. ह्या चित्रपटातील ‘ बरसात मे हमसे मिले तुम..’ हे गाणे देखील खूप गाजले.
निम्मी राजकपूरची एक आठवण सांगतात, एक दिवशी राजकपूर एक लाला धागा घेऊन आले आणि तिला म्हणाले धागा माझ्या हाताला बांध, ह्याचा अर्थ समजतो का, तेव्हा निम्मी म्हणाली ह्या धाग्याचा अर्थ आहे राखी. तिने तो धागा त्याच्या हाताला बांधला. याचे मूळ कारण होते ती ओर्थडॉक्स होती, तिने निडरपणे बरसातमध्ये काम करावे म्ह्णून. निम्मी पुढे म्हणाली मी शेवटपर्यंत राखी पौर्णीमेला त्याला त्याच्या घरी राखी बांधायला जायची आणि दिवसभर तिथे रहायची.
निम्मीचे लग्न एस. अली रझा यांच्याशी झाले ते सुप्रसिद्ध संवादलेखक होते त्यांनी अंदाज, बरसात, आन, अमर अशा अनेक चित्रपटांसाठी संवाद लेखन केले होते. सुप्रसिद्ध हास्य-अभिनेता मुक्री याने त्या दोघांचा विवाह घडवून आणला अगदी दोघांच्या घरच्या संमतीने. ४२ वर्षे दोघेही एकत्र रहात होते. १ नोव्हेंबर २००७ रोजी रझा यांचे निधन झाले. निम्मीने राजकपूर, दिलीपकुमार, अशोककुमार यासारख्या अनॆक अभिनेत्याबरोबर काम केले. त्याच्या शेवटचा चित्रपट होता के. असिफ यांचा ‘ लव्ह अँड गॉड ‘ दुर्देवाने तो पुरा झाला नाही.
निम्मीने सुमारे अडतीस ते चाळीस चित्रपटातून भूमिका केल्या. त्यात बरसात, दिदार, बेदर्दी, दाग, आन, अमर, उडन खटोला, सोहनी महिवाल, आकाशदीप. आकाशदीप हा चित्रपट १९६५ साली आला त्यानंतर लव्ह अँड गॉड १९८६ साली रिलिज केला.
काही वर्षांपूर्वी मधुबालाची पोस्टाची तिकिटे भारत सरकारने काढली होती त्यावेळी निम्मी, मधुबालाची बहीण मधुर भूषण आणि अनेक कलावंत आले होते त्यावेळी मला निम्मीला भेटता आले. त्यावेळी निम्मिच्या स्वाक्षऱ्या मधुबालाच्या फर्स्ट डे कव्हर्सवर घेतल्या होत्या. निम्मीने मधुबाला, नर्गिस, मीनाकुमारी, गीता बळी, सुरय्या, बिना रॉय याच्याबरोबर कामे केले आहेत. निम्मीला मुलबाळ नाही परंतु तिने आपल्या जवळच्या नातलगाला दत्तक घेतले होते.
25 मार्च 2020 रोजी तिचे मुंबई मध्ये वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply